कोरोनाच्या संकटाचा कुणीही संधी म्हणून उपयोग करू नका ! – उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

मुंबई, २४ मार्च (वार्ता.) – मी पोलिसांचे अभिनंदन करतो की, त्यांनी लाखो रुपयांचा ‘मास्क’चा साठा पकडला आहे. आपण थोडा समजूतदारपणा दाखवला पाहिजे. आपण जगणे थांबवलेले नाही, तर अधिक जगण्यासाठी जगण्याच्या शैलीत काही पालट केला आहे. त्यामुळे कोरोनाच्या संकटाचा कुणीही संधी म्हणून उपयोग करू नका, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी २४ मार्च या दिवशी सायंकाळी ६.३० वाजता ‘व्हिडिओ कॉन्फरन्स’द्वारे जनतेला संबोधित करतांना केले.

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की,

१. पंतप्रधानांना मी देशांतर्गत विमानसेवा बंद करण्याची सूचना केली होती. त्यानुसार २४ मार्चच्या मध्यरात्रीपासून देशांतर्गत विमानसेवा बंद होत आहे. तसेच कर भरण्याचा कालावधी वाढवण्याची विनंतीही मी पंतप्रधानांकडे केली होती. त्यानुसार तो कालावधी वाढवण्यात आला आहे. केंद्रशासनाला केलेल्या सूचनेनुसार प्रयोगशाळांमध्ये वाढ करण्यात आली आहे. केंद्रशासनाकडून चांगले सहकार्य मिळत आहे.

२. जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक थांबवण्यात येत असल्याच्या अनेक तक्रारी माझ्याकडे आल्या आहेत. याविषयी कुणाला अडचण आली असेल, तर पोलिसांना १०० क्रमांकावर दूरध्वनी केल्यास त्यांना सहकार्य केले जाईल.

३. औषधे, कृषी विषयक मालाचे उत्पादन आणि वाहतूक अडवण्यात आलेली नाही; मात्र त्या आस्थापनाने वाहनांवर शिक्का चिकटवावा, तसेच कर्मचार्‍यांना ओळखपत्र द्यावे.

४. श्री सिद्धीविनायक मंदिर, श्री शिर्डी देवस्थान, लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यांसह अन्य काही स्वयंसेवी संस्था सहकार्यासाठी पुढे येत आहेत. त्यांचे मी स्वागत करतो. लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाकडून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. भविष्यात आपल्याला रक्ताचीही आवश्यकता भासेल.

५. पोलिसांनाही मी आवाहन करतो की, त्यांनी जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतुकीला अडथळा आणू नये; मात्र नागरिकांनीही यंत्रणेवर ताण येईल, असे वागू नये.

या महत्त्वाच्या टप्प्यात नागरिकांनी सहकार्य करावे.