छत्तीसगडमधील धर्मकार्याला आध्यात्मिक दिशा देणारा सद्गुरुद्वयींचा दौरा !

१. श्री. कमल बिश्वास यांना संतांच्या दौर्‍याची स्वप्नात मिळालेली पूर्वसूचना

छत्तीसगड येथील सनातन संस्थेच्या कार्याशी नव्याने जोडले गेलेले एक धर्मप्रेमी श्री. कमल बिश्वास यांना या दैवी दौर्‍याच्या ८ दिवस आधीच स्वप्नात एक दृश्य दिसले. त्यांना स्वप्नामध्ये श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदाताई सर्व साधक अन् धर्मप्रेमी यांना ‘छत्तीसगडमध्ये धर्मकार्य कसे वाढवायचे आणि साधना कशी करायची’, याविषयी मार्गदर्शन करत असल्याचे दिसले. त्यांनी हे स्वप्न कळवले, तेव्हा हा दौरा प्रत्यक्ष ठरलेला नव्हता; परंतु त्यानंतर २ दिवसांतच प.पू. डॉ. युधिष्ठिरलाल महाराजांच्या आमंत्रणावरून हा दौरा ठरला. यावरून ईश्वराचे सूक्ष्म नियोजन कसे असते आणि साधक अन् धर्मप्रेमी यांना आधीच कशी पूर्वसूचना मिळते, हे सर्वांच्या लक्षात आले.

शेकडो किलोमीटर दूर असणार्‍या संतांना सूक्ष्मातून ज्ञान मिळून त्यांनी त्यांचे शिष्य अधिवक्ता आशिष शर्मा यांना सद्गुरुद्वयींच्या सान्निध्यात रहाण्यास सांगणे

भिलाई येथील अधिवक्ता आशिष शर्मा हे या दौर्‍यात सद्गुरुद्वयींच्या समवेत होते. त्यांचे गुरु हिंगणघाट (जिल्हा वर्धा) येथील असून त्यांनी अधिवक्ता आशिष शर्मा यांना दूरभाष करून कळवले, ‘‘आता तुमच्यासह ज्या दोन महान विभूती आहेत, त्या म्हणजे साक्षात् श्री सरस्वतीमाता आणि श्री महालक्ष्मीमाता आहेत. त्यांचा कृपाशीर्वाद तुम्हाला लाभू द्या, तुम्ही अधिकाधिक त्यांच्या सान्निध्यात रहा.’’ ‘शेकडो किलोमीटर दूर असणार्‍या संतांना सूक्ष्मातून हे ज्ञान मिळणे आणि त्यांनी शिष्याला (अधिवक्ता आशिष शर्मा यांना) हे सांगणे’, हा दैवी योजनेचाच भाग असल्याचे लक्षात आले. दुसर्‍या दिवशी अधिवक्ता आशिष शर्मा यांना त्यांच्या गुरूंनी दूरभाषवरून  पुन्हा सांगितले, ‘‘हिमालयातील एक महान सद्गुरु असून या दोन्ही माताजी त्यांच्या शिष्या आहेत, असे मला दिसत आहे. या दोन्ही माताजी, म्हणजे देवींचेच रूप असून त्यांची आध्यात्मिक ऊर्जा पुष्कळ मोठ्या प्रमाणावर कार्यरत आहे.’’

२. संतांच्या चैतन्याने प्रभावित झालेले प्रतिष्ठित उद्योजक

अधिवक्ता आशिष शर्मा यांनी सकारात्मक राहून अनेक उद्योजकांना सद्गुरुद्वयींच्या दर्शनासाठी निमंत्रित केले. सद्गुरुद्वयींच्या सान्निध्यात आल्यावर सर्व उद्योजकांनी कृतज्ञता व्यक्त करत म्हटले, ‘‘येथे येऊन आमचे भाग्य उजळले. यापुढे आम्ही या ईश्वरी कार्याशी निरंतर जोडलेले राहू.’’

‘बिजनेस नेटवर्क इंटरनॅशनल’ या उद्योजक संघटनेचे उपाध्यक्ष आणि त्यांचे सहकारी प्रथमच सद्गुरुद्वयींच्या दर्शनासाठी आले होते. सद्गुरुद्वयींचे अस्तित्व आणि सहज बोलणे यांनी ते एवढे प्रभावित झाले की, त्यांनी अत्यंत नम्रतेने चरणांवर मस्तक टेकवून दर्शन घेतले. ‘अशा संतांचा आशीर्वाद मिळणे हे आमचे भाग्य आहे. यापुढे संस्थेच्या धर्मकार्यासाठी आमचे नेहमीच सहकार्य राहील’, असे त्यांनी सांगितले. तसेच गोव्यातील आगामी उद्योजक परिषदेच्या शिबिराच्या वेळी आश्रमाला भेट देण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली.

३. साधनेच्या संदर्भात मार्गदर्शन घेण्यासाठी आलेले छत्तीसगडचे उच्च पदस्थ अधिकारी !

छत्तीसगड राज्याचे एक उच्च पदस्थ अधिकारी हे स्वतः अत्यंत साधे आणि आध्यात्मिक वृत्तीचे आहेत. ते सकाळीच सद्गुरुद्वयींना भेटण्यासाठी आले होती. त्यांनी ‘साधना कशी करावी आणि स्वभावदोष निर्मूलन प्रक्रिया कशी राबवावी’, हे आत्मीयतेने समजून घेतले. सद्गुरुद्वयींच्या मार्गदर्शनानुसार नियमित साधना करण्याचा निश्चय केला.

४. कुठलीही योजना नसतांना छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांची अत्यंत भावपूर्ण आणि सकारात्मक वातावरणात झालेली भेट !

छत्तीसगड येथील ‘अखिल भारतीय घरवापसी अभियाना’चे प्रमुख तथा भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष श्री. प्रबल प्रतापसिंह जुदेव यांच्या पुढाकारातून राज्याचे माननीय मुख्यमंत्री श्री. विष्णुदेव साय यांची सद्गुरुद्वयींची भेट झाली. या भेटीत मुख्यमंत्र्यांनी जवळजवळ १ घंटा वेळ देऊन सद्गुरुद्वयींशी विविध विषयांवर चर्चा केली. छत्तीसगडचा सांस्कृतिक वारसा, तेथील प्राचीन मंदिरे, ऐतिहासिक आणि आध्यात्मिक परंपरा यांवर चर्चा झाली. ‘सनातन संस्था ज्या प्रकारे आध्यात्मिक संशोधन करत आहे आणि दौरे करून आध्यात्मिक महत्त्व येणार्‍या पिढीला कळावे, यासाठी वस्तूंचे जतन आणि संवर्धन करत आहे, त्याविषयी शासनाकडून पूर्ण सहकार्य केले जाईल’, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. भेटीनंतर श्री. प्रबल प्रतापसिंह जुदेव यांच्याशी बोलताना मुख्यमंत्री स्वतः म्हणाले, ‘‘या भेटीमुळे मला पुष्कळ मोठ्या प्रमाणावर सकारात्मक ऊर्जा मिळाली आणि ही भेट अत्यंत उत्तम झाली.’’
मा. मुख्यमंत्र्यांनी दोन्ही सद्गुरुद्वयींचे संतत्व ओळखून उत्स्फूर्तपणे त्यांचा छत्तीसगडमधील पारंपरिक शाल आणि सन्मानचिन्ह देऊन सन्मान केला.

हे वाचा → Chhattisgarh CM Vishnu Deo Sai : छत्तीसगडमधील सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारशाच्या जतनासाठी राज्यशासन सनातन संस्थेला साहाय्य करणार !

५. श्री. प्रबल प्रतापसिंह जुदेव यांना सद्गुरुद्वयींविषयी आलेली अनुभूती

मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर श्री. प्रबल प्रतापसिंह जुदेव यांनी दूरभाषवर सांगितले, ‘‘मुख्यमंत्र्यांच्या भेटीपूर्वी मी अतिशय थकलेलो होतो; परंतु या भेटीनंतर मला सद्गुरुद्वयींच्या माध्यमातून प्रचंड प्रमाणात आध्यात्मिक ऊर्जा आम्हाला लाभली. धर्मकार्य करण्यासाठी आणि मुख्यमंत्र्यांच्या भेटीच्या वेळी पुष्कळ मोठ्या प्रमाणात सकारात्मक ऊर्जा अन् एक वेगळीच अनुभूती मिळाली. त्यांच्या या दौर्‍याच्या कालावधीत अशा संतांचा सहवास लाभणे, हे आमचे परम भाग्य आहे.’’

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांना घरवापसीच्या कार्यक्रमाचे निमंत्रण देतांना श्री. प्रबल प्रतापसिंह जुदेव

६. घरवापसीच्या महाअनुष्ठानासाठी सद्गुरुद्वयींना भावपूर्ण निमंत्रण

श्री. प्रबल प्रतापसिंह जुदेव यांनी छत्तीसगडमध्ये सहस्रो हिंदूंची ‘घरवापसी’ (अन्य धर्मातून हिंदु धर्मात परत घेणे) केली आहे. बस्तर आणि दंतेवाडा या ठिकाणी २ मासांनंतर घरवापसीचा एक मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. त्या कार्यक्रमासाठी त्यांनी सद्गुरुद्वयींना अत्यंत आदरपूर्वक निमंत्रित केले. ‘सद्गुरुद्वयींच्या पावन उपस्थितीत हे धर्मकार्य व्हावे’, असा त्यांचा भाव होता.

श्री. सुनील घनवट

७. धर्मप्रेमी आणि साधक यांनी अनुभवलेला उच्च कोटीचा भावसोहळा !

छत्तीसगड राज्यात सनातन संस्थेच्या सद्गुरुद्वयींचा असा दौरा प्रथमच आयोजित झाला होता. साधक आणि धर्मप्रेमी यांच्यासाठी मार्गदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. हे मार्गदर्शन, म्हणजे एक उच्च कोटीचा ‘भावसोहळा’च ठरला. प्रत्येक धर्मप्रेमी मनोभावना व्यक्त करतांना श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांना ‘गुरुमाता’ अशा भावपूर्ण शब्दांनी संबोधित करत होता. हा शब्द उच्चारताच सर्वांची भावजागृती होत होती. ‘साक्षात् सद्गुरुमातेचे अन् देवीचे प्रत्यक्ष दर्शन लाभत असून आपण देवीसमोरच आत्मनिवेदन करत आहोत’, या भावाने सर्वजण साधना, त्यातील अडचणी आणि प्रश्न मनमोकळेपणाने विचारत होते. या कार्यक्रमानंतर २ दिवस सर्व साधक आणि धर्मप्रेमी एका वेगळ्याच भावावस्थेत होते. ‘गुरुपौर्णिमेच्या आधीच गुरूंनी ही मोठी कृपाप्रसादाची ऊर्जा प्रदान केली’, अशी कृतज्ञता सर्वांनी व्यक्त केली.

८. ‘छत्तीसगडमध्ये धर्मकार्य विस्ताराचा ईश्वरी काळ आला आहे’, असे श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी सांगणे

साधक आणि धर्मप्रेमी यांना मार्गदर्शन करतांना श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ म्हणाल्या, ‘‘हा दौरा पूर्णतः ईश्वरी नियोजनानुसार झाला आहे. छत्तीसगड येथे निर्माण झालेले नवीन साधक आणि धर्मप्रेमी, तसेच वाढलेले हिंदूसंघटनाचे कार्य पहाता आता या ठिकाणी धर्मकार्य व्यापक प्रमाणात वाढण्यासाठी ईश्वरानेच हा काळ निश्चित केला आहे, असे लक्षात येते.’’ त्यांच्या या आशीर्वादाने एकप्रकारे छत्तीसगडमध्ये धर्मकार्याचा संकल्प सोडला गेला, असे जाणवले.

‘हा संपूर्ण दौरा, म्हणजे छत्तीसगडच्या भूमीवर ईश्वरी चैतन्याचा झालेला महावर्षावच होता’, यासाठी सर्व साधक आणि धर्मप्रेमी सद्गुरुद्वयींच्या चरणी अनंत कोटी कृतज्ञता व्यक्त करत आहेत !

– श्री. सुनील घनवट, महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक, हिंदु जनजागृती समिती. (२४.७.२०२६)