मुमुक्षुत्व 

१. विषयांनी बद्ध असलेल्या माणसाला मुक्त करणार्‍या देवाच्या प्राप्तीची आस म्हणजे मुमुक्षुत्व 

विषय माणसाला बंदिस्त करतात. इतकेच नव्हे, तर मुक्तीच्या दारांना जणू घट्ट कुलूपे लावतात. ही कुलपे उघडण्याचे काम कुठल्याही अवस्थेतील ज्या शक्तीकडून होते, तोच ‘देव.’ त्याच्या प्राप्तीची आस म्हणजेच ‘मुमुक्षुत्व.’ ज्याच्या ठिकाणी असे मुमुक्षुत्व असते, तो ‘मुमुक्षू.’

२. वासनेच्या बंधनातून मुक्त होणे म्हणजे मोक्षप्राप्ती 

‘मुमुक्षुत्व म्हणजे मोक्षप्राप्तीची आस. ‘मोक्षप्राप्ती’ म्हणजे साध्या भाषेत ‘देवाची प्राप्ती’; कारण मोक्ष म्हणजे मुक्ती. ही मुक्ती बंधनातून असते. बंधन वासनेतून निर्माण होते. वासना ही कर्माची प्रेरकशक्ती असते. वासना आणि कर्म मिळूनच मनुष्य विषयी होतो. (इंद्रियासक्त होतो.)

– स्वामी विद्यानंद (साभार: ग्रंथ ‘चिंतनधारा’)