गोदावरी नदीकाठावरील गावांमध्ये पूरस्थिती उद्भवण्याची शक्यता !

  • ५५ सहस्र क्युसेकने विसर्ग चालू !

  • नदीकाठावरील गावांना धोक्याची चेतावणी

वैजापूर (छत्रपती संभाजीनगर) – नाशिक जिल्ह्यात गेल्या ३ दिवसांपासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे गंगापूर, दारणा, पालखेडसह विविध धरणांमधील पाण्याचा साठा वेगाने वाढला आहे. परिणामी नांदूर-मधमेश्वर बंधार्‍यातून जायकवाडी धरणाच्या दिशेने गोदावरी नदीपात्रात तब्बल ५५ सहस्र ७७८ क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग चालू असून गोदावरी नदी दुथडी भरून वहात आहे. त्यामुळे गोदाकाठावरील गावांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

नदीपात्रात पाण्याचा विसर्ग वाढल्याने पाण्याची पातळी अधिक वाढून पूरस्थिती गंभीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. संभाव्य धोका लक्षात घेता वैजापूर तहसील आणि आपत्ती व्यवस्थापन प्रशासन सतर्क झाले असून गोदाकाठावरील गावांना धोक्याची चेतावणी देण्यात आली आहे. ‘उपअभियंता सचिन ससाणे यांनी नागरिकांनी नदीपात्रात किंवा पाण्याच्या प्रवाहाजवळ जाणे टाळावे आणि प्रशासनाच्या सूचनांचे तंतोतंत पालन करावे’, असे आवाहन केले आहे.