कल्पनेद्वारे नकारात्मकतेला सकारात्मकतेमध्ये पालटणे !

सकाळी उठल्या उठल्या पहिली कल्पना करा की, तुम्ही पुष्कळ आनंदी आहात. अंथरूणातून अतिशय प्रसन्न, सकारात्मक, आशादायी आणि आनंदी मनाने उठा, जणू काहीतरी संपूर्ण, अनंत अन् अमूल्य घडणार आहे, अशा आशेने अन् तेजाने भरून जा. अशी भावना ठेवा की, आजचा दिवस सामान्य दिवस नाही; आज काहीतरी अनोखे, अद्वितीय तुमची वाट पहात आहे आणि ते तुमच्या अगदी जवळ आहे. दिवसभर ही गोष्ट वारंवार लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा.

रात्री जेव्हा तुम्ही झोपायला जाता, तेव्हा कल्पना करा की, तुम्ही दैवी हातांमध्ये सोपवले जात आहात, जणू हे संपूर्ण अस्तित्व तुम्हाला आधार देत आहे आणि तुम्ही त्याच्याच कुशीत विसावणार आहात. केवळ एका गोष्टीकडे सातत्याने लक्ष द्या, झोप येईपर्यंत हीच कल्पना करत रहा, जेणेकरून ती कल्पना तुमच्या झोपेतही प्रवेश करील. अशा प्रकारे त्या दोन्ही गोष्टी एकमेकांत मिसळून जातील.

कधीही कोणत्याही नकारात्मक गोष्टीची कल्पना करू नका; कारण ज्या लोकांमध्ये नकारात्मक कल्पना करण्याची तीव्र क्षमता असते आणि ते जर सातत्याने तसाच विचार करत राहिले, तर ती कल्पना वास्तवात उतरू शकते. जर तुम्ही असा विचार केला की, तुम्ही आजारी पडणार आहात, तर तुम्ही खरोखरच आजारी पडाल. जर तुम्ही विचार केला की, कुणीतरी तुमच्याशी कठोरपणे बोलेल, तर ती व्यक्ती तशीच बोलेल. तुमची कल्पनाच त्या परिस्थितीला आकार देत असते.

त्यामुळे जेव्हा केव्हा मनात एखादा नकारात्मक विचार डोकावेल, तेव्हा त्याला लगेच सकारात्मक विचारात पालटा. त्या नकारात्मक विचाराला स्पष्टपणे नाकारून सोडून द्या.

– कु. विशाखा विनोद पेडणेकर, राजापूर, जिल्हा रत्नागिरी. (१५.०७.२०२६)