भारताची अधिकृत दिनदर्शिका : भारतीय सौर कालगणना

‘भारतीय सौर कालगणनेची माहिती व्हावी, या उद्देशाने हा लेख लिहिला आहे. भारतीय सौर कालगणनेचा स्वीकार भारत सरकारने चैत्र प्रतिपदा १८७९ (२२ मार्च १९५७) या दिवशी केला आहे; परंतु अद्याप दिनदर्शिकेचा सार्वत्रिक अंगीकार मात्र झाला नाही. निदान ज्येष्ठ लोकांना तरी या कालगणनेची माहिती व्हावी, म्हणून हे लिहीत आहे.

१. ६० विविध पंचांगांचा अभ्यास करून बनवलेली कालगणना

वर्ष १९४७ मध्ये भारत इंग्रजांच्या गुलामीतून मुक्त झाला आणि एक स्वतंत्र देश या नात्याने स्वतःची राष्ट्रीय प्रतीके निर्माण करण्यास जोमाने प्रारंभ झाला. उदा. राष्ट्रध्वज, राष्ट्रगीत इत्यादी. त्याचसह स्वतःची स्वतंत्र राष्ट्रीय कालगणना असावी, असा विचार पुढे आला. तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या सल्ल्याने भारताच्या वैज्ञानिक आणि औद्योगिक मंडळाने नोव्हेंबर १९५२ मध्ये या विषयाचा अभ्यास करण्यासाठी ‘कॅलेंडर रिफॉर्म’ समितीची स्थापना केली. प्रसिद्ध भौतिक शास्त्रज्ञ डॉ. मेघनाथ साहा हे या समितीचे अध्यक्ष होते. भारतात त्या त्या वेळी वापरात असणारी सर्व पंचांगे पाहून भारतभरासाठी शासकीय पद्धतीवर आधारलेली आणि बिनचूक दिनदर्शिका सिद्ध करण्याचे काम या समितीवर सोपवण्यात आले. त्यानुसार या समितीने देशातील विविध पंचांगकर्त्यांना आणि जनतेला स्वतःची मते कळवण्याचे आवाहन केले. त्यानुसार समितीला एकूण ६० पंचांगे प्राप्त झाली. त्या सर्वांचा अभ्यास करून भारताच्या अधिकृत दिनदर्शिकेची रचना करण्यात आली. भारतीय सौर कालगणनेत वर्षारंभ २२ मार्च या दिवशी ठरवण्यात आला आहे. २२ मार्च हा विषुवदिन आहे. सूर्य प्रतिदिन सरासरी १ अंश पूर्वेकडे सरकतो आणि वर्षभरात त्याची एक प्रदक्षिणा पूर्ण करतो. ‘सूर्याचे हे भासमान भ्रमण आहे’, असे म्हणण्याचे कारण सूर्य स्थिर आहे. पृथ्वी स्वतःभोवती पश्‍चिमेकडून पूर्वेकडे फिरत असल्यामुळे आपल्याला ‘सूर्य उगवला अथवा मावळला’, असे वाटते.

भौतिक शास्त्रज्ञ डॉ. मेघनाथ साहा

२. प्रत्येक तिमाहीसाठी प्रारंभदिन

२२ मार्च या दिवशी सूर्य विषुववृत्तावर असल्याने दिवस-रात्र १२ घंट्यांची सम-समान असते. त्यानंतर सूर्य उत्तरेला सरकून २२ जून या दिवशी कर्क वृत्तावर येतो. तेथून त्याचे दक्षिणायन चालू होते आणि २३ सप्टेंबर या दिवशी सूर्य पुन्हा विषुववृत्तावर येतो. या दिवशी १२-१२ घंट्यांचा दिवस आणि रात्र असते. यानंतर सूर्य दक्षिणायन करत २२ डिसेंबर या दिवशी मकर वृत्तावर येतो. त्यानंतर सूर्य उत्तरायण करत २२ मार्च या दिवशी  विषुववृत्तावर येतो. अशा प्रकारे १ वर्ष पूर्ण होते. याच भासमान भ्रमणाशी निगडित दिवस हे प्रत्येक तिमाहीसाठी प्रारंभदिन ठरवून या दिनदर्शिकेची खगोलीय घटनांची सांगड घालण्यात आली आहे.

३. सौर कालगणनेसंदर्भात काही सरकारी निर्णय

३६५ दिवसांची मासाप्रमाणे विभागणी करतांना वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद हे सलग ५ मास ३१ दिवसांचे म्हणजे ३१ x ५ = १५५ दिवस. अश्‍विन, कार्तिक, अग्रहायण, पौष, माघ, फाल्गुन, चैत्र हे सलग ७ मास प्रत्येकी ३० दिवसांचे ३० x ७ = २१०. एकूण वर्षाचे ३६५ दिवस. लिप वर्षात मात्र चैत्र मास ३० दिवसांऐवजी ३१ दिवसांचा करतात. त्यामुळे ३६५ ऐवजी ३६६ दिवस लीप वर्षाचे धरतात. कॅलेंडर रिफार्म कमिटीने बनवलेली नवी कालगणना शासनाने चैत्र प्रतिपदा १८७९ म्हणजे २२ मार्च १९५७ या दिवसापासून स्वीकारली. त्या वेळी सरकारने पुढीलप्रमाणे निर्णय घेतला.

अ. भारताच्या गॅझेटवर इंग्रजी दिनांकासह भारतीय सौरदिनांक छापण्यात येईल.

आ. आकाशवाणीवरून (तसेच सध्या दूरदर्शनवरून) निरनिराळ्या प्रादेशिक वार्ता सांगतांना इंग्रजी दिनांकासह नवीन भारतीय सौरदिनांक सांगण्यात येईल.

इ. शासकीय कॅलेंडरवर इंग्रजी दिनांकांच्या जोडीने नवे भारतीय सौरदिनांकही दाखवण्यात येतील. भारतीय सौर दिनांक (राष्ट्रीय दिनांक) खालीलप्रमाणे वाचण्यात येतो.

उदा. : १ जानेवारी २०१८ या दिवशी राष्ट्रीय दिनांकावर ११ पौष १९४० असा वाचावा.

इतर राष्ट्रांशी पत्र व्यवहार करतांना, करार पत्रावर, भारतीय सौरदिनांकांचा उल्लेख असेल, तर ती कागदपत्रे वैध ठरतात. याशिवाय सौर दिनांक लिहिलेले धनादेश स्वीकारण्याचे स्पष्ट आदेश रिझर्व्ह बँकेने देशातील सर्व बँकांना दिलेले आहेत. आपल्यापैकी प्रत्येकाने ही सौर दिनदर्शिका वापरण्याचे ठरवल्यास निश्‍चित ती अधिकाधिक लोकांपर्यंत पोचू शकेल, अशी आशा वाटते.’

सौर कालगणनेतील महिने

चैत्र-वैशाख ही मराठी भाषेतील मासांची नावे भारतात सर्वत्र प्रचलित असल्याने मार्गशीर्ष वगळता अन्य मासांची नावे तीच ठेवण्यात आली आहेत. मार्गशीर्ष ऐवजी ‘अग्रहायण’ नाव दिले आहे.

या दिनदर्शिकेनुसार वर्षाचे महत्त्वाचे दिवस

२२ मार्च – चैत्र प्रतिपदा – विषुववृत्तावर सूर्य असतो
२२ जून – आषाढ प्रतिपदा – दक्षिणायन प्रारंभबिंदू
२३ सप्टेंबर – अश्‍विन प्रतिपदा विषववृत्तावर सूर्य
२ डिसेंबर – पौष प्रतिपदा – उत्तरायण प्रारंभ दिन

सौर कालगणनेतील ऋतू

सौरकालगणनेत मासाप्रमाणे खालीलप्रमाणे ऋतू असतात..

१. वसंत ऋतु – फाल्गुन-चैत्र
२. ग्रीष्म ऋतू – वैशाख-ज्येष्ठ
३. वर्षा – आषाढ-श्रावण
४. शरद – भाद्रपद-अश्‍विन
५. हेमंत – कार्तिक-मार्गशीर्ष (नवीन नाव ‘अग्रहायण’)
६. शिशिर – पौष-माघ

– श्री. भालचंद्र पांडकर (संदर्भ : ज्येष्ठ प्रज्योत, मे २०१९)