मालाड (मुंबई) येथे जगन्नाथ रथयात्रेला मूळ मार्गाने नेण्यास मुंबई उच्च न्यायालयाची अनुमती

मशिदीसमोरून जात होता मार्ग !

मुंबई – मुंबई उच्च न्यायालयाने २५ जुलै या दिवशी ‘जय जगन्नाथ चॅरिटेबल ट्रस्ट, मालाड’ यांना भगवान श्री जगन्नाथ यांच्या रथयात्रेस मूळ नियोजित मार्गाने मिरवणूक काढण्यास अनुमती दिली. २२ जुलै या दिवशी मालवणी पोलीस ठाण्याने ट्रस्टला (‘न्यासा’ला) हजरत अली मशिदीसमोरील मार्गाने रथयात्रा नेण्यास बंदी घातली होती. तसेच यात्रेत अत्यल्प भाविकांचा सहभाग असावा, अशी अट घातली होती. या संदर्भात न्यासाने पोलीस ठाण्यात लेखी निवेदन देऊन पुनर्विचाराची विनंती केली; मात्र लेखी निर्णय न मिळाल्याने न्यासाने याचिका प्रविष्ट केली.

सुनावणीच्या वेळी अधिवक्ता कौशिक म्हात्रे यांनी न्यासाची बाजू मांडली. त्यांनी मद्रास उच्च न्यायालयाच्या रामस्वामी उदयार विरुद्ध जिल्हाधिकारी या निर्णयाचे उदाहरण देत ‘सार्वजनिक रस्ता नागरिकांसाठी समान असून केवळ मार्गावर धार्मिक स्थळ असल्यामुळे धार्मिक मिरवणुकीवर बंदी घालता येत नाही’, असा युक्तीवाद मांडला. या युक्तीवादाची नोंद घेत न्यायालयाने रथयात्रेला अनुमती दिली.

आदेश मिळाल्यानंतर रथयात्रेला उत्साहात प्रारंभ झाला. सहस्रो भाविकांच्या उपस्थितीत रथयात्रा शांततापूर्ण, शिस्तबद्ध आणि भक्तीमय वातावरणात पार पडली.

ट्रस्टने या निर्णयाविषयी न्यायालयाचे, प्रकरणात प्रभावी युक्तिवाद करणारे अधिवक्ता कौशिक म्हात्रे यांचे आणि शांततेत रथयात्रा पार पाडण्यासाठी सहकार्य करणार्‍या पोलीस अन् शासकीय यंत्रणा यांचेही आभार व्यक्त केले आहेत.