छत्रपतींच्या मंदिरासाठीचा निधी औरंगजेबाच्या कबरीला दिल्या जाणार्‍या निधीपेक्षाही अल्प !

रत्नागिरी येथे हिंदु जनजागृती समिती आयोजित पत्रकार परिषद

‘श्री शिवराजेश्वर मंदिर’ सिंधुदुर्ग किल्ला, मालवण जि. सिंधुदुर्ग  (चित्रावर क्लिक करा)

रत्नागिरी – हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सिंधुदुर्ग किल्ल्यावरील ‘श्री शिवराजेश्वर मंदिरा’साठी तब्बल ५५ वर्षांनंतर शासनाने वार्षिक निधी ३ सहस्र रुपयांवरून १ लाख रुपये केला. तथापि हा निधीही क्रूरकर्मा औरंगजेबाच्या कबरीच्या देखभालीच्या खर्चापेक्षाही अल्प आणि आहे. औरंगजेबाच्या कबरीच्या देखभालीसाठी वर्षाला २ लाख ५५ सहस्र १६० रुपये (वर्ष २०२२-२३) आणि महाराष्ट्राच्या आराध्य दैवताला मात्र १ लाख रुपये, हे अत्यंत क्लेशदायक अन् दुर्दैवी आहे. हा छत्रपती शिवरायांचा अवमान आहे.

‘श्री शिवराजेश्वर मंदिर’मधील छत्रपती शिवरायांची मूर्ती
डावीकडून श्री. सोहम खानविलकर, बोलतांना अधिवक्ता अमित काटे, सर्वश्री संजय जोशी, गोविंद भारद्वाज, दीपेश वारंग आणि मयूर भितळे

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महसूल विभागाच्या प्रधान सचिवांना महाराजांच्या मंदिराला प्रत्येक महिन्याला ५० सहस्र रुपयांचा निधी देण्याचे निर्देश दिले होते; मग हा निधी अल्प कसा काय झाला ? प्रशासकीय अधिकार्‍यांच्या लेखी छत्रपती शिवरायांचे मूल्य औरंगजेबापेक्षा अल्प आहे का, असा संतप्त प्रश्न हिंदु जनजागृती समितीचे जिल्हा समन्वयक श्री. गोविंद भारद्वाज यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला.

रत्नागिरी येथे झालेल्या या परिषदेला शिवचरित्र कथाकार श्री. अरविंद बारस्कर, ‘गड किल्ले संवर्धन प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्या’चे रत्नागिरी विभाग प्रमुख श्री. मयूर भितळे, ‘गड किल्ले संवर्धन प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्या’चे जिल्हाध्यक्ष श्री. दीपेश वारंग, अधिवक्ता अमित काटे, ‘श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान’चे श्री. सोहम खानविलकर, महाराष्ट्र मंदिर महासंघाचे राज्य समन्वयक श्री. संजय जोशी आदी मान्यवर उपस्थित होते. गेल्या अनेक वर्षांपासून हिंदु जनजागृती समिती, हिंदु विधीज्ञ परिषद आणि शिवप्रेमी हा निधी वाढवण्यासाठी संघर्ष करत आहेत.

क्रूरकर्मा औरंगजेबाच्या कबरीसाठी दिला जाणारा निधी तात्काळ बंद करा ! – संजय जोशी, महाराष्ट्र मंदिर महासंघ

नावाला ‘छत्रपती शिवराय’ म्हणत निधर्मीवादाची ढोलकी वाजवणारी अनेक सरकारे यापूर्वी येऊन गेली; मात्र कुणी काहीच केले नाही. आताचे हिंदुत्ववादी सरकार छत्रपती शिवरायांच्या विचारांचे सरकार आहे. त्यामुळे या निधीमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. हा स्तुत्य निर्णय आहे; मात्र हा वाढीव निधीही तुटपुंजा आहे, हे आम्हाला सरकारच्या निदर्शनास आणून द्यायचे आहे. महाराजांच्या मंदिराकडे दुर्लक्ष करणार्‍या संबंधित अधिकार्‍यांवर तात्काळ कठोर कारवाई झाली पाहिजे. तसेच महाराष्ट्रावर चालून आलेला आक्रमक क्रूरकर्मा औरंगजेबाच्या कबरीसाठी दिला जाणारा निधी तात्काळ बंद करून तो निधीही शिवकार्यासाठी वळवावा, अशीही आम्ही मागणी करत आहोत.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराविषयी प्रशासनाची अनास्था क्लेशदायक ! – दीपेश वारंग, जिल्हाध्यक्ष, गड किल्ले संवर्धन प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य

छत्रपती राजाराम महाराजांनी स्वतः बांधलेल्या सिंधुदुर्ग किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराला जर सरकार अपेक्षित निधी उपलब्ध करून देत नसेल, तर यापेक्षा महाराष्ट्राचे दुर्दैव कोणते आहे ? जगभरात ज्या महाराजांची युद्धनीती शिकवली जाते, अभ्यासली जाते, त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराविषयी प्रशासनाची अनास्था क्लेशदायक आहे. हिंदवी स्वराज्याचे स्मारक म्हणजे छत्रपती शिवरायांचे गड किल्ले आहेत. त्यांचे संवर्धन करण्याचा प्रयत्न शिवप्रेमी संघटना करत आहेत; मात्र त्यासाठी शासनानेही पुढाकार घेऊन सहाय्य केले पाहिजे. आवश्यक निधी उपलब्ध करून दिला पाहिजे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरासाठी तुटपुंजा निधी मिळणे, निषेधार्ह ! – अधिवक्ता अमित काटे, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान

ज्या छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आमची ओळख हिंदु म्हणून राहिली, ज्यांच्यामुळे हिंदूंची मंदिरे सुरक्षित राहिली, त्यांच्या मंदिरासाठी सरकारकडे हात पसरावे लागत आहेत, हे दुर्दैवी आहे. एकीकडे सरकार छत्रपती शिवरायांच्या समुद्रातील स्मारकासाठी कोट्यवधी रुपये खर्च करत आहे; मात्र दुसरीकडे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरासाठी तुटपुंजा निधी देत आहे, हे निषेधार्ह आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी छत्रपती शिवरायांच्या स्मारकाची नित्य पूजा केली जाते. त्यासाठी प्रतिदिन केवळ एका हाराचा वर्षभरासाठीचा खर्च जवळपास ३ सहस्र ६०० रुपये येतो. दुरुस्ती, डागडुजी स्वच्छता इत्यादी गोष्टींसाठी येणारा खर्च वेगळा आहे. त्यामुळे सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरासाठी निधी वाढवून द्यावा, अशी आमची मागणी आहे.

संपादकीय भूमिका

छत्रपती शिवाजी महाराजांच्या एकमेव मंदिराची उपेक्षा कधी थांबणार ?