ISI Terror Module : देहलीत आतंकवादी आक्रमण करण्याचा कट पोलिसांनी उधळला

  • पंजाब आणि देहली येथून ४ खलिस्तानी आतंकवाद्यांना अटक

  • पाककडून मिळाली होती शस्त्रे

अटक करण्यात आलेले आतंकवादी

नवी देहली – देहली पोलिसांच्या विशेष शाखेने पाकिस्तानची गुप्तचर संस्था  आय.एस्.आय.च्या (‘इंटर सर्व्हिसेस इंटेलिजन्स’च्या – आंतरसेवा गुप्तचर यंत्रणेच्या) सांगण्यावरून देहली-एन्.सी.आर्. (नॅशनल कॅपिटल रिजन – ‘राष्ट्रीय राजधानी क्षेत्र ) येथे आतंकवादी आक्रमण करण्याचा कट रचणार्‍या ४ खलिस्तानी आतंकवाद्यांना अटक केली. यातील तिघांना पंजाबमधून, तर एकाला देहलीतून अटक करण्यात आली. ते आय.एस्.आय.चा हँडलर (भारतात आतंकवादी कारवाया करण्यासाठी नियंत्रण आणि संचालन करणारे लोक) शहजाद भट्टी याच्या थेट संपर्कात होते आणि त्याच्याच सूचनेनुसार काम करत होते. त्यांच्याकडून २ परदेशी पिस्तूल, ९ जिवंत काडतुसे आणि ५ भ्रमणभाष संच जप्त करण्यात आले.

१. अमृतसरच्या मजीठा रोड भागातून शुभदीप सिंह उपाख्य विशाल याला अटक करण्यात आली. त्याने दिलेल्या माहितीतून गुरजंत सिंह उपाख्य ऋषी आणि साजन सिंह उपाख्य  हनी यांनाही पंजाबमधून अटक केली. चौथा आतंकवादी गगनप्रीत याला देहलीतून अटक केली.

२. शुभदीपने सांगितले की, तो पाकिस्तानात बसलेल्या आय.एस्.आय.च्या हँडलरच्या  संपर्कात होता आणि ड्रोनच्या माध्यमातून पाकिस्तानातून शस्त्रे आणि अमली पदार्थ मागवत असे. गगनप्रीतला हँडलर्सनी देहलीतील धार्मिक स्थळांची रेकी (माहिती गोळा करणे) करण्याचे काम सोपवले होते. तो या ठिकाणांचे व्हिडीओ बनवून पाकिस्तानात पाठवत होता. तसेच त्याला देहलीतील पोलीस ठाण्यांवर गोळीबार करण्याचे आदेशही देण्यात आले होते.

३. पंजाबच्या सीमावर्ती भागात रहाणारे हे आतंकवादी पाकिस्तानातून ड्रोनद्वारे पाठवली जाणारी शस्त्रे आणि अमली पदार्थ स्वीकारत असत आणि पुढे ती पाठवत असत.

संपादकीय भूमिका

पाकला नष्ट केल्याविना भारतातील आतंकवाद नष्ट होणार नाही, हे पुनःपुन्हा स्पष्ट होत असतांना भारत पाकला कधी नष्ट करणार ?