‘Vikram-1’ Creates History : देशातील पहिल्या खासगी आस्थापनाकडून उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण

‘स्कायरूट एरोस्पेस’ या खासगी आस्थापनाच्या ‘विक्रम-१’ने रचला इतिहास !

श्रीहरिकोटा (आंधप्रदेश) – येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून तेलंगाणाच्या भाग्यनगरमधील ‘स्कायरूट एरोस्पेस’ या खासगी आस्थापनाने १८ जुलै या दिवशी ‘विक्रम-१’ हे ‘ऑर्बिटल-क्लास रॉकेट’ (शक्तिशाली रॉकेट, जे एखाद्या उपग्रहाला किंवा अंतराळयानाला पृथ्वीच्या वातावरणाबाहेर नेऊन ‘लो अर्थ ऑर्बिट’ किंवा त्याहून उच्च कक्षेत प्रस्थापित करण्यास पूर्णपणे सक्षम असते) यशस्वीरित्या प्रक्षेपित केले. हे भारताचे पहिले खासगीरित्या विकसित केलेले रॉकेट आहे. या अभियानाला ‘आगमन’ असे नाव देण्यात आले आहे. रॉकेटचे उड्डाण सकाळी ११.३० वाजता होणार होते; परंतु ते पुढे ढकलून दुपारी १२ वाजून ५ मिनिटांनी करण्यात आले. १८ नोव्हेंबर २०२२ या दिवशी ‘स्कायरूट’ने भारतीय भूमीवरून अंतराळात पोचणारे पहिले खासगी रॉकेट ‘विक्रम-एस्’ यशस्वीरित्या प्रक्षेपित केले होते; त्यानंतर जवळपास ३ वर्षांनी ही नवी कामगिरी झाली आहे.

स्कायरूटच्या मते, या मोहिमेचा उद्देश ‘विक्रम-१’ची कामगिरी आणि त्यामधील प्रमुख तंत्रज्ञानाची उड्डाणाच्या काळात पडताळणी करणे, हा आहे. या चाचणीतून मिळणारी माहिती (डेटा) भविष्यातील मोहिमांमध्ये अधिक सुधारणा करण्यासाठी उपयुक्त असून नियमित प्रक्षेपण प्रारंभ करण्यास साहाय्य करेल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले अभिनंदन !

पंतप्रधान मोदी यांचे या प्रक्षेपणावर लक्ष होते. प्रक्षेपण यशस्वी झाल्यानंतर त्यांनी उपस्थितांशी भ्रमणभाषवरून संपर्क साधत म्हटले की, ही देशातील तरुणांना प्रेरणा देणारी घटना आहे. मी तुमच्या तरुण पथकाचे अभिनंदन करतो. देशातील तरुणांवर विश्वास ठेवायला हवा. ‘आगमन’ला आणखी पुढे न्यायचे आहे. ‘आत्मनिर्भर भारत’ हे हसण्यावरी नेले जात होते. तुमच्या पथकाने हे ‘आत्मनिर्भर भारत’ करून दाखवले आहे.

‘वन्दे मातरम् कार्ड’ अवकाशात पाठवण्यात आले !

‘वन्दे मातरम्’ला १५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने विविध कार्यक्रम हाती घेण्यात आले आहेत. यानिमित्ताने पंतप्रधान मोदी यांनी ‘वन्दे मातरम्’ असे लिहिलेले कार्डही यानिमित्ताने या रॉकेटद्वारे अवकाशात पाठवले.

काय आहे ‘विक्रम-१’ ?

‘विक्रम-१’ हे २४ मीटर उंच, ३ टप्प्यांचे ‘ऑर्बिटल लाँच व्हीकल’ (अंतराळ कक्षीय प्रक्षेपक वाहन) आहे. हे रॉकेट ३५० किलो वजनापर्यंतचे ‘पेलोड्स’ (रॉकेटच्या माध्यमातून पाठण्यात येणारे उपग्रह)  ६० अंश झुकलेल्या ४५० कि.मी.च्या ‘लो अर्थ ऑर्बिट’मध्ये (पृथ्वीच्या सर्वांत जवळ असलेली अंतराळ कक्षा) नेण्यास सक्षम आहे. या पहिल्या मोहिमेत एक ‘ऑर्बिटल ॲडजस्टमेंट मॉड्युल’ही (उपग्रहाचा अंतराळातील रस्ता किंवा त्याची दिशा पालटणारे आणि ती नियंत्रित ठेवणारे इंजिन) समाविष्ट आहे, जे प्रक्षेपणानंतर उपग्रहांना त्यांच्या नियुक्त कक्षेत स्थापित करू शकते.