(म्हणे) ‘भारताने औषधांच्या खोक्यातून अफगाणिस्तानला ड्रोन पाठवले !’ : Pakistan Defense Minister Khwaja Asif

अफगाणिस्ताने पाकमधील ‘इस्लामिक स्टेट’च्या तळांवर ड्रोनद्वारे आक्रमण केल्यावर पाकच्या संरक्षणमंत्र्यांचा आरोप

पाकचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ

इस्लामाबाद (पाकिस्तान) –  गेल्या आठवड्यात अफगाणिस्तानमधील तालिबान सरकारच्या सैन्याने पाकिस्तानच्या २ प्रांतांमधील इस्लामिक स्टेटच्या तळांवर ड्रोनद्वारे आक्रमण केले होते. या यशस्वी ड्रोन आक्रमणांवरून पाकिस्तानी लोक म्हणत आहेत की, भारताने अफगाणिस्तानमध्ये औषधांच्या खोक्यात ठेवून ड्रोन पाठवले आणि नंतर त्यांचा वापर पाकिस्तानच्या विरोधात करण्यात आला. याविषयी पाकचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांना पत्रकार अबसार आलम यांनी एका कार्यक्रमात प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, यात १०० टक्के सत्य असू शकते. मला यात शंका वाटत नाही. मी तर म्हणतो की, ते लपवून नाही, तर उघडपणे अफगाणिस्तानमध्ये शस्त्रे पाठवत असतील.

गेल्या आठवड्यात भारताने ५ टन औषधे अफगाणिस्तानला पाठवली आहेत. यात काही नवीन नाही; कारण भारत मानवी साहाय्य म्हणून अफगाणिस्तानला आवश्यक औषधे पाठवत असतो. याच मालिकेचा भाग म्हणून गेल्या आठवड्यातही औषधे अफगाणिस्तानला पाठवण्यात आली. भारताने अफगाणिस्तानला औषधे पाठवल्यानंतर दुसर्‍याच दिवशी पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा आणि बलुचिस्तान येथे इस्लामिक स्टेटच्या आतंकवादी तळांना लक्ष्य करत ड्रोनद्वारे आक्रमणे करण्यात आली. यावरूनच पाकने औषध पाठवण्याचा संबंध ड्रोन आक्रमणाशी जोडला.

संपादकीय भूमिका

  • गेली ३५ वर्षे भारतात आतंकवादी, शस्त्र आणि स्फोटके पाठवून घातपात करून लक्षावधी लोकांचा प्राण घेणार्‍या पाकने भारतावर असा आरोप करणे हास्यास्पदच होय !
  • जर भारताने ड्रोन पाठवले असतील आणि त्याचा वापर इस्लामिक स्टेटच्या आतंकवाद्यांच्या विरोधात होत असेल, तर त्यात चुकीचे काय ?