सरसेनापती नेताजी पालकर स्मारकासाठी एक कोटी रुपयांच्या निधीची घोषणा !

‘छावा मराठा संघटने’च्या पदाधिकार्‍यांशी चर्चा करतांना नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे, तसेच अन्य

नांदेड – छत्रपती शिवाजी महाराजांचे पराक्रमी सरसेनापती नेताजी पालकर यांच्या हदगाव तालुक्यातील तामसा येथील ऐतिहासिक समाधीस्थळाचा विकास करून भव्य स्मारक उभारण्यात येणार असून त्यासाठी १ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे दुग्धविकास, दिव्यांग सक्षमीकरण मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांनी केली.

तामसा येथील समाधीस्थळाच्या विकासासाठी ‘छावा मराठा संघटने’च्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चालू असलेल्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री अतुल सावे यांनी आंदोलकांच्या शिष्टमंडळाशी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात चर्चा केली. या वेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष किशोर चव्हाण, मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक डॉ. राजेंद्र दाते पाटील यांनी तामसा परिसराचे ऐतिहासिक महत्त्व अधोरेखित करत स्मारक उभारणीसाठी शासनाने आवश्यक कार्यवाही करावी, अशी मागणी केली. त्या वेळी पालकमंत्री अतुल सावे यांनी ही घोषणा केली.

या वेळी खासदार डॉ. अजित गोपछडे, आमदार राजेश पवार, आमदार भीमराव केराम, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.