विद्यार्थ्यांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी अ.भा.वि.प. शिष्टमंडळाकडून विविध मंत्र्यांच्या भेटी ! – अथर्व कुलकर्णी, अ.भा.वि.प.

पत्रकार परिषेदत माहिती देतांना सानिका पाटील, अथर्व कुलकर्णी (मध्यभागी), तसेच प्रेम राजमाने (उजवीकडे)

कोल्हापूर, १५ जुलै (वार्ता.) – अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अ.भा.वि.प.), महाराष्ट्र राज्याच्या वतीने राज्यातील विद्यार्थ्यांसमोरील विविध शैक्षणिक, तांत्रिक, वैद्यकीय, सामाजिक न्याय, कौशल्य विकास आणि आरोग्य क्षेत्रातील प्रलंबित प्रश्नांच्या संदर्भात राज्यशासनातील विविध मंत्र्यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा करण्यात आली. या वेळी उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे, राज्यमंत्री पंकज भोयर, सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याणमंत्री प्रकाश आबीटकर यांसह अन्य मंत्र्यांना विविध निवेदन सादर करण्यात आली, अशी माहिती ‘अखिल भारतीय विद्यार्थी परिषदे’चे प्रदेशमंत्री अथर्व कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली. या प्रसंगी सानिका पाटील, तसेच प्रेम राजमाने उपस्थित होते.

उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाकडे विद्यापिठांच्या परीक्षा, तसेच निकाल वेळेत घोषित करणे, मुलींच्या विनामूल्य शिक्षण योजनेची प्रभावी कार्यवाही, खासगी विद्यापिठांच्या शुल्कावर नियंत्रण, प्राध्यापकांची रिक्त पदे भरणे, नवीन व्यावसायिक अभ्यासक्रमांना शिष्यवृत्तीचा लाभ, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची प्रभावी कार्यवाही, खुल्या छात्रसंघ निवडणुका, तसेच तंत्रशिक्षणातील संशोधन, उद्योगाभिमुख प्रशिक्षण आणि शिष्यवृत्ती वेळेत वितरित करण्याची मागणी करण्यात आली.

सार्वजनिक आरोग्य विभागाकडे रिक्त पदे भरणे, ग्रामीण सेवा धोरण सुसंगत करणे, डॉक्टर व आरोग्य कर्मचार्‍यांच्या सुरक्षेसाठी प्रभावी उपाययोजना, आवश्यक औषधे आणि उपकरणे उपलब्ध करून देणे, तसेच ‘आयुष’ पदवीधरांसाठी राखीव पदांची प्रभावी कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली. संबंधित प्रश्न प्रत्यक्ष सुटेपर्यंत अभाविप शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करील आणि आवश्यकता पडल्यास राज्यभर तीव्र आंदोलनही उभारेल, अशी चेतावणी अथर्व कुलकर्णी यांनी या प्रसंगी दिली.