स्वसंवादाचा अभ्यास : स्वत:ला घडवण्याची पहिली पायरी !

दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये प्रकाशित प्रस्तुत लेखकाच्या ‘मनाचे श्लोक’ (२६ ते २८ मार्च आणि ३० मार्च २०२६ या कालावधीत), तसेच आद्यशंकराचार्य रचित ‘आत्मा-मन संवाद’ (२१ एप्रिल २०२६ या दिवशी) यांविषयीच्या लेखांमध्ये त्या त्या ‘संतांनी मांडलेला साधनासापेक्ष स्वत:चा स्वत:शी साधलेला संवाद’, हा विषय होता. स्वत:ला स्वत: काही सांगणे म्हणजे स्वसंवाद. ही संज्ञा केवळ उल्लेखित लेखात मांडलेल्या विषयांच्या सापेक्षच असू शकते, असे नाही. वाचकांकडून आलेल्या विविध प्रतिसादांचा विचार करता ‘स्वसंवाद’ या विषयाचा मानसशास्त्र, तसेच चेताविज्ञान यांच्या दृष्टीकोनातून थोडा अभ्यास झाला, तर लाभकारी ठरेल, असे वाटले; म्हणून हा लेखनप्रपंच…

भाग १ 

१. परिचय

प्रतिदिनच्या जीवनात अनेक प्रकारचे विचार आणि वाक्ये आपण विविध प्रकारे स्वत:शी बोलत असतो. उदाहरणार्थ ‘डावीकडील वळणावर वळून गेले की, उजवीकडे पहिल्या दुकानात जायचे आहे’; ‘आता दूध तापत आहे, झाकून ठेवले, तर आई ओरडेल किंवा म्हणेल एक गोष्ट धड करत नाही’; ‘मला पास (उत्तीर्ण) होणे शक्य नाही. पुष्कळ अभ्यास बाकी आहे’; ‘साहेबांना मी आता सांगणार, ‘साहेब, मला हे जमत नाही. माझ्यावरच कामे घालता. बाकीच्यांना मोकळे सोडता’; ‘देवा, मुलगा परीक्षेला गेला आहे. त्याला तूच पास करू शकतोस’, इत्यादी इत्यादी. विषयसापेक्ष पाहिल्यास त्या त्या विषयाच्या अनुषंगाने एक विचार उत्पन्न झाल्यावर पाठोपाठ त्यावर आधारित पुढचे विचार येतच रहातात, त्यांना काहीही फाटे फुटतात. मग काही स्वस्तुतीकडे जातात, काही कुणावर तरी मनातच राग प्रकट करू लागतो, इत्यादी इत्यादी. मग त्यातून काही निष्कर्ष मनात उत्पन्न होतात. त्या आधारे परत काही मनात होत रहाते. या सगळ्यांना ‘स्वसंवाद’ ही संज्ञा आहे. एक दिवस स्वत:चे निरीक्षण केले, तरी या मानसक्रियेची प्राथमिक ओळख होईल. स्वसंवादाचा ‘तो’ स्वसंवाद आहे’, असा परिचय होणे आणि मग त्याचे निरीक्षण होत असणे महत्त्वाचे आहे.

२. व्याख्या

स्वतःशी संवाद साधणे किंवा आपल्या मनात सतत चालणारा विचार आणि शब्दांचा प्रवाह.

वरील विवरणातून लक्षात आले असेलच की, ही एक प्रक्रिया असून तिची व्याप्ती मोठी आहे, म्हणजे तिला विविध पैलू इत्यादी आहेत. मुळातच स्वसंवाद या विषयाचे अनेक पैलू आहेत; परंतु विस्तारभयास्तव या लेखात सर्व अतीसंक्षिप्तपणे मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

३. प्रकिया अभ्यासण्याचे मूलभूत दृष्टीकोन

डॉ. दुर्गेश सामंत

एकच क्रिया विविध प्रकारे अभ्यासली किंवा तिच्याकडे पाहिले जाऊ शकते.

अ. मानसशास्त्रानुसार : स्वसंवाद ही एक मानसिक, म्हणजे मनात होत असणारी प्रक्रिया असून त्यात व्यक्ती स्वत:चे, स्वतःच्या भावनांचे विश्लेषण करते, निर्णय घेते आणि स्वतःला सूचना देते. बर्‍याचदा हे अव्यक्त, म्हणजे मनातल्या मनात असते, तर कधी व्यक्ती स्वत:च स्वतःशी मोठ्याने बोलते.

आ. चेताविज्ञानानुसार : सर्वांत महत्त्वाचे जे आपण नीट समजून घ्यायला हवे ते, म्हणजे मूलत: स्वसंवाद ही जैविक क्रिया आहे, जसे हृदयक्रिया, रक्ताभिसरण या जैविक क्रिया आहेत. आपल्यामध्ये जीवन असतांना या क्रिया होत असतात. यातून स्वसंवाद क्रियेची अनिवार्यता समजून घ्यावी. यासह आपण स्वतःशी बोलण्याचा (स्वसंवादाचा) वेग हा प्रत्यक्ष बोलण्यापेक्षा अधिक असतो, याचीही नोंद घ्यावी. एखाद्याने एखादे वाक्य बोलताच क्षणार्धात त्यासंबंधीचा विचार होऊन लगेच उत्तर दिले जाणे, हे नित्याचे उदाहरण आहे.

४. अन्य जैविक क्रिया आणि स्वसंवाद यांतील अंतर

स्वसंवाद ही एक जैविक क्रिया असूनही ती हृदयविकार किंवा रक्ताभिसरण यांसारख्या क्रियांपासून काही विशिष्ट गोष्टींमध्ये वेगळी ठरते. त्यातील काही अंतर समजून घेणे महत्त्वाचे आहे.

अ. नियंत्रण सापेक्ष : हृदय धडधडणे, रक्ताभिसरण या अनैच्छिक क्रिया आहेत. त्यावर स्वतःचे नियंत्रण नाही, म्हणजे त्यांचे चालणे अथवा बंद पडणे स्वतःच्या हातात नाही. आपण हृदय किंवा रक्ताभिसरण एका मिनिटासाठी थांबवू शकत नाही. स्वसंवाद ही क्रिया अर्ध-स्वैच्छिक आहे. जरी विचार येणे नैसर्गिक म्हणून अनिवार्य वाटले, तरी आपण जाणीवपूर्वक स्वतःचा स्वसंवाद ‘पालटू’ शकतो किंवा त्याला दिशा देऊ शकतो, म्हणजेच स्वसंवादावर काही प्रमाणात नियंत्रण असू शकते.

आ. अवयवसापेक्ष भिन्नता : इतर प्रत्येक जैविक क्रियेसाठी एक विशिष्ट स्थूल अवयव आहे. उदा. रक्तासाठी हृदय, रक्ताभिसरणासाठी वाहिन्या. स्वसंवादासाठी कोणताही एक स्वतंत्र अवयव नाही. ही मेंदूच्या विविध भागांच्या समन्वयातून निर्माण होणारी एक ‘प्रणाली’ आहे. या प्रणालीला आपण मन म्हणतो. जसा वाद्य आणि त्यातून येणारे संगीत यांचा संबंध आहे, तसा मेंदू आणि मन यांचे आहे.

इ. परिणामांची व्याप्ती : इतर जैविक क्रिया त्या त्या कार्यापुरत्या मर्यादित आहेत; पण स्वसंवाद संपूर्ण शरिरावर परिणाम करू शकतो. उदा. स्वसंवाद भीतीदायक असेल, तर हृदयात धडधडते, घाम फुटतो इत्यादी.

ई. ‘जैविक’ असूनही ‘सांस्कृतिक’ प्रभाव : हृदय किती गतीने चालावे, यासाठी संस्कृतीची सामाजिक मूल्यांची आवश्यकता नसते, ते उपजत असते; परंतु स्वसंवाद कोणत्या भाषेत आणि कसा असावा किंवा असतो, यांवर आपण ज्या समाजात रहातो, जे वाचतो आणि जे ऐकतो त्याचा परिणाम होतो. म्हणूनच स्वसंवाद ही एक जैव-सामाजिक (बायो-सोशल) क्रिया आहे.

५. स्वसंवादाचा व्यक्तीच्या जीवनावरील प्रभाव

प्रत्येक व्यक्तीमध्ये काही गुण-दोष असतात. त्यानुसार तिचे जीवन चालते. या गुण-दोषांनुसार त्याच्या मनामध्ये विचार येतात, म्हणजे स्वसंवाद होत असतो, तसेच उलट बाजूने स्वसंवादानुसार गुण-दोष यांमध्ये परिवर्तनही होत असते. त्यामुळे योग्य स्वसंवादाचा व्यक्तीला लाभ होतो. उदाहरणार्थ भावनांचे नियमन, आत्मविश्वास वाढणे इत्यादी अयोग्य स्वसंवादामुळे हानी होते. उदाहरणार्थ चिंता, भीती वाटणे, नैराश्य इत्यादी. सर्वांत महत्त्वाचे, म्हणजे स्वसंवादाचा शारीरिक क्रियांवर परिणाम होत असतो. उदाहरणार्थ अधिक नकारात्मक संवादामुळे शरिरातील ‘कोर्टिसोल’ (तणावाचे संप्रेरक) वाढते, ज्यामुळे रक्तदाब किंवा हृदयाचे विकार होऊ शकतात.

प्रस्तुत लेखकांचे वरील प्रस्तावनेतील उल्लेखित लेख वाचण्यासाठी क्लिक करा –

  आधुनिक विज्ञानाच्या दृष्टीतून मनाचे श्लोक !  

 → आधुनिक विज्ञानाच्या दृष्टीतून मनाच्या श्लोकांचा मेंदूत होणारा परिणाम !

 → आधुनिक विज्ञानाच्या दृष्टीतून मनाच्या श्लोकांमुळे मेंदूला चुकीच्या कृतीपासून वाचवण्यासाठी होणारा प्रयत्न !

 → आधुनिक विज्ञानाच्या दृष्टीतून ‘मनाचे श्लोक’ सर्वसामान्य व्यक्तीसह साधक आणि संन्यासी यांना उपयुक्त ! 

 → आद्यशंकराचार्यकृत उद्बोधक आत्मा आणि मन संवाद

६. परिवर्तनीयता

समजून घ्यायचे महत्त्वाचे, म्हणजे स्वसंवाद ही रक्ताभिसरणासारखीच अनिवार्य क्रिया आहे; पण तिच्यामध्ये परिवर्तन करता येते. त्यामुळे इतर जैविक क्रियांचे आपण केवळ ‘साक्षीदार’ असू शकतो; पण स्वसंवादाचे आपण ‘दिग्दर्शक’ बनू शकतो. या भेदामुळेच अन्य जैविक क्रियांच्या तुलनेत स्वसंवादाला पालटले जाऊ शकते. ही क्षमता योग्य प्रकारे उपयोगात आणली, तर स्वतःचे व्यक्तीमत्त्व विकासित होऊ शकते. इतकेच नव्हे, तर ती आपल्याला पूर्णत्वाकडे नेण्यास साहाय्यक होऊ शकते.

अर्थात् हे होण्यासाठी स्वसंवादाचे प्रकार, त्या त्या प्रकारच्या स्वसंवादामुळे होणारे परिणाम, त्यात असलेला मेंदूचा सहभाग समजून घेणे यांसारखी सूत्रे महत्त्वाची ठरतात. त्यासापेक्ष मग सामान्यत: काय होत असते, त्यासंबंधीचे चेताविज्ञान काय सांगते, हे समजले, तर व्यक्ती स्वत:ला नीट समजून घेऊन स्वत:साठी अधिक चांगल्या प्रकारे प्रयत्न करू शकेल.

या संदर्भात पाहूया, उद्या प्रसिद्ध होणार्‍या क्रमशः लेखात !

(क्रमशः)

– आधुनिक वैद्य (डॉ.) दुर्गेश सामंत (वय ६५ वर्षे), एम्.डी. (मेडिसीन), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (५.५.२०२६)

भाग २ वाचण्यासाठी क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/1042872.html