मुलींच्या सुरक्षिततेसाठी कठोर उपाययोजना करा !

‘हिंदु राष्ट्र समन्वय समिती’ची निवेदनाद्वारे पोलीस प्रशासनाकडे मागणी !

कराड येथील उपविभागीय अधिकार्‍यांना निवेदन देतांना ‘हिंदु राष्ट्र समन्वय समिती’चे कार्यकर्ते

 कराड, १८ जुलै (वार्ता.) – शहरातील एका शाळेमध्ये शिकणार्‍या अल्पवयीन मुलीला काही धर्मांध त्रास देत होते. याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या तिच्या वडिलांना रक्त येईपर्यंत धर्मांधांनी मारहाण केली. त्यामुळे शहरातील मुलींचा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. ‘धर्मांधांकडून होणार्‍या त्रासापासून सुरक्षित रहाण्यासाठी पोलिसांनी कठोर उपाययोजना करावी’, अशी मागणी ‘हिंदु राष्ट्र समन्वय समिती’च्या वतीने निवेदनाद्वारे पोलीस प्रशासनाकडे केली आहे. (अशी मागणी का करावी लागते ? – संपादक)        शहरातील ‘स्टार इंग्लिश मीडियम स्कूल’ मध्ये शिकणार्‍या मुलीला शाळेत सोडण्यासाठी आणि आणण्यासाठी तिचे वडील जातात. एके दिवशी तेथील सुफियान अमर शेख, नजम हुसेन शेख आणि इतर दहावीतील धर्मांध मुलांनी मुलीला पाहून चिडवले. याचा राग आल्यानंतर वडील त्या मुलांना जाब विचारण्यासाठी गेले असता मुलांनी संघटितपणे त्यांच्यावर आक्रमण केले. वडिलांच्या डोक्याला लागल्याने त्यांना रक्तस्त्राव झाला. वडिलांनी कराड शहर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. (हिंदूंच्या देशात हिंदूंच्या मुलींची पाकिस्तानात असल्याप्रमाणे स्थिती झालेली आहे ! – संपादक)

निवेदनामध्ये म्हटले आहे की, संबंधितांकडून होणारा त्रास हा नवीन नसून यापूर्वीही अनेकदा अशा प्रकारे मुलीला चिडवणे आणि मानसिक त्रास देणे चालूच होते. मुलीच्या वडिलांनी शांततेच्या दृष्टीने त्याकडे दुर्लक्ष केले; मात्र त्यामुळे संबंधितांची मुजोरी वाढली आहे. सध्या राज्यामध्ये अल्पवयीन मुलींवरील अत्याचार आणि छेडछाडीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे मुलीच्या सुरक्षिततेविषयी गंभीर चिंता निर्माण झाली असून तिच्या जीवितास आणि सुरक्षिततेस धोका निर्माण झाला आहे. तरी पोलीस प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने नोंद घेऊन संबंधित आरोपींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, प्रकरणाचे सखोल अन्वेषण करावे, तसेच अल्पवयीन मुलीच्या आणि तिच्या कुटुंबियांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक ती संरक्षणात्मक उपाययोजना करावी.