Ukraine-Russia War : युक्रेनने रशियाच्या १२ प्रदेशांवर डागले शेकडो ड्रोन !

रशियाचे प्रत्युत्तर

कीव्ह (युक्रेन) – रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध चालू होऊन आता जवळजवळ साडेचार वर्षे झाली आहेत. अशात रशियाने नव्याने आरोप केला की, युक्रेनने रशियाचे १२ प्रदेश, तसेच क्रिमिया द्वीपसमूह यांच्यावर मोठे आक्रमण केले. त्याने शेकडो ड्रोन डागले. या संघर्षात आतापर्यंतच्या सर्वांत मोठ्या आक्रमणांपैकी हे एक आहे.

रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने स्पष्ट केले की, त्याच्या हवाई दलाने युक्रेनचे ६६० ड्रोन पाडले. या आक्रमणात रशियाचे १२ विविध प्रदेश, तसेच क्रिमिया द्वीपकल्प, काळा समुद्र आणि अझोव्ह समुद्र यांना लक्ष्य करण्यात आले.

गेल्या काही महिन्यांतील रशिया-युक्रेन युद्धाची स्थिती अशी…!

युक्रेन रशियाच्या तेल उत्पादन सुविधा आणि ऊर्जा केंद्रे यांना लक्ष्य करत आहे. या युक्रेनी धोरणामुळे रशियाचा इंधन पुरवठा आणि सैनिकी रसद विस्कळीत झाली आहे. परिणामी रशियाच्या युद्धभूमीवरील हालचाली मंदावल्या आहेत आणि राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्यावरील दबाव वाढला आहे, असे बोलले जात आहे.

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदिमिर झेलेंस्की यांनी ‘४०-दिवसीय प्रभाव मोहीम’ राबवण्याचे आदेश दिल्यानंतर काही घंट्यांतच हे मोठे आक्रमण झाले. रशियाला युद्ध संपवण्यास भाग पाडण्यासाठी आक्रमणे तीव्र करणे, हा यामागचा उद्देश असल्याचे मानले जाते. अमेरिकेचे शांततेचे प्रयत्न वर्षभर करूनही ठोस परिणाम न मिळाल्याने झेलेंस्की यांनी हे पाऊल उचलल्याचेही सांगितले जात आहे.

रशियाचेही प्रत्युत्तर !

रशियाने युक्रेनच्या खार्कीव्ह भागावर आक्रमण केले. प्रांताचे प्रादेशिक प्रमुख ओलेह सिनिएहुबोव्ह यांनी माहिती दिली की, गेल्या २४ तासांत रशियन आक्रमणांमध्ये २ नागरिक ठार, तर ७ जण घायाळ झाले. युक्रेनच्या हवाई दलाने सांगितले की, त्याने रशियाचे १८९ पैकी १७४ ड्रोन हवेतच नष्ट केले.