गोव्यात ३१ मार्चपर्यंत संचारबंदी लागू

घराबाहेर न पडण्याची हात जोडून केली विनंती

गोव्यात कोरोना विषाणू नसल्याच्या भ्रमात राहू नका ! – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

पणजी, २४ मार्च (वार्ता.) – गोव्यात २४ मार्च या दिवशी मध्यरात्रीपासून संचारबंदी लागू करण्यात आली आहे आणि विनाकारण घराबाहेर पडणार्‍यांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याची चेतावणी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी येथे ‘फेसबूक’च्या माध्यमातून लाईव्ह करण्यात आलेल्या एका पत्रकार परिषदेत केली. मंत्रीमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ही पत्रकार परिषद घेतली. पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितलेली काही महत्त्वाची सूत्रे पुढीलप्रमाणे आहेत.

१. गोव्यात आजपर्यंत कोरोनाबाधित एकही रुग्ण सापडलेला नाही; मात्र याचा अर्थ ‘गोव्यात कोरोना विषाणू नाही’, असा कोणीही घेऊ नये. गोव्यात कोरोना विषाणू आहे आणि कोरोनामुळे कोणीही बाधित झाल्याचे प्रकरण नोंद झालेले नाही. कोरोना विषाणूची कोणालाही बाधा झालेली नाही.

२. लोकांना मी हात जोडून विनंती करतो की, त्यांनी प्रतिबंधात्मक उपाययोजनांकडे गंभीरतेने पहावे. सर्वांनी घरीच थांबावे आणि शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करावे. २४ मार्च या एकाच दिवशी खरेदीसाठी मोकळीक दिली होती; मात्र आता बाहेर पडाल तर कारवाई करण्यात येणार आहे. राज्यातील जिल्हाधिकारी संचारबंदी आदेश काढणार आहे. प्रत्येकाने संचारबंदीचे १०० टक्के पालन होण्यासाठी सहकार्य करावे आणि तरच ३१ मार्चनंतर आम्ही सुरक्षित असू.

३. संचारबंदीमधून औषधालये आणि रुग्णालये यांना वगळण्यात आले आहे.

४. राज्यात ‘साथीचा रोग कायदा’ (एपिडॅमीक अ‍ॅक्ट) लागू करण्यात आला आहे. नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवर कठोर कारवाई करण्याचे अधिकार पोलिसांना देण्यात आले आहेत.

५. राज्यातील काही औषधनिर्मिती आस्थापनांना आस्थापन चालू करण्याची मुभा देण्यात आली आहे. ही आस्थापने महाराष्ट्र आणि कर्नाटक येथून कर्मचारी आणून आस्थापन चालू ठेवत असल्याचे लक्षात आले आहे. या प्रकारावर बंदी घालण्यात आली आहे.

६. बाहेरील राज्यांतून आलेली व्यक्ती कुठे काम करत असेल, तर त्याचा शोध घेण्यात येणार आहे.

७. राज्यात सर्व प्रकारची वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे.

८. राष्ट्रीयकृत अधिकोष (बँका) आणि एटीएम् चालू ठेवण्यास अनुज्ञप्ती देण्यात आली आहे.

९. रुग्णालयातील कर्मचार्‍यांना कामावरून ने-आण करण्यासाठी विशेष वाहतूक व्यवस्था करण्यात आली आहे.

१०. वीज खाते आणि पाणीपुरवठा खाते यांचे कर्मचारी कामावर असतील.

११. पत्रकारांनीही घराबाहेर पडू नये.

१२. गोवा डेअरीची दूध केेंद्रे चालू ठेवण्यात येणार आहेत.

१३. अत्यावश्यक अन्नपुरवठा करण्यासंबंधी शासन विचाराधीन आहे. याविषयीचे धोरण पुढील २ दिवसांत घोषित केले जाईल.

१४. ज्यांची निवासाची व्यवस्था नाही, अशांना आपत्कालीन व्यवस्थापन योजनेच्या अंतर्गत सिद्ध केलेल्या आश्रयस्थानात ठेवण्यात येणार आहे.

१५. पशूखाद्य, औषधे आणि अत्यावश्यक वस्तू यांच्याशी निगडित वाहनांना गोव्यात प्रवेश दिला जाणार आहे.

१६. राज्यात अतिरिक्त व्हेटींलेटर मागवण्यात आले आहेत.

१७. कोरोनाविषयी कोणतीही माहिती द्यायची असल्यास मुख्यमंत्री कार्यालय २४ घंटे चालू असणार आहे. यासाठी १२ सदस्यांचा एक गट सिद्ध करण्यात आला आहे. या ठिकाणी देखरेख असणार आहे.

१८. राज्यात ५०० लोकांचे घरी विलगीकरण (क्वारंटाईन) करण्यात आले आहे. यामधील एखादी व्यक्ती बाहेर फिरत असल्याचे आढळल्यास त्यांना शासकीय स्थळी ठेवण्यात येणार आहे.