कलेतून जलद आध्यात्मिक उन्नती होण्यासाठी ‘गुरुकृपायोगानुसार साधना’ !

‘गायन, वादन, नृत्य आणि नाट्य या कलांतून ईश्वरप्राप्तीसाठी साधना’, याचे प्रास्ताविक विवेचन !

४ सप्टेंबर २०२५ या दिवसापासून प्रत्येक गुरुवारी चालू झालेल्या लेखमालेत आपण ‘गायन, वादन, नृत्य आणि नाट्य’, या कलांची माहिती घेत आहोत. या कलांच्या सादरीकरणाचा उद्देश काळाच्या प्रभावामुळे पालटत असला, तरी ‘कलेकडे केवळ कला म्हणून न पहाता कलेतून आध्यात्मिक उन्नती कशी साधावी’, हे येथे पाहूया.

(लेखांक १८)    

‘आतापर्यंतच्या लेखांत आपण ‘कलेला साधना जोडण्याचे महत्त्व आणि कलेतून साधना होण्यासाठी आवश्यक असलेले गुण’ समजून घेतले. ‘कलेला साधना जोडायची, म्हणजे नेमके काय करायचे ?’, असा प्रश्न आपल्याला पडला असणार. यापुढील लेखांमध्ये आपण ‘कलेला साधनेच्या विविध टप्प्यांची जोड देऊन कसे प्रयत्न करू शकतो ?’, याचे विवेचन पहाणार आहोत. आपण प्रत्येक कृती काळानुसार करत गेलो, तर आपल्याला त्याची फलनिष्पत्ती अधिक मिळते. हाच नियम कलेच्या माध्यमातून साधना करण्यासाठीही लागू पडतो. काळानुसार योग्य कला-साधना करत गेल्यामुळे कलाकाराची आध्यात्मिक उन्नती जलद गतीने होऊ शकते. कलाकार कलेतील शिक्षण तर घेतच असतो; परंतु कलेतील शिक्षणासह त्याने योग्य साधनेसाठीही मार्गदर्शन घेऊन साधनारत रहाणे महत्त्वाचे आहे. व्यक्तीच्या प्रकृतीनुसार अनेक साधनामार्ग सांगितलेले आहेत, उदा. ज्ञानयोग, भक्तीयोग, कर्मयोग, ध्यानयोग इत्यादी; परंतु हल्लीच्या काळानुसार कलियुगामध्ये शीघ्र गतीने ईश्वरप्राप्ती करण्यासाठी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी ‘गुरुकृपायोगानुसार साधना’, हा सोपा मार्ग सांगितला आहे.

‘कला-उपासकाला आध्यात्मिक गुरूंची कृपा जलद संपादन करता यावी आणि त्याला कलेतून ईश्वरप्राप्तीच्या दिशेने जाणे सोपे व्हावे’, यासाठी आपण ‘गुरुकृपायोगानुसार साधनेचे महत्त्व आणि कला’, हा विषय आजच्या लेखातून समजून घेणार आहोत.            

याच्या आधीचा लेख वाचण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/1027736.html 

 

१. गुरुकृपा शीघ्र गतीने होण्याचा मार्ग, म्हणजे ‘गुरुकृपायोग’!

कोणत्याही मार्गाने साधना केली, तरी ‘जीवनात आध्यात्मिक गुरु येणे आणि त्यांची कृपा होणे’, हे महत्त्वाचे आहे. ‘गुरूंची कृपा महत्त्वाची असल्याने साधकाने थेट गुरूंच्या कृपेसाठीच प्रयत्न केले, तर त्याच्यावर जलद गुरुकृपा होऊन तो साधनेत पुढे जाऊ शकतो’, हा अभ्यास करून सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी ‘गुरुकृपायोगानुसार साधना’, हा सोपा साधनामार्ग सांगितला आहे.

२. गुरुकृपायोगात सर्व साधनामार्गाचे एकत्रीकरण असणे 

‘गुरुकृपायोग’, म्हणजे ज्ञानयोग, भक्तीयोग, कर्गयोग आणि ध्यानयोग या चारही साधनामार्गाचा संगम ! ‘गुरुकृपायोगात चारही साधनामार्ग एकत्र असल्याने त्यानुसार साधना केल्यास जलद आध्यात्मिक उन्नती साधता येते’, हे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी साधकांना घडवून सिद्ध केले आहे, तसेच या साधनामार्गाच्या मागे सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांचा संकल्प आहे. त्यामुळे हा मार्ग वेगाने आध्यात्मिक उन्नती करून देणारा आहे. या योगमार्गात सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांनी गुरु म्हणून साधकांना स्वतःच्या देहामध्ये अडकवले नसून त्यांनी ‘गुरुतत्त्व’ ही व्यापक दिशा समाजाला दिली आहे. आज अनेक साधक या व्यापक गुरुतत्त्वाची अनुभूती घेत आहेत.

३. शिष्याच्या जीवनातील गुरुकृपेचे महत्त्व !

सुश्री (कु.) तेजल पात्रीकर

कोणत्याही मार्गाने आध्यात्मिक प्रगती करायची असल्यास ‘गुरुकृपा होणे’ शिष्याच्या जीवनात महत्त्वाचे आहे. शिष्याची खरी आध्यात्मिक प्रगती गुरुकृपेनेच होते; म्हणूनच ‘गुरुकृपा हि केवलं शिष्यपरममङ्गलम् ।’, म्हणजे ‘केवळ गुरुकृपाच शिष्याचे परम कल्याण करते’, असे म्हटले आहे. गुरु शिष्याला वेगवेगळ्या माध्यमांतून शिकवत असतात, घडवत असतात. ‘माझ्यावर गुरूंची कृपा जलद कशी होईल ?’, यासाठी शिष्याचीही साधनेची तळमळ असायला हवी. ‘गुरुकृपेच्या माध्यमातून व्यक्तीची ईश्वरप्राप्तीच्या दिशेने वाटचाल होणे’, यालाच ‘गुरुकृपायोग’ म्हणतात.

४. गुरुकृपायोगानुसार साधनेचे दोन प्रकार

४ अ. व्यष्टी साधना : व्यष्टी साधना, म्हणजे वैयक्तिक आध्यात्मिक उन्नतीसाठी करायचे प्रयत्न, उदा. स्वतः नामजप करणे, ध्यान करणे, धार्मिक ग्रंथांचा अभ्यास करणे इत्यादी.

४ आ. समष्टी साधना : समष्टी साधना, म्हणजे समाजाच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी करायचे प्रयत्न, उदा. ‘समाजानेही साधनेला लागावे’, यासाठी अध्यात्मप्रसार करणे, कलेच्या माध्यमातून साधनेचा प्रसार करणे इत्यादी.

हल्लीच्या कालमहिम्यानुसार व्यष्टी साधनेला ३५ टक्के, तर समष्टी साधनेला ६५ टक्के महत्त्व आहे. फार पूर्वी समाजाची सात्त्विकता अधिक असल्याने समाजात साधनेविषयी जागृती होती; परंतु हल्लीच्या कलियुगामध्ये मनुष्य भोग, विलास आणि बाह्य आकर्षणे, यांमध्ये गुरफटून गेल्यामुळे त्याला ‘स्वतःचा जन्म ईश्वरप्राप्तीसाठी झाला आहे’, याचाच विसर पडला आहे. परिणामी आज समाजात ‘साधनेविषयी जागृती करणे’, या समष्टी साधनेच्या अंगाची अधिक आवश्यकता आहे. त्यामुळे काळानुसार समष्टी साधनेला ६५ टक्के महत्त्व आहे.

५. समष्टी साधनेचे महत्त्व !

कु. म्रिणालिनी देवघरे

जो शिष्य केवळ स्वतःपुरता विचार न करता स्वतःसह समाजाचाही विचार करतो, तो गुरूंना अधिक प्रिय असतो. असेच शिष्याच्या साधनेविषयीही आहे. हे पुढील कथेच्या माध्यमातून लक्षात येईल.

‘एक गुरु तीर्थाटनासाठी जाणार असतात. शिष्यांची परीक्षा घेण्यासाठी ते तीन शिष्यांना थोडे गहू देऊन ‘मी येईपर्यंत हे जपून ठेवा’, असे सांगून तीर्थाटनाला जातात. यात्रेहून आल्यावर गुरु तीनही शिष्यांना गव्हाविषयी विचारतात. त्या वेळी पहिला शिष्य सांगतो, ‘‘गहू खराब होत होते. त्यामुळे मी ते वापरून संपवले.’’ दुसरा शिष्य गव्हाचा डबा आणून त्यात जपून ठेवलेले गहू गुरूंना दाखवतो. तिसरा शिष्य गुरूंना एका शेतामध्ये घेऊन जातो आणि समोर शेतात गव्हाचे पीक आलेले गुरूंना दाखवतो. गुरूंनी दिलेले गहू त्याने शेतात पेरल्याने त्या गव्हाचे पीक शेतात आलेले असते. या वेळी शेतातील गव्हाचे पीक पाहून गुरु खुश होतात. ज्याने थोड्या गव्हाच्या माध्यमातून गव्हाचे पीकच निर्माण केले, त्या शिष्यावर गुरु इतर दोन्ही शिष्यांपेक्षा अधिक खुश होतात.’

यात त्या शिष्याने केवळ स्वतःचाच विचार न करता समष्टीचा विचार केलेला असतो. ‘मी’ आणि ‘माझी साधना’ एवढ्यापुरतेच मर्यादित न रहाता आपल्याला साधनेतील जो भाग कळला, तो आपण समाजालाही सांगायला हवा. ‘कलेतून साधनारत असलेले साधक / उपासक यांनी स्वतःसह समाजालाही कलेतून साधना सांगत रहाणे’, ही कलेतून होणारी समष्टी साधना आहे.

६. ‘व्यष्टी साधना’, हा समष्टी साधनेचा पाया असणे

व्यष्टी साधनेच्या पायावरच समष्टी साधनारूपी इमारत उभी रहात असल्याने व्यष्टी साधनाही महत्त्वाची आहे, उदा. साधकाची व्यष्टी साधना चांगली असेल, तर त्याच्या वाणीमध्ये चैतन्य असते आणि या चैतन्यामुळे तो समाजात साधना अधिक प्रभावीपणे सांगू शकतो. अशा प्रकारे या दोन्ही साधना एकमेकांना पूरक आहेत.

७. गुरुकृपायोगानुसार अष्टांगसाधना

गुरुकृपायोगानुसार साधनेमध्ये अष्टांग साधना सांगितलेली आहे. अष्टांग साधनेची आठ अंगे पुढीलप्रमाणे आहेत – १. स्वभावदोष-निर्मूलन आणि गुण-संवर्धन, २. अहं-निर्मूलन, ३. नामजप, ४. भावजागृतीसाठी करायचे प्रयत्न, ५. सत्संग, ६. सत्सेवा, ७. सत्साठी त्याग आणि ८. प्रीती (इतरांविषयी निरपेक्ष प्रेम). साधनेच्या या आठही अंगांनी साधना केली, तर जलद आध्यात्मिक उन्नती होते.

‘ही आठ अंगे आचरणात आणून कलेतून साधना कशी करावी ?’, याविषयीचे विस्तृत विवेचन आपण पुढील लेखांतून जाणून घेणार आहोत.’

– सुश्री तेजल पात्रीकर (आध्यात्मिक पातळी ६० टक्के, संगीत विशारद), संगीत समन्वयक, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा आणि कु. म्रिणालिनी देवघरे (भरतनाट्यम् विशारद), महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (९.४.२०२६)

पुढील लेखांक १९ वाचण्यासाठी क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/1032706.html

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या काही वेळा अनिष्ट शक्तींमुळे किंवा ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांना / संतांना / धर्मप्रेमींना आलेल्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सर्वांनाच येतील, असे नाही. - संपादक