पणजी – गोव्यात २४ मार्च या दिवशी मध्यरात्रीपर्यंत ‘जनता कर्र्फ्यू’ लागू होता आणि यानंतर २४ मार्चच्या मध्यरात्रीपासून ३१ मार्चपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. २४ मार्च या दिवशी ‘जनता कर्फ्यू’ च्या काळात राज्यात घडलेल्या काही वैशिष्ट्यपूर्ण घडामोडी पुढे देत आहे.
- गोव्यात ‘जनता कर्र्फ्यू’च्या काळात अत्यावश्यक सेवांसाठी सूट देऊन सकाळी ६ ते ११ वाजेपर्यंत अत्यावश्यक अन्नपुरवठा करणारी आस्थापने आणि सूपरमार्केट चालू ठेवण्यात आली होती. या काळात सामान खरेदी करण्यासाठी लोकांनी मार्केटमध्ये एकच गर्दी केली. ‘सोशल डिस्टंसिंग’चा (दोघांमध्ये १ मीटरचे अंतर पाळणे) नियमांचे पूर्णपणे उल्लंघन झाले. गोव्यात भाजीपाल्याच्या आयातीवर बंदी घातल्याने स्थानिक भाज्या वाढीव किमतीत विकण्यात आल्या.
- पणजी महानगरपालिकेचे महापौर उदय मडकईकर आणि महानगर मंडळाचे इतर सदस्य यांनी पणजी बाजारात येऊन बाजारात उपस्थित लोकांना गर्दी टाळण्याचे आवाहन केले. पणजी शहरातील काही दुकाने नियमबाह्यरित्या उघडी ठेवल्याने त्यांना पोलिसांनी टाळे ठोकले.
- गोवा पोलिसांकडून मार्गदर्शिका प्रसिद्ध करण्यात आली असून या मार्गदर्शिकेत म्हटले आहे की, ‘घरून बाहेर पडाल, तर तुम्हाला अडवून प्रश्न विचारून पुन्हा घरी पाठवण्यात येईल. सहकार्य न केल्यास शासकीय आदेशाचे उल्लंघन केल्याच्या कारणास्तव गुन्हा नोंद करून कारावासाची शिक्षा केली जाणार आहे. शासकीय आदेशाचे उल्लंघन केल्यास भारतीय दंड संहितेचे कलम १८८, कलम २७०, कलम २६९ आणि कलम २७१ अंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे.
- ‘जनता कर्फ्यू’च्या काळात पणजी शहरात ये-जा करणारी दुचाकी आणि चारचाकी वाहने अडवून पोलिसांनी संबंधितांच्या प्रवासाचे कारण विचारून नंतरच अनुमती दिली. फातोर्डा येथे पोलिसांनी नाकाबंदी करून वाहनांच्या वर्दळीवर नियंत्रण ठेवले.
- भिरोंडा, सत्तरी येथील सरपंच उदयसिंह राणे यांनी स्वत:च्या वाहनावर ध्वनीक्षेपक बसवून गावात फिरून कोरोनाविषयी जनजागृती केली.
- विरोधी पक्ष नेते दिगंबर कामत यांनी ‘घरीच थांबा’, असा संदेश देणारे ‘व्हॉट्सअॅप प्रोफाईल पिक्चर’ सिद्ध करून कोरोनाविषयी जागृती केली.
- गोव्यात १२ जणांना कोरोनाबाधित असल्याच्या संशयावरून रुग्णालयात विलगीकरण कक्षात (क्वारंटाईन) ठेवण्यात आले आहे.
- शासनाने अबकारी परवाना घेण्यासाठीची शेवटची दिनांक वाढवून ३१ मे २०२० केली आहे.
- ‘अफवांवर विश्वास ठेवू नका’, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले आहे.
- मंत्रीमंडळातील प्रत्येक मंत्र्याने त्यांचे एक मासाचे वेतन ‘कोवीड-१९’ साहाय्यनिधीला दिले आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.
- एखादी व्यक्ती परदेश किंवा परराज्य येथून गोव्यात येऊन कोणतीही प्रतिबंधात्मक उपाययोजना न करता, तसेच वैद्यकीय तपासणी न करता रहात असल्यास त्याची माहिती शासकीय हेल्पलाईनवर द्यावी, असे आवाहन सासष्टी तालुक्यातील काही पंचायतींनी पंचायत क्षेत्रातील लोकांना केले आहे.
- कोरोनाविषयी प्रकरणे हाताळण्यासाठी ३१ मार्चपर्यंत बाह्यरुग्ण विभाग बंद ठेवण्याची सूचना ‘इंडीयन मेडिकल असोसिएशन’ने त्यांच्या सदस्यांना दिली आहे.
कोरोनाविषयी प्रकरणे नोंदवण्यासाठी पुढील क्रमांकावर संपर्क साधावा
व्हॉट्सअॅप क्रमांक : ९६०७९ ०९५५९
दक्षिण गोवा नियंत्रण कक्ष : (८३२)२७ ९४१००
उत्तर गोवा नियंत्रण कक्ष : (८३२) २२ २५०८३
कोरोनाविषयी हेल्पलाईन : १०४
पोलीस हेल्पलाईन : १००
रग्णवाहिका : १०८
आपत्कालीन हेल्पलाईन : ११२
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाला आर्थिक सहकार्य करण्याचे आवाहन
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आर्थिक सहकार्य करण्याचे आवाहन गोवा शासनाने केले आहे. यासाठी शासनाने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या नवीन विधानसभा संकुलाच्या जागेत असलेल्या शाखेत नवीन अधिकोष खाते उघडले आहे. या खात्यात निधी जमा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
नवीन खात्याचा तपशील
Account No. – ३९२३५५४६२३८ (INR)
IFSC code – SBIN००१०७१९
MICR code – ४०३००२०५८
Address – New Assembly Complex, Panaji, Goa ४०१००१
गोव्याबाहेरील शेकडो प्रवासी मडगाव रेल्वेस्थानकावर अडकले
रेल्वे सेवा खंडित करण्यात आल्याने गोव्यात परराज्यातून आलेले १०० हून अधिक प्रवासी मडगाव रेल्वेस्थानकावर अडकून पडले आहेत. हे प्रवासी गोव्यात पर्यटन किंवा अन्य कामासाठी आले होते. रेल्वे सेवा पुन्हा चालू होईपर्यंत या अडकून पडलेल्या प्रवाशांना ‘शेल्टर होम’मध्ये ठेवण्याचे प्रयत्न चालू आहेत.
राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी राज्याच्या कोरोनाविषयी प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा घेतला आढावा
राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी राज्याने कोरोनाविषयी केलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांविषयी माहिती जाणून घेण्यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, आरोग्यमंत्री विश्वजीत राणे, राज्याचे मुख्य सचिव आदींसमवेत २४ मार्च या दिवशी एक बैठक घेतली. या बैठकीत मुख्यमंत्री डॉ. सावंत आणि आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी शासनाने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजनांविषयी माहिती दिली.
राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी बैठकीत प्रयोगशाळा, विलगीकरण (क्वारंटाईन)संबंधी केलेली सुविधा, लोकांची सुरक्षा, नागरिकांच्या गैरसुविधा टाळण्यासाठीच्या उपाययोजना आदींविषयी माहिती जाणून घेतली. ते म्हणाले, ‘‘कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रतिदिन उच्चस्तरीय समितीची बैठक घेऊन याविषयीची माहिती नागरिकांना द्यावी. संचारबंदीचा सर्वाधिक फटका बसलेल्यांना रेशन आणि अन्नधान्याचा पुरवठा करण्याविषयी शासनाने पावले उचलावीत. राज्यात लवकरात लवकर साथीच्या रोगाचे नमुने तपासणीसंबंधीची प्रयोगशाळा स्थापन करावी.’’
मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांचा गुढीपाडव्यासाठी संदेश
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गुढीपाडव्यानिमित्त शुभसंदेश देतांना ‘गोमंतकियांनी गुढीपाडवा घरीच राहून साजरा करावा. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दोघांमध्ये १ मीटरचे अंतर राखण्याच्या नियमाचे पालन करावे, असे म्हटले आहे.
गोव्याचे राज्यपाल सत्यपाल मलीक यांनीही गुढीपाडव्याच्या निमित्ताने सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत.