Bangladesh Terror Attack Threat : ढाका (बांगलादेश) येथे जगन्नाथ रथयात्रेत बाँबस्फोट करण्याचा प्रयत्न उघड

टाइम बाँब न फुटल्याने मोठा अनर्थ टळला !

ढाका (बांगलादेश) – येथे २४ जुलैला दुपारी भगवान जगन्नाथाच्या ‘बाहुडा रथयात्रे’च्या मार्गामध्ये टाइम बाँबद्वारे स्फोट घडवण्याचा प्रयत्न उघडकीस आला आहे. हा बाँब न फुटल्याने आणि  सुरक्षा यंत्रणांच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला. या यात्रेत सहस्रोच्या संख्येने भाविक सहभागी झाले होते.

ही यात्रा ढाक्यातील प्रसिद्ध स्वामीबाग इस्कॉन मंदिर परिसरातून ढाकेश्वरी मंदिरात बाहुडा रथयात्रा जात होती. या यात्रेत सहस्रो हिंदु भाविक सहभागी झाले होते. रथयात्रा मुख्य मार्गावरून पुढे गेल्यानंतर रस्त्याच्या कडेला एका संशयास्पद पिशवीत हा टाइम बाँब ठेवण्यात आल्याचे तिथे तैनात असलेल्या एका कर्तव्यदक्ष पोलीस अधिकार्‍याच्या निदर्शनास आले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तातडीने परिसर रिकामा केला आणि भाविकांना सुरक्षित स्थळी हलवले. यानंतर पोलिसांच्या बाँब शोधक आणि नाशक पथकाने घटनास्थळी धाव घेत अत्यंत कौशल्याने हा बाँब निष्क्रीय केला.

भगवान जगन्नाथांचीच कृपा ! – भाविकांची कृतज्ञता

या घटनेनंतर ढाका आणि आसपासच्या परिसरातील हिंदु समुदायामध्ये तीव्र भीतीचे अन् चिंतेचे वातावरण पसरले आहे. इस्कॉनचे अधिकारी आणि स्थानिक भाविक यांनी सांगितले की, भगवान जगन्नाथांच्या कृपेनेच हा बाँब वेळेत फुटला नाही आणि सहस्रो निष्पाप लोकांचे प्राण वाचले.

पोलिसांकडून अन्वेषण चालू !

बांगलादेश पोलिसांनी या प्रकरणी अज्ञातांच्या विरोधात गुन्हा नोंदवला असून परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरणाच्या आधारे अन्वेषण चालू केले आहे. यामागे कोणत्या मूलतत्त्ववादी संघटनेचा हात आहे का ?, याचा शोध घेतला जात आहे.

संपादकीय भूमिका

  • आता बाँब फुटला नाही; मात्र पुढच्या वेळी तो फुटण्यासाठी जिहादी आतंकवादी प्रयत्न करतील,  हे त्यांच्या मानसिकतेवरून लक्षात घेऊन हिंदूंनी सतर्क रहाणे आवश्यक आहे !
  • बांगलादेशातील हिंदूंचे रक्षण अन्य कुणी करणार नसल्याने आता त्यांनीच संघटित होऊन त्यासाठी प्रयत्न केला पाहिजे !