जनता आपत्काळात दिलेल्या सूचना गांभीर्याने घेत नाही. त्यामुळे अशी चेतावणी द्यावी लागते, हे जनतेला लज्जास्पद ! या संकटावर मात करण्यासाठी शासकीय आदेशांचे पालन करणे अपरिहार्य आहे.
भाग्यनगर (तेलंगण) – अमेरिकेत ‘दळणवळण बंदी’ (लॉकडाऊन) लागू करण्यासाठी सैन्याला पाचारण करण्यात आले होते. जर भारतात लागू करण्यात आलेली बंदी लोकांनी पाळली नाही, तर नाईलाज म्हणून राज्यात संचारबंदी लावण्यात येईल. तसेच हा आदेश न पाळणार्यांना पहाताक्षणी गोळ्या घालण्याचा आदेश द्यावा लागेल, अशी कठोर चेतावणी तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी दिली आहे. ‘अशी परिस्थिती येऊ देऊ नये’, अशी विनंतीही त्यांनी केली आहे.
राव म्हणाले की, राज्यातील नागरिकांनी कुठेही बाहेर जाऊ नये. काही अडचण असल्यास १०० क्रमांकावर संपर्क करावा. पोलीस संबंधितांच्या घरी साहाय्यासाठी येतील. सर्वांनी सरकारला सहकार्य करावे. जे लोक परदेशातून परतले आहेत आणि ज्यांना विलगीकरण होण्यास सांगितले आहे, त्यांनी सूचनांचे पालन करावे. तसे केले नाही, तर त्यांचे पारपत्र जप्त करण्यात येईल.