अधिवेशनकाळात विधानभवनातील वाहनतळ व्यवस्था कामचलाऊ !

३०० हून अधिक वाहने; परंतु साधी आखणीही नाही !

आखणी न करता लावण्यात आलेली वाहने

श्री. प्रीतम नाचणकर, विशेष प्रतिनिधी, सनातन प्रभात, मुंबई

मुंबई, २४ जून (वार्ता.) – महाराष्ट्र राज्याच्या विधीमंडळाचे सध्या पावसाळी अधिवेशन चालू आहे; परंतु अधिवेशनकाळात येथे गाड्या उभ्या करण्यासाठी (पार्किंगसाठी) साधी आखणीही केलेली नाही. मागील अनेक वर्षांपासून अधिवेशनकाळात असा प्रकारे कामचलाऊ पार्किंग केले जात आहे. विधीमंडळाच्या अधिवेशनाच्या काळात गाड्यांच्या पार्किंगचे सुनियोजन नसणे हा केवळ वाहतूक विभागाचाच नव्हे, तर विधीमंडळ प्रशासनाचा कुचकामीपणा आहे.

वाहनतळाच्या प्रवेशद्वारावर खड्ड्यांमुळे साचलेले पाणी

विधानसभेचे २८८ आणि विधान परिषदेचे ७८, असे एकूण ३६६ आमदार अधिवेशनाच्या ठिकाणी येतात. यांतील बहुतांश आमदार स्वत:ची गाडी घेऊन येतात. या व्यतिरिक्त विधानसभेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, विधान परिषदेचे सभापती, उपसभापती, तसेच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या गाड्यांचा ताफा, प्रशासकीय अधिकार्‍यांच्या गाड्या, अशा एकूण ३०० हून अधिक गाड्या अधिवेशनकाळात विधानभवनाच्या बाहेर लावल्या जातात.

अशी आहे व्यवस्था !

अधिवेशनाच्या काळात विधानसभेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, विधान परिषदेचे सभापती, उपसभापती, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, तसेच अन्य मंत्री यांच्या वाहनांसाठी फलक लावून जागा राखीव ठेवली जाते. ही व्यवस्था विधानभवनाच्या बाहेर संरक्षक भिंतीला लागू केली जाते. आमदार आणि अन्य मान्यवर यांच्या वाहनांच्या पार्किंगसाठी त्याच्या थोडे पुढे व्यवस्था करण्यात येते. वाहनतळासाठी प्रशस्त जागा असूनही आखणी केलेली नसल्यामुळे या भागामध्ये कशाही प्रकारे गाड्या लावल्या जातत.

वाहतूक पोलिसांनी मांडल्या अडचणी ! 

वाहनतळाच्या प्रवेशाद्वारावर खड्डे आहेत. त्यामुळे पावसाळ्यात तेथे पाणी साचते. भराव टाकून वाहनतळ व्यवस्थित करणे आवश्यक आहे. आमदारांच्या वाहनांसाठी केवळ २ वाहतूक पोलीस आहेत. जेवणाच्या वेळेत पर्यायी वाहतूक पोलीस नसल्यामुळे येथेच जेवण करावे लागते, अशी प्रतिक्रिया वाहनतळावर कामावर असलेल्या काही वाहतूक पोलिसांनी ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीशी बोलतांना व्यक्त केली.

अशी आहे स्थिती  !

१. गाड्यांसाठी आखणी नाही. मान्यवरांच्या गाड्यांसाठी ‘बेरिगेट्स’ (तात्पुरते अडथळे) लावले जातात.

२. आमदारांच्या गाड्यांच्या पार्किंगमध्ये प्रवेशाच्या ठिकाणी खड्डे आहेत, त्यामुळे तेथे पावसाचे पाणी साचते. भराव टाकून वाहनतळाचा पृष्ठभाग समांतर करणे आवश्यक आहे.
३. काही वेळा अयोग्य प्रकारे गाड्या लावल्यामुळे गाड्या बाहेर काढायला अडचण येते आणि जागाही वाया जाते. पार्किंगच्या परिसरात १५ हून अधिक बेवारस वाहने भंगार स्थितीत आहेत. ही वाहने हटवल्यास पार्किंगसाठी अधिक जागा उपलब्ध होऊ शकेल.

या आहेत उपाययोजना !

१. आमदारांच्या गाड्यांच्या वाहनतळाच्या प्रवेशाच्या ठिकाणी वाहनांची नोंद केली जाते. यासाठी २ वाहतूक पोलीस आहेत. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी म्हणजे २२ जून या दिवशी १८५ गाड्या, तर २३ जून या दिवशी २०७ गाड्या लावण्यात आल्या होत्या. आमदारांची संख्येच्या तुलनेत जागा अपुरी असल्यामुळे एका आमदाराच्या एकाच गाडीला वाहनतळामध्ये प्रवेश दिला जातो.

२. वाहनतळावर आखणी करून प्रत्येक पार्किंगला क्रमांक दिल्यास आणि प्रवेशाच्या ठिकाणी पार्किंगच्या क्रमांकाचा बिल्ला दिल्यास येणार्‍या गाड्या क्रमानुसार लावणे शक्य होईल.

३. राज्याच्या प्रशासकीय मुख्यालय असलेल्या ठिकाणी खरेतर वाहतूक विभागाकडून पार्किंगचे सुनियोजन कसे असायला हवे ?, हे दाखवून द्यायला हवे; परंतु दुर्दैवाने तसे दिसत नाही. वाहतूक विभाग आणि विधीमंडळ प्रशासन यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे.