Aamir Khan Gets Death Threat : अभिनेते आमिर खान यांना ‘लव्ह जिहाद’वरून लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून ठार मारण्याची धमकी

मुंबई – अभिनेते आमिर खान यांनी तिसरे लग्न केल्यावरून गुंड लॉरेन्स बिश्नोई टोळीने ‘आमिर खान ‘लव्ह जिहाद’ला प्रोत्साहन देत आहे’, असा आरोप करत त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. सामाजिक माध्यमांत पोस्ट प्रसारित करत बिश्नोई टोळीचे कथित सदस्य आरझू बिश्नोई आणि टायसन बिश्नोई यांनी ही धमकी दिली आहे. तसेच एक ऑडिओही प्रसारित झाला आहे. ज्यात बिश्नोई टोळीचे कथित सदस्य आमिर खान यांना चेतावणी देत आहेत. आमिर खान यांनी काही दिवसांपूर्वी गौरी स्प्रॅट यांच्याशी लग्न केले. आमिर खान यांचा हा तिसरा विवाह आहे.

‘आमिर खानसारखे लोक आपल्या संस्कृतीविरोधात ‘लव्ह जिहाद’ला प्रोत्साहन देत आहेत. आम्ही अशी कृत्ये सहन करणार नाही. लवकरच याचे प्रत्युत्तर दिले जाईल. हे कृत्य आमच्या सनातन धर्माच्या विरोधात आहे’, अशी चेतावणी देण्यात आली आहे.

‘लव्ह जिहाद’च्या आरोपावर आमिर खान यांनी यापूर्वी दिले आहे उत्तर !

गौरी स्प्रॅट यांच्याशी लग्न केल्यानंतर आमिर खान यांच्यावर लव्ह जिहादचे आरोप होऊ लागले. त्यानंतर एका मुलाखतीत आमिर खान यानी उत्तर देतांना सांगितले की, माझ्या दोन्ही बहिणींचे लग्न हिंदु मुलांशी झाले आहे. माझ्या मुलीनेही हिंदु मुलाशी लग्न केले. तसेच पहिली पत्नी रीना दत्ता, दुसरी पत्नी किरण राव आणि गौरी स्प्रॅट यांच्यापैकी कुणीही त्यांचा धर्म पालटलेला नाही. आमचे लग्न विशेष विवाह कायद्यातील तरतुदीप्रमाणे झालेले आहे. गौरी हिंदु नसून ख्रिस्ती आहे.