(म्हणे) ‘संयुक्त राष्ट्रांच्या ठरावानुसार काश्मीरचे सूत्र सोडवावे !’ – Pakistan

पाकची जागतिक समुदायाकडे मागणी

पाकिस्तानचे राष्ट्रपती आसिफ अली झरदारी आणि पंतप्रधान शाहबाज शरीफ

इस्लामाबाद (पाकिस्तान) -पाकिस्तानी राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांनी काश्मीर सूत्रांवरून संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या ठरावांनुसार काश्मीर समस्येचे निराकरण करण्याच्या प्रयत्नांना पाठिंबा देण्याची मागणी जागतिक समुदायाकडे केली आहे. भारतविरोधी अपप्रचार करण्याच्या उद्देशाने पाकिस्तान प्रतिवर्षी १३ जुलै या दिवशी  कथित ‘काश्मीर हुतात्मा दिन’ साजरा करतो. यानिमित्ताने पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि राष्ट्रपती आसिफ अली झरदारी यांनी दिलेल्या संदेशात वरील मागणी करण्यात आली आहे.

१. पंतप्रधान शरीफ यांनी म्हटले की, पाकिस्तान सरकार जम्मू-काश्मीरमधील जनतेला अतूट राजकीय, राजनैतिक आणि नैतिक पाठिंबा घोषित करत आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या ठरावांमध्ये नमूद केल्यानुसार स्वतःच्या आत्मनिर्णयाचा अविभाज्य अधिकार मिळवण्यासाठी काश्मिरी जनतेच्या न्याय्य लढ्यात आम्ही पूर्ण एकजुटीने त्यांच्या पाठीशी उभे आहोत.

२. राष्ट्रपती आसिफ अली जरदारी म्हणाले की, ९ लाख भारतीय सशस्त्र दलांनी काश्मीरवर नियंत्रण कायम ठेवत काश्मिरींना ओलीस ठेवले आहे.

संपादकीय भूमिका

पाकने अशा प्रकारची कितीही मागणी जगाकडे केली, तरी काश्मीर भारताचा अविभाज्य भाग होता, आहे आणि असणार आहे, हे त्याने लक्षात ठेवण्यासह पाकचे स्वतःचे अस्तित्व टिकवण्याकडे लक्ष द्यावे !