आज कारगिल विजय दिवस !

वर्ष १९९९ मध्ये भारतात लडाखमधील उत्तर कारगिल जिल्ह्यातील पर्वतशिखरांवर पाकिस्तानी सैन्याने घुसखोरी करून चौक्या बसवल्या होत्या. त्यांना त्या ठिकाणावरून हाकलून लावण्यासाठी भारतीय सैन्याने पराक्रमाची शर्थ केली. याच कारगिल युद्धामध्ये भारताने पाकिस्तानवर मिळवलेल्या विजयाचे स्मरण करण्यासाठी प्रतिवर्षी २६ जुलै या दिवशी ‘कारगिल विजय दिवस’ साजरा केला जातो.
प्रारंभीला पाकिस्तानी सैन्याने युद्धात असलेला स्वतःचा सहभाग नाकारला. त्यांनी असा दावा केला की, ते युद्ध काश्मिरी आतंकवाद्यांमुळे घडले; पण मृतांची संख्या, युद्धकैदी आणि तत्कालीन पाकिस्तानी पंतप्रधान नवाज शरीफ, तसेच लष्करप्रमुख परवेझ मुशर्रफ यांनी दिलेल्या निवेदनांमुळे त्यांचे पितळ उघडे पडले. तत्कालीन पाकिस्तानी जनरल अशरफ रशीद याच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानी निमलष्करी दलांचा सहभाग सगळ्या आतंकवादी कारवायांमध्ये होता, हे समजले.
कारगिल विजय दिवसाचा इतिहास
वर्ष १९७१ मध्ये झालेल्या भारत-पाकिस्तान युद्धानंतर दोन्ही लष्करी दलांमध्ये तुलनेने न्यून प्रमाणात थेट सशस्त्र संघर्ष झाले होते. त्या वेळी दोन्ही राष्ट्रांनी आपल्या आसपासच्या पर्वतरांगांवर लष्करी चौक्या स्थापन केल्या होत्या. सियाचीन ग्लेशियरवर नियंत्रण मिळवण्यासाठी दोन्ही राष्ट्रांचे प्रयत्न चालू होते. वर्ष १९८० च्या दशकामध्ये काही लष्करी चकमकीही झाल्या होत्या. या सूत्रावरून वर्ष १९९० च्या दशकात काश्मीरमध्ये फुटीरतावादी कारवायांनी जोर पकडला. त्यामुळे दोन्ही राष्ट्रांमध्ये तणाव आणि संघर्ष वाढतच गेला. पुढे वर्ष १९९८ मध्ये दोन्ही देशांनी अणूचाचण्या केल्या. त्या वेळी युद्धाचे वातावरण सिद्ध झाले होते.
‘ऑपरेशन बद्री’ मोहीम
पुढे फेब्रुवारी १९९९ मध्ये दोन्ही देशांनी लाहोर घोषणापत्रावर स्वाक्षरी केली. त्यामध्ये काश्मीर संघर्षावर शांततापूर्ण आणि द्विपक्षीय तोडगा काढण्याचे आश्वासन देण्यात आले होते. वर्ष १९९८ ते १९९९ च्या हिवाळ्यामध्ये पाकिस्तानी सशस्त्र दलातील काही घटक गुप्तपणे नियंत्रण रेषेच्या, म्हणजेच भारतीय प्रदेशामध्ये पाकिस्तानी सैन्य आणि निमलष्करी दलांना प्रशिक्षण देतांना अन् भारतात घुसखोरी करतांना आढळले. ही घुसखोरी परतवून लावण्याच्या मोहिमेला ‘ऑपरेशन बद्री’ असे सांकेतिक नाव देण्यात आले. पाकिस्तानी घुसखोर काश्मीर आणि लडाख येथील सियाचीन ग्लेशियरवर ताबा मिळवण्यासाठी प्रयत्नात होते. भारताला काश्मीर वादावर वाटाघाटी करण्यास भाग पाडण्याचा घुसखोरांचा हेतू होता. त्यासाठी काश्मीर प्रदेशात भारताविरुद्ध बंडखोरी वाढवण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न होता.
‘ऑपरेशन विजय’
घुसखोरीच्या स्वरूपाची आणि व्याप्तीची फारशी माहिती भारतीय सैन्याकडे नव्हती; पण तेव्हा त्या भागातील भारतीय सैन्याने घुसखोरांना जिहादी मानून काही दिवसांत त्यांना हाकलून लावण्याची घोषणा केली; पण त्यानंतर नियंत्रण रेषेवर इतरत्रही मोठ्या घुसखोरीची माहिती मिळाली, तेव्हा घुसखोरांनी वापरलेल्या रणनीतींमध्ये भेद आहे, असे भारतीय सैन्याच्या लक्षात आले. त्यामुळे पाकिस्तानने केलेली ही आक्रमणाची योजना पुष्कळ मोठ्या प्रमाणात असल्याचे भारताच्या लक्षात आले. पाकिस्तानी घुसखोरांनी आतापर्यंत भारताच्या एकूण क्षेत्र सामान्यतः १३० कि.मी. ते २०० कि.मी. एवढ्या क्षेत्रफळावर घुसखोरी केली होती. म्हणून तत्कालीन भारत सरकारने पाकिस्तानचा अधर्मी उद्देश हाणून पाडण्यासाठी ‘ऑपरेशन विजय’ या मोहिमेला प्रतिसाद दिला. या मोहिमेमध्ये २ लाख भारतीय सैन्य सीमेवर तैनात करण्यात आले.
कारगिल विजय दिवस !
अनेक दिवसांच्या सशस्त्र चकमकींनंतर २६ जुलै १९९९ या दिवशी पाकिस्तानी सैन्याला भारताच्या सीमारेषेवरून पूर्णपणे हाकलून लावण्यात यश आले. तेव्हाच हे युद्ध संपले. त्यामुळे हा दिवस ‘कारगिल विजय दिवस’ म्हणून साजरा केला गेला. कारगिलच्या या युद्धात भारतीय सशस्त्र दलातील ५२७ सैनिक हुतात्मा झाले. भारताने पाकिस्तानवर मिळवलेला विजय म्हणून ‘कारगिल विजय दिवस’ हा प्रतिवर्षी साजरा केला जातो.
(साभार : साप्ताहिक ‘हिंदुस्थान पोस्ट)
सनातन संस्थेच्या श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचा छत्तीसगड राज्याचा दैवी दौरा !
छत्तीसगडमधील धर्मकार्याला आध्यात्मिक दिशा देणारा सद्गुरुद्वयींचा दौरा !
पाप-पुण्य
जंतरमंतरवरील ‘नौटंकी’ : ‘वोक टूलकिट’चाच आविष्कार !
शरिराचा वरचा किंवा खालचा भाग येथे आलेली सूज न्यून करण्यासाठी करावयाचा सर्वसाधारण व्यायाम आणि त्याचा योग्य क्रम !
अमेरिकेच्या भारतविरोधी कारवाया !