आपण अंतर्मुख झाल्यास ‘आपण कसे आहोत’, याची सम्यक कल्पना येते !

‘प्रख्यात साहित्यिक बर्नाड शॉ एके ठिकाणी भोजनास गेले होते. एका स्त्रीच्या मागे त्यांना आपले व्यंगचित्र दिसले. त्यांना वाटले, ‘चित्रकाराने चेष्टा करावी; पण इतक्या दुष्टपणाने आपले व्यंगचित्र काढू नये.’ ती स्त्री दुसरीकडे गेल्यावर तो त्या चित्राच्या अगदी जवळ गेला. त्याला कळून आले की, तेथे कोणतेच चित्र नसून एक भला मोठा आरसा आहे आणि त्यात आपण आपले प्रतिबिंब पहात आहोत.

या गोष्टीत कितीतरी अर्थ भरलेला आहे. स्वतःविषयीच्या आपल्या कल्पना फार मोठ्या असतात; पण आपण अंतर्मुख झालो, म्हणजे भव्य-दिव्य आरशात आपण आपल्याला पाहू शकतो आणि आपण कसे आहोत, याची आपणास सम्यक कल्पना येते.’

– राम केशव रानडे

(संदर्भ : ‘प्रसाद’, नोव्हेंबर दिवाळी अंक : १९६२)