पाणंद आणि शेत मार्ग यांच्या दुतर्फा केलेल्या वृक्षरोपणाच्या संगोपनाचे दायित्व ग्रामपंचायतींचे !

  मुंबई, २५ जुलै (वार्ता.) – ‘हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र’ या अभियानाच्या अंतर्गत वर्ष २०२६ ते २०४७ या कालावधीत राज्यात ३३ कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट महाराष्ट्र शासनाने घेतले आहे. या अभियानाच्या अंतर्गत पाणंद (शेतापर्यंत जाण्यासाठी किंवा दोन शेतांमधून जाणारा अरुंद सार्वजनिक मार्ग) आणि शेतावर जाणारे रस्ते यांच्या दुतर्फा झाडे लावण्याचे निश्चित करण्यात आले आहे. ‘या ठिकाणी वृक्षारोपण केल्यावर पुढील १० वर्षे त्यांचे संगोपन ग्रामपंचायतीने करावे’, असे निर्देश शासनाने दिले आहेत.

जिल्हा नियोजन समिती, खनिकर्म निधी, सामाजिक दायित्व निधी, स्वयंसेवी संस्था, ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण यांच्या योगदानातून हे वृक्षारोपण केले जाणार आहे. महत्त्वाचे म्हणजे वृक्षलागवडीचे मूल्यांकन केवळ लागवड केलेल्या रोपांच्या संख्येवरून न करता जिवंत रोपांचे प्रमाण, वृक्षवाढ, हरित आच्छादन आणि पर्यावरणीय परिणाम यांच्या आधारे करण्यात यावे, असे निर्देश राज्यशासनाने दिले आहेत. राष्ट्रीय वन नीतीप्रमाणे राज्याच्या एकूण भौगोलिक क्षेत्राच्या ३३ टक्के क्षेत्रावर वन असणे आवश्यक आहे. सद्यस्थितीत महाराष्ट्रात वृक्षाच्छादनाचे प्रमाणे २१.२५ टक्के इतकेच आहे. त्यामुळे ‘हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र’ अभियानाच्या अंतर्गत ही मोहीम राबवली जात आहे.