आज २१ एप्रिल या दिवशी असणार्या ‘आद्यशंकराचार्य जयंती’च्या निमित्ताने
साधनासापेक्ष स्वतःच मनाला काही सांगणे, अशा प्रकारचे लिखाण अनेक संतांनी केले आहे. ‘मनाचे श्लोक’ हे या प्रकारचे एक ठळक उदाहरण झाले. ‘मनाचे श्लोक’ याचे आधुनिक चेताविज्ञान आणि आधुनिक मानसशास्त्र यांच्या दृष्टीकोनातून (२६ मार्च ते २८ मार्च आणि ३० मार्च या दिवशीच्या दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये) आपण वाचले आहे. साधनेमध्ये अशा प्रकारचा संवाद या ना त्या प्रकारे साधक न्यूनाधिक प्रमाणात जाणते-अजाणतेपणाने करत असतोच. त्यामुळे या पार्श्वभूमीवर संतांनी मांडलेला अशा प्रकारचा संवाद साधकाला उपयुक्त ठरतो. त्यातून हा संवाद साधनासापेक्ष कसा असायला हवा, याविषयी दिशा मिळते. त्यामुळे आज आपण आणखी एका अन्य ठळक उदाहरणाविषयी पहाणार आहोत. ते म्हणजे आद्यशंकराचार्य यांनी ‘उपदेश साहस्री’ या त्यांच्या प्रकरण ग्रंथाच्या अखेरीस दिलेला ‘आत्मा आणि मन यांच्यातील संवाद !’

१. ‘उपदेश साहस्री’ या ग्रंथाविषयी
आद्यशंकराचार्य यांनी विविध प्रकारचे विपुल लेखन केले आहे. यामध्ये उपनिषदे, ब्रह्मसूत्रे, श्रीमद्भगवद्गीतेवरील भाष्ये, वेदांत दर्शनातील एकेका विषयावर लिहिलेले प्रकरण ग्रंथ, स्तोत्रे आदींचा समावेश होतो. ‘उपदेश साहस्री’ हा एक प्रकरण ग्रंथ आहे. या ग्रंथाचा विषय आहे, ‘मुमुक्षुला आवश्यक माहिती देऊन पूर्णत्वापर्यंत जाण्याच्या साधनेविषयी सांगणे.’ थोडक्यात या ग्रंथाचे मुख्य स्वरूप उपदेश, तसेच यामध्ये मोठ्या संख्येने श्लोक असल्यामुळे त्याचे नाव ‘उपदेश साहस्री.’ या ग्रंथाचे आणखी एक वैशिष्ट्य येथे सांगणे अप्रस्तुत होणार नाही. आद्यशंकराचार्यांच्या विविध प्रकरण ग्रंथांविषयी ‘ते त्यांनीच लिहिले आहेत का ?’, अशा प्रकारच्या शंका काही विद्वान उपस्थित करत असतात, अर्थात् प्रस्तुत लेखकाला अशा प्रकारच्या शंका नाहीत. तरीही असे सांगावेसे वाटते की, ‘उपदेश साहस्री’ हा एकमेव असा प्रकरण ग्रंथ आहे की, याच्या संबंधाने तो आद्यशंकराचार्य यांनीच लिहिला आहे, याविषयी कुणाचेही दुमत नाही. या ग्रंथात एकूण १९ पद्यात्मक प्रकरणे आहेत. पद्य भागातील सर्वांत शेवटच्या, म्हणजे १९ व्या प्रकरणाचे नाव आहे ‘आत्ममनः संवाद प्रकरण’ अर्थात् ‘आत्मा आणि मन यांचा संवाद.’ या संवादासंबंधीच्या तपशिलाकडे वळण्यापूर्वी एका सूत्राचा थोडा परिचय असणे आवश्यक आहे. ते समजून घेऊ.

२. श्रवण, मनन आणि निदिध्यासन
वेदांत शिकणे आणि तो अंगी बाणवणे, यांसाठी साधक श्रवण, मनन अन् निदिध्यासन अशा टप्प्यांनी पुढे जातो. अर्थात् त्या आधी किंवा हे होत असतांना या साधकाची या ना त्या प्रकारे बर्यापैकी अंतःकरण शुद्धी झालेली असायला हवी.
अ. उपनिषदकालीन पद्धत : ‘बृहदारण्यक’ उपनिषदात ऋषि याज्ञवल्क्य आणि त्यांची पत्नी मैत्रेयी यांच्यातील प्रसिद्ध अन् उद्बोधक संवाद आहे. त्यात याज्ञवल्क्य ‘जीवनाचे ध्येय आत्मज्ञान प्राप्ती’, हेच असल्याचे सांगतात. त्या संवादात पुढील प्रसिद्ध वाक्य येते,
‘आत्मा वा अरे द्रष्टव्यः श्रोतव्यो मंतव्यो निदिध्यासितव्यः ।’
अर्थ : (हे मैत्रेयी), आत्म्याचेच दर्शन घ्यावे (साक्षात्कार करावा; कारण तेच जीवनाचे अंतिम ध्येय आहे, त्यासाठी) त्याचेच श्रवण (आणि अध्ययन) करावे, मनन करावे आणि निदिध्यासन (अंतःकरणात स्थिरावलेल्या त्या ज्ञानाचे ध्यान) करावे.
आ. वेदांत स्वत:मध्ये बाणवण्याची चिरंतन पद्धत : वर सांगितलेली श्रवण, मनन आणि निदिध्यासन ही एक शिकण्याची पद्धत आहे. अर्थात् आजसुद्धा नवीन विषय चांगला समजण्यासाठी थोड्या फार अंतराने यांसारखीच काही पद्धत आचरावी लागते, हे पुढील विवरणातून स्पष्ट होईल.
आ १. श्रवण : गुरु आणि शास्त्र यांच्या माध्यमातून विषय समजून घेत अध्ययन करणे
आ २. मनन : श्रवणाच्या माध्यमातून जे समजले त्याविषयी मनाला बोध होण्यासाठी चिंतन, तसेच मनातील शंका दूर करणे
आ ३. निदिध्यासन : मनातील प्रश्न, अडथळे दूर झाल्यानंतर अंतःकरणात स्थिरावू लागलेले आत्मज्ञान हे पूर्ण अंगभूत होऊन केवळ तीच एक जाणीव रहाणे, ही स्थिती प्राप्त व्हावी, यासाठी सातत्याने राखायचे अनुसंधान.
इ. आत्मज्ञान आणि ते रुजण्याची प्रक्रिया : जीवाचे खरे स्वरूप आत्मा असून तेच ब्रह्म आहे. ब्रह्म हेच सत्य असून जगत् मिथ्या (म्हणजे सापेक्ष सत्य आहे ) आहे. सर्व जीव (पदार्थ) ब्रह्माहून वेगळे नाहीत. हे आत्मज्ञान म्हणजे काय ? हे समजण्याची दिशा लक्षात यावी, यासाठीचे अल्पशब्दांचे विवरण. श्रवण प्रक्रियेतून त्याचे अनेक पैलू बुद्धीला स्पष्ट होतात. मनन प्रक्रियेतून ते नेमकेपणाने स्फटिकाप्रमाणे स्वच्छ आकलन होण्यासाठी स्वतःमधील अडथळे दूर झाल्यावर त्या ज्ञानाचे मूर्तीमंत स्वरूप बनण्यासाठी किंवा ते जगण्यासाठी त्या ज्ञानाचा ध्यास असावा लागतो. हा साधक येथपर्यंत पोचण्यासाठी त्याची अंत:करण शुद्धीची प्रक्रिया चालूच असल्याने आता त्याच्या समोर अडथळा असतो, तो ‘द्वैतभावाचा’. हा द्वैतभाव चुकीचा आहे, याची प्रत्यक्ष कल्पना असूनही तो अंत:करणात दीर्घकाळ रुजलेला असल्याने अडथळा बनतो. सनातन संस्थेचे श्रद्धास्थान प.पू. भक्तराज महाराज सांगतात, ‘द्वैत नांदे सदा चित्ती.’ असे असल्याची प्रचीती मन देत रहाते. अशा वेळी साधकासमोर एक मार्ग असतो तो, म्हणजे मनाला बाजूला सारून आत्मस्वरूपात स्थित बनणे. हे साध्य होण्यासाठी निदिध्यासन आहे.
३. संवादाचा हेतू
प्रकरणाच्या पहिल्याच श्लोकात या प्रकरणाचा हेतू सांगण्यात आला आहे. तो अगदी थोडक्यात असा आहे. विविध इच्छांमुळे परत परत जन्म होऊन देहाला भोगाव्या लागणार्या दु:खरूपी तापापासून मुक्त होण्यासांठी ज्ञानवैराग्यरूपी औषधीचा प्रयोग उत्तम प्रकारे करण्यासंबंधी पुढचे विवेचन आहे.
४. आत्मा आणि मन यांच्या संवादासंबंधी महत्त्वाचा खुलासा
वास्तवात आत्मा काही बोलत नसतो. ती एक चैतन्यरूपी जाणीव असून तीच मन, बुद्धी आणि वाणी यांच्या अभिव्यक्तीचा आधार आहे. त्यामुळे फार तर आत्म्याचे प्रतिनिधीत्व करणार्या मनानेच अडथळा ठरत असलेल्या मनाला (ज्याला आपण सामान्य लोक माझे मन म्हणतो) दूर ठेवत त्याच्याशी संवाद करणे, असे येथे आहे. कुणी म्हणेल, ‘हे म्हणजे उच्च स्तरीय मनाने कनिष्ठ स्तरीय मनाला बाजूला करणे आहे’ किंवा असे म्हणेल की, या ग्रंथात आधी सांगितलेल्या सूत्रांच्या श्रवण आणि मनन यांतून बोधित बुद्धीने साधनेत अडथळा असणार्या मनाला सांगणे, इत्यादी कशाही प्रकारे याकडे पाहिले, तरी चालेल. असे असले, तरी पुढील विवरणात संवादाविषयी सांगतांना जसे मूळ लिखाणातील ‘आत्मा सांगत आहे’, या प्रकारे उल्लेख केला, तसा येथे केला.
५. संवादातील लक्षणीय सूत्रे
या प्रकरणात २८ श्लोक आहेत. त्या सगळ्यांचे विवरण, निरुपण आदी करणे, हा हेतू नसून येथे केवळ त्या संवादाचा आशय थोडक्यात मांडणे, हा हेतू आहे. ज्यातून वाचकाला काही यथामती, यथाप्रयत्ने काही लाभ होईल. त्यासाठी याचा अभ्यास पुढील वर्गीकरणाच्या आधारे करणे सुलभ ठरेल. यातून आपल्याला मनाची वास्तविक प्रवृत्ती आणि आत्म्याची लक्षणे यांची एक झलक पहायला मिळेल. जिज्ञासूंनी त्याचा अभ्यास करावा. या सूत्रांची झलक…
अ. आत्म्याने मनाला त्याच्यासंबंधीच सांगितलेली सूत्रे :
१. तू ‘मी’पणा आणि ‘माझे’पणा यांच्या आधारे निरर्थक उद्योग करत असतो.
२. मला काय हवे, हे तुला समजू शकत नाही.
३. मला तुझ्याकडून काहीही अपेक्षा नाही.
४. तू शांत रहाणे योग्य ठरेल.
५. तू शांत रहाण्यासाठी प्रयत्न करणे, हे तुझ्या हिताचे आहे.
६. तुझी सर्व धावपळ निरर्थक आहे.
७. तू वास्तवात अभावरूप आहेस, तुझे अस्तित्वच सिद्ध होत नाही.
८. तुझा उत्पत्तीकर्ता आणि लयकर्ता मीच आहे.
९. तूच द्रष्टा, दृश्य आणि अनुभव यांना स्वतःच्या कल्पनेने निर्माण केले आहे.
१०. तू जे पहातो ते सगळे मिथ्या द्वैतच पहातो.
११. तू आतापर्यंत मला भरपूर समस्या करून ठेवलेल्या आहेस.
आ. आत्म्याने मनाला सांगितलेला स्वतःचा परिचय :
१. माझा तुला परिचय नाही.
२. मी स्वत : परमात्मा रूपाहून भिन्न नाही.
३. मी पूर्ण असल्याने मला इच्छाच नाहीत.
४. मी सदैव तृप्त आहे.
५. तुझ्या कोणत्याही कृत्यामुळे मी मोहित होत नाही.
६. मी बंधनरहित आणि अविकारी आहे.
७. मी अकल्पित आहे; कारण सर्व कल्पना द्वैत आहेत. मी कल्पनेचा जन्म होण्याआधीपासून आहे.
८. मी अजन्मा आहे. सर्व अवस्थांमध्ये मी आहे.
६. बुद्धीचा मनाशी तर्कशुद्ध संवाद
येथे आद्यशंकराचार्य यांनी मनाला उद्देशून कठोर; पण तर्कशुद्ध संवाद केलेला आहे. या संवादाचा स्वतःसाठी साधकाने उपयोग केल्यास त्याच्यावर असलेली मनाची पकड ढिली होण्यास साहाय्य होईल. हे कसे होऊ शकते, हे समजून घेण्यासाठी ‘आधुनिक चेताशास्त्र आणि आधुनिक मानसशास्त्र’ यांचे आपण साहाय्य घेऊ. यासाठी त्या त्या विज्ञानशाखांच्या दृष्टीकोनांतून या संवादाकडे पाहूया.
अ. आधुनिक मानसशास्त्रीय दृष्टीतून : ‘हे प्रकरण, म्हणजे मनाविषयी खोलवर रुजलेल्या रुढ सामान्य समजूतींना पूर्ण संपवणारे बोधात्मक आव्हानच आहे’, ही वरची सूत्रे वाचली, तर अंदाज येईल. आद्यशंकराचार्य यांनी येथे मनाला एक ‘स्वतंत्र घटक’ करून त्याच्या विविध मर्यादा दाखवल्या आहेत. त्यातून मनाची पकड पूर्ण नष्ट केली आहे. अशा प्रकारे मनाशी दीर्घकाळ पक्की बांधली गेलेली ‘स्व’ची ओळख नष्ट होत असतांना त्याच वेळी ‘स्व’चे स्वरूप स्पष्ट होण्याने साधकाला दिशा मिळते. त्यामुळे निदिध्यासनासाठी हा संवाद उपयोगी ठरतो.
आ. चेताशास्त्रीय दृष्टीतून : हे प्रकरण वाचणे किंवा त्यावर मनन करणे, यांविषयी तर्क करणे, या कार्यासाठी असलेल्या मेंदूच्या ‘प्री फ्रंटल कोर्टेक्स’ या भागाला शक्तीशाली बनवतात. त्यामुळे एरव्ही सहज उसळणार्या उथळ प्रतिक्रियांना आळा बसतो. ‘मी आणि माझे’ या सामान्य वृत्तींचे, तसेच त्यापासून उत्पन्न विचारांचे वर्तुळ, म्हणजेच मेंदूचे ‘डिफॉल्ट नेटवर्क (जाणीवपूर्वक पालट न केल्यास सक्रीय होणारी यंत्रणा)’. याचा अनुभव प्रत्येकाला आहे. प्रयत्न न केल्यास नामसुद्धा सलगतेने होऊ शकत नसते. नाम घ्यायला म्हणून अगदी ठरवून, तसेच स्वत:ला बजावून बसले, तरी अन्य स्वकेंद्रीत विचार मनात येतातच. या प्रकरणाच्या मननाने आणि उपयोगाने मेंदूतील अशी स्वकेंद्रित विचारप्रक्रिया (Self-referential processing) तात्पुरती थांबते. यामुळे मेंदूला एकप्रकारे उत्तम विश्रांती मिळते. त्यातून मेंदूतील ही ‘जुनी यंत्रणा (नेटवर्क)’ कमकुवत होते आणि ‘साक्षीत्वाची’ नवीन यंत्रणा सिद्ध होते.
| हे ही वाचा → ‘मनाचे श्लोक’ हे मनातील दोषरूपी चौफेर शत्रूवर आक्रमण करणारे असून साधकाने त्यासह स्वयंसूचनेचाही लाभ घ्यावा ! |
७. मन ‘अभावरूप आहे’ म्हणजे काय ?
वर उल्लेखित आत्म्याने मनाला सांगितलेल्या संवाद सूत्रांमध्ये एका विशेष सूत्राने कदाचित् आपले लक्ष वेधले असेल. ते म्हणजे ‘(हे मना) तू वास्तवात अभावरूप आहेस, तुझे अस्तित्वच सिद्ध होत नाही.’ अभावरूप आहेस, म्हणजे वास्तवात नसून भासमान प्रकारे असणे. याचा थोडक्यात काही खुलासा उपयुक्त ठरेल.
अ. वेदांतानुसार मन म्हणजे माया ! : आद्यशंकराचार्य यांनी असे विधान उगाचच केलेले नाही. हा वेदांतामधील एक सिद्धांत आहे. तो कसा सत्य आहे, हे शास्त्र (उपनिषद, गीता आदी विविध ग्रंथ), युक्ती (तर्कशुद्ध कारणमीमांसा अर्थात् reasoning) आणि (साधनेने प्राप्त) अनुभव यांच्या आधारे सिद्ध केले जाते. त्याचे सार आहे की, मन मायेचेच अंग आहे किंवा माया आहे. ‘जी अस्तित्वात नाही ती माया’, ही मायेची व्याख्या आहे.
आ. विज्ञानानुसार मन एक ‘उपयुक्त संकल्पना’ : शरीरविज्ञान किंवा चेताविज्ञानानुसार (Neuroscience) मन हे हृदय, मूत्रपिंड, डोळा, फुप्फुस आदींप्रमाणे प्रत्यक्ष दाखवण्यासारखे भौतिक अवयव नाही. चेताविज्ञान मनाला मेंदूच्या जैविक हालचालींमधून, म्हणजे संदेश देवाणघेवाण, चेता संप्रेरके यांच्यामुळे अभिव्यक्त होणारी एक प्रक्रिया मानते. यांतून जिज्ञासूंनी काही बोध अवश्य घ्यावा आणि स्वमनाकडे पहावे.
८. सारांश
‘उपदेश साहस्री’चे १९ वे प्रकरण हे ‘एकप्रकारे मनातील अतिशय शुद्ध संवाद म्हणजे काय ? हे दाखवणारे एक उदाहरण’, असे म्हणता येईल. यात ‘सात्त्विक आत्मज्ञानयुक्त ‘बुद्धी’, ‘मनाला’ त्याचे उचित स्थान दाखवत आहे. संवादातून मन, म्हणजे ‘आपण’ नाही, तर ते एक वापरायचे ‘साधन’ आहे, हे स्पष्ट होते. अर्थात् हे नीट आकलन होण्यासाठी आधीच्या १८ प्रकरणांत मांडलेल्या सूत्रांचे योग्य अध्ययन (श्रवण) आणि मनन होणे आवश्यक आहे.
। श्रीगुरुचरणार्पणमस्तु ।
– आधुनिक वैद्य (डॉ.) दुर्गेश सामंत (वय ६५ वर्षे), एम्.डी. (मेडिसीन), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१५.४.२०२६)
| मनाच्या श्लोकांविषयीच्या लेखमालेतील भाग पाहण्यासाठी क्लिक करा →
भाग १ : आधुनिक विज्ञानाच्या दृष्टीतून मनाचे श्लोक ! भाग २ : आधुनिक विज्ञानाच्या दृष्टीतून मनाच्या श्लोकांचा मेंदूत होणारा परिणाम ! भाग ४ : आधुनिक विज्ञानाच्या दृष्टीतून ‘मनाचे श्लोक’ सर्वसामान्य व्यक्तीसह साधक आणि संन्यासी यांना उपयुक्त ! |
प.पू. डॉ. आठवले हे अवतारी पुरुष आहेत ! – जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी
भारतियांचे राष्ट्रीय महापातक !
गुरुपौर्णिमेपूर्वीच जयपूर (राजस्थान) येथील साधकांनी अनुभवला गुरुपौर्णिमा सोहळा !
ईश्वरप्राप्तीसाठी साधना प्रथम आणि नंतर तात्त्विक माहितीचे वाचन
श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी साधकांना केलेले अनमोल मार्गदर्शन !
ईश्वरप्राप्तीसाठी साधना प्रथम आणि नंतर तात्त्विक माहितीचे वाचन