कोरोनाच्या संकटाचे गांभीर्य ओळखा आणि सहकार्य करा ! – जनतेला वारंवार आवाहन करण्याची शासनावर वेळ

सिंधुदुर्ग – कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शासन विविध प्रकारे प्रयत्न करत आहे; मात्र काही ठिकाणी या प्रयत्नांना हरताळ फासला जात आहे. जनतेला अजूनही कोरोनाच्या दुष्परिणामांची जाणीव नसल्याचे चित्र दिसत असून राज्यासह जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली असतांनाही काही जण याचे उल्लंघन करत आहेत. त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात रहाण्यासाठी पोलिसांना सर्व अधिकार देण्यात आले आहेत. त्यामुळे पोलिसांनी कडक धोरण अवलंबत संचारबंदीचे उल्लंघन करणार्‍यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे, तर काहींना उठाबशा काढण्याची शिक्षाही दिली आहे. एकूण कोरोनाच्या संकटाचे गांभीर्य जनतेकडून लक्षात घेतले जात नसल्याने ‘परिस्थितीवर मात करण्यासाठी शासनाला सहकार्य करा!’, असे वारंवार आवाहन करण्याची वेळ शासन आणि प्रशासनावर आली आहे.

समाजकंटकांची गय करू नका ! – पालकमंत्र्यांच्या पोलिसांना सूचना

आज आपण फार मोठ्या संकटाचा सामना करत आहोत. ‘कोरोना जा’, असे म्हणून कोरोना जाणार नाही, त्यासाठी आपली इच्छाशक्ती मजबूत असणे आवश्यक आहे. आपण काही नियम पाळले नाहीत; म्हणून आपणच आपल्यावर संचारबंदी लावून घेतली आहे. आपण वेळीच काटेकोरपणे वागलो असतो, तर पोलीस प्रशासनाला कठोर कारवाई करण्याची आवश्यकता भासली नसती. त्यांना दोष द्यायची आवश्यकता नाही. ही वेळ आली नसती. शासन, प्रशासनातील अधिकारी, पोलीस, डॉक्टर आपल्याला हेच सांगत आहेत की, ‘तुम्ही घरी रहा, आम्ही कोरोनाला पळवून लावतो’, एवढेपण आपण करू शकत नाही का ? याचा घराबाहेर पडणार्‍यांनी विचार करावा, असे सांगत पालकमंत्री उदय सामंत यांनी ‘जाणीवपूर्वक संचारबंदीचे नियम मोडणार्‍या समाजकंटकांची गय करू नये’, अशा स्पष्ट सूचना सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांना दिल्या.

संचारबंदीची कडक कार्यवाही चालू उल्लंघन केल्याप्रकरणी १० गुन्हे नोंद

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर राज्यासह जिल्ह्यातही ३१ मार्च २०२० पर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या संचारबंदीचे आदेश मोडल्याप्रकरणी १० गुन्हे नोंद करण्यात आले असून वाहने घेऊन फिरणार्‍यांवर एकूण १७० गुन्हे नोंद करण्यात आले आहेत.

संचारबंदीचे उल्लंघन करणार्‍यांना शिक्षा

परिस्थितीचे गांभीर्य लक्षात न घेता जिल्ह्यात काही ठिकाणी अतीउत्साही लोकांकडून संचारबंदीच्या निमयांचे उल्लंघन केले जात आहे. सांगूनही न ऐकणार्‍या अशा समाजविघातक लोकांवर पोलीस कारवाईचा बडगा उचलत असून मालवण येथे एका तरुणावर कारवाई करत पोलिसांनी त्याला उठाबशा काढायला लावल्या.

जिल्ह्याच्या बाहेरून आलेल्यांची माहिती घेण्याचे काम चालू

अन्य जिल्ह्यांतून आलेल्यांची माहिती घेण्याचे काम चालू आहे. जागतिक स्तरावरील संकटाचे गांभीर्य ओळखून जिल्ह्यातही ही महामारी पसरू नये, यासाठी ३१ मार्चपर्यंत लोकांच्या संपर्कात न येता प्रत्येकाने आपल्या घरी बसून काम करावे, असे आवाहन जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर यांनी केले.

कणकवली नगरपंचायतीवर कारवाई करा ! – प्रांताधिकार्‍यांकडे तक्रार

२३ मार्चला जमावबंदी आणि संचारबंदी असतांनाही कणकवली नगरपंचायतीमध्ये व्यापार्‍यांची बैठक झाली. या बैठकीचे वृत्त छायाचित्रांसह प्रसिद्ध झाले. त्यामुळे कणकवली नगरपंचायतीने जमावबंदी आणि संचारबंदी यांचा भंग केल्याची तक्रार नगरसेवक कन्हैया पारकर यांनी कणकवली प्रांताधिकार्‍यांकडे केली आहे.

सामाजिक प्रसारमाध्यमांवर चुकीची माहिती पसरवणार्‍यांवर गुन्हे नोंद होणार

कोरोनाविषयी सामाजिक प्रसारमाध्यमातून कोणत्याही प्रकारची अनधिकृत माहिती प्रसारित केल्यास अशा व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात येणार आहे. यापूर्वी अशा प्रकारे खोटी माहिती प्रसारित केल्याप्रकरणी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ३ जणांवर गुन्हे नोंद झाले आहेत. तरीही अनेक जण सामाजिक प्रसारमाध्यमातून चुकीची माहिती आणि अफवा पसरवत असल्याचे निदर्शनास आले आहे. अशा प्रकारे जिल्हाधिकारी आणि जिल्हा माहिती अधिकारी यांच्या नावाने एक संदेश सामाजिक प्रसारमाध्यमांतून प्रसारित होत आहे. हा संदेश कुणीही पुढे पाठवू नये. हा संदेश जिल्हा माहिती कार्यालयाने प्रसारित केलेला नाही, असे जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते यांनी स्पष्ट केले.

कणकवलीत पोलिसांनी खाक्या दाखवताच गर्दी पांगली

२३ मार्चला पोलिसांनी कणकवली शहरात ध्वनीवर्धकावरून संचारबंदीविषयी माहिती दिली. प्रतिदिन सकाळी ८ ते ११ या वेळेत जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी बाजारपेठ उघडी राहील, असे सांगण्यात आले; मात्र २४ मार्चला सकाळी ही वेळ उलटल्यानंतरही मोठ्या प्रमाणात नागरिक बाजारपेठेत तसेच इतरत्र फिरत होते. त्यामुळे पोलिसांनी कडक धोरण अवलंबत या नागरिकांना पिटाळून लावले. काहींना लाठीचा मारही दिला. पोलिसांचा आक्रमक पवित्रा पाहिल्यानंतर संचारबंदी मोडणार्‍यांनी पलायन केले.

कुडाळ शहराच्या सीमा बंद ! – नगराध्यक्ष आेंकार तेली

कोरोनाचा प्रादुर्भाव आणि त्याविषयी नागरिकांमध्ये असलेली उदासीनता पहाता कुडाळ शहराच्या सीमा बंद करत असल्याचे निवेदन कुडाळचे नगराध्यक्ष आेंकार तेली यांनी प्रांताधिकारी आणि कुडाळचे तहसीलदार यांना दिले. याविषयी प्रांताधिकारी, तहसीलदार, कुडाळ पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि नगराध्यक्ष यांची महत्त्वपूर्ण बैठक झाली.

जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यासाठी स्वयंसेवी संस्थांना सहकार्य करण्याचे आवाहन

जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यासाठी स्वयंसेवी संस्थांनी सहकार्य करावे, असे आवाहन सावंतवाडीचे तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी केले आहे. नगरपालिका आणि ग्रामीण क्षेत्रांत आवश्यकता भासल्यास घरोघरी जीवनावश्यक साहित्याचे वाटप करावे लागणार आहे. यासाठी स्वयंसेवी संस्था, गट, मित्रमंडळ, सामाजिक संस्था यांची सहकार्य करण्याची सिद्धता असल्यास त्यांनी ९८९२८८८६७५ या भ्रमणभाष क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

काही गावांत उत्स्फूर्तपणे संचारबंदीचे पालन

मालवण तालुक्यातील मसुरे गावातील एका वाडीमध्ये बाहेरील ग्रामस्थांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. बाहेरगावातील पाहुणे, नातेवाईक यांनाही ग्रामस्थांनी तसे कळवले आहे. वाडीत न येण्याविषयीचा फलक वाडीत येणार्‍या मार्गावर लावला आहे. वेंगुर्ले तालुक्यातील तुळस गावातील राऊळवाडीतील ग्रामस्थांनी स्वत:हून घरात रहाण्याचा निर्णय घेतला असून वाडीत बाहेरील व्यक्तींनी येऊ, नये असा फलकही लावला आहे. जीवनावश्यक साहित्य आणण्यासाठी वाडीच्या बाहेर एका चारचाकी वाहनाचे आणि दोन तरुणांचे नियोजन केले आहे.

ग्राहकांना उत्तम दर्जाचीच मिठाई द्या अन्यथा कायदेशीर कारवाई ! – शिवसेना उपजिल्हा संघटक शब्बीर मणियार

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार सध्या बंद आहे. २५ मार्चला हिंदु नववर्षदिन असल्याने मिठाई विक्रेत्यांना अनुमती देण्यात आली आहे; मात्र सध्याच्या परिस्थितीत अनेक दिवस दुकाने बंद असल्याने मिठाई खराब होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मिठाईच्या दुकानदारांनी ग्राहकांना उत्तम दर्जाची मिठाई द्यावी. खराब मिठाईची विक्री केल्यास शिवसेना कायदेशीर कारवाई करेल, अशी चेतावणी सावंतवाडी येथील शिवसेना उपजिल्हा संघटक शब्बीर मणियार यांनी दिली आहे.

जिल्हा परिषदेत एक खिडकी योजना लागू

जिल्हा परिषदेची आरोग्य यंत्रणा सतर्क असून जिल्हा परिषदेतील प्रशासकीय कामकाज यापुढे एक खिडकीद्वारे, तर प्रत्येक विभागात ५ कर्मचार्‍यांनी काम करण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी सहकार्य करण्याचे जिल्हा परिषद अध्यक्ष सौ. समिधा नाईक आणि उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर यांनी आवाहन केले आहे.