पंढरपूर कॉरिडॉरचे काम कुणावरही अन्याय न करता योग्य पुनर्वसन करून पूर्ण करणार ! – देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

आषाढी एकादशीच्या निमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणीची महापूजा !

(‘कॉरिडॉर’ म्हणजे प्रशस्त आणि मोठा मार्ग)

आषाढीच्या दिवशी पंढरपूर येथे वारकर्‍यांचा अलोट जनसागर…

पंढरपूर (जिल्हा सोलापूर) – श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी प्रतिवर्षी वाढणारी भक्तांची गर्दी पहाता त्यांना उत्तम सोयी उपलब्ध करून देण्यासाठी मंदिर परिसर विकासाचे काम पंढरपूर कॉरिडॉरच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. कुणावरही अन्याय न करता सर्वांचे योग्य पुनर्वसन करून हे काम येत्या अडीच वर्षांत पूर्ण करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे दिली.

सत्कारप्रसंगी डावीकडून पालकमंत्री जयकुमार गोरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सौ. अमृता फडणवीस, मानाचे वारकरी बाबासाहेब माने, सौ. प्रभावती माने

आषाढ शुक्ल एकादशीच्या निमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा मुख्यमंत्री फडणवीस यांनी सपत्नीक, तसेच मानाचे वारकरी बाबासाहेब माने, सौ. प्रभावती माने यांच्या समवेत केली. त्यानंतर श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समितीच्या वतीने झालेल्या सत्कारप्रसंगी ते बोलत होते. या वेळी पालकमंत्री जयकुमार गोरे यांसह विविध मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की,

१. मागील काळात चालू केलेले मंदिर विकासाचे काम बहुतांश पूर्ण झाले आहे. पांडुरंगाचे दर्शन घेण्यासाठी लाखो लोक येतात. येथे अत्यंत अल्प जागा आहे. आता मोठी जागा सिद्ध करणे आवश्यक आहे.

२. कॉरिडॉर विकासामुळे येथील व्यावसायिकांचा व्यवसाय वाढेल, नागरिकांना घरे मिळतील, भाडेकरूंची व्यवस्था होईल, अशा पद्धतीने त्याची रचना करण्यात आली आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर कितीही भाविक आले, तरी अतिशय उत्तम व्यवस्था या ठिकाणी होईल.

३. या वेळी वारीने नवा उच्चांक गाठला आहे. यावर्षी २५ किलोमीटरहून अधिक लांबीची दर्शनासाठी रांग लागली होती.

४. चंद्रभागेचे पाणी स्वच्छ राहील, याची काळजी घेण्यात आली आहे. या वेळी पालकमंत्र्यांनी वाळवंटात अतिशय सुंदर व्यवस्था केल्यामुळे तेथील कचरा, विष्ठा आदी संपूर्ण स्वच्छता झाली आहे.

५. आपला प्रतिनिधी म्हणून मी केलेली ही पूजा संपूर्ण महाराष्ट्रातील आणि जगभरातील पांडुरंगाच्या भक्तांच्या वतीने केलेली पूजा आहे.

कौंडण्यपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी संस्थानला १ लाख रुपयांचा धनादेश देतांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर मान्यवर

प्रारंभी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समितीचे सह-अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी प्रास्ताविकात म्हटले की, विठुमाऊलीच्या दर्शनासाठीच्या रांगेचे अत्यंत चांगल्या प्रकारे व्यवस्थापन केले आहे. दर्शन रांगेत ५० ते ६० सहस्र वारकरी असले, तरी पालकमंत्र्यांनी राज्यशासन आणि प्रशासन यांच्या माध्यमातून अत्यंत चांगल्या सुविधा केल्यामुळे दर्शन सुसह्य झाले.

मंदिर समितीचे सह-अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना श्री विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती भेट देण्यात आली.

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘श्री विठ्ठल निर्मल दिंडी’ पुरस्कार वितरण  !

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पाणी, स्वच्छता, पर्यावरण संरक्षण, प्लास्टिकमुक्त वारी, वृक्षसंवर्धन आदी विषयांवर प्रबोधन करणार्‍या दिंड्यांना ‘श्री विठ्ठल निर्मल दिंडी’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यामध्ये प्रथम क्रमांक श्री विठ्ठल-रुक्मिणी संस्थान कौंडण्यपूर, द्वितीय क्रमांक वारकरी धर्मसंकीर्तन सेवा प्रतिष्ठान, जालना आणि तृतीय क्रमांक गोर्‍हेकर संस्था, आळंदी देवाची यांना पुरस्कार अन् धनादेश देण्यात आला.