युद्धात अमेरिकेला पाठिंबा देणार्‍या ‘नाटो’च्या सदस्य देशांना उत्तरदायी धरले पाहिजे ! – इराण

(‘नाटो’ म्हणजे जगातील २९ देशांचा सहभाग असलेली एक सैनिकी संघटना)

इस्माईल बघाई

तेल अविव/तेहरान/वॉशिंग्टन – इराणविरुद्धच्या आक्रमणांमध्ये अमेरिका आणि इस्रायल यांना पाठिंबा देणार्‍या ‘नाटो’च्या सदस्य देशांना त्यांच्या कृतीसाठी उत्तरदायी धरले पाहिजे, अशी भूमिका इराणने घेतली आहे. इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बघाई म्हणाले की, नाटोचे प्रमुख मार्क रुटे यांनी स्वतः स्वीकारले की, इटली आणि रोमानिया यांनी इराणविरुद्धच्या सैनिकी कारवाईत अमेरिकेला पाठिंबा दिला होता.

हॉर्मुझ सामुद्रधुनीत एका व्यापारी नौकेवर अज्ञातांकडून आक्रमण

हॉर्मुझच्या सामुद्रधुनीत एका व्यापारी नौकेवर अज्ञातांनी आक्रमण केले. ही नौका ओमानच्या किनारपट्टीजवळ असतांना हे आक्रमण झाले. या घटनेत कुणीही घायाळ झाले नाही.

इराणने संयुक्त राष्ट्रांचा प्रस्ताव फेटाळला

हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतून नौकांची सुरक्षित वाहतूक सुनिश्चित करण्यासाठी नवीन सागरी मार्ग, विशेषतः बाहेर पडण्याचे मार्ग सिद्ध करण्याचा संयुक्त राष्ट्रांचा प्रस्ताव इराणने फेटाळून लावला. नियमांचे पालन न करता जाणार्‍या नौकांवर कारवाई केली जाईल, असे इराणने म्हटले आहे. दुसरीकडे हॉर्मुझच्या सामुद्रधुनीवर कोणत्याही एका देशाचे नियंत्रण अमेरिका स्वीकारणार नाही, असे अमेरिकेने स्पष्ट केले आहे.

लेबनॉनमध्ये इस्रायलची आक्रमणे चालूच ?

लेबनॉनमधील नबातीहजवळ एका चारचाकी वाहनावर झालेल्या आक्रमणात तिघे जण ठार झाले. हे आक्रमण इस्रायलने केल्याचे सांगितले जात आहे; परंतु इस्रायली सैन्याने मात्र याविषयी अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.