Sonam Wangchuk : आमरण उपोषण करणारे सोनम वांगचुक यांना देहली पोलिसांनी रुग्णालयात केले भरती !

वांगचुक यांच्या ठिकाणी आता अभिजीत दीपके बसले बेमुदत उपोषणाला !

नवी देहली – येथील जंतर मंतरवर गेल्या २१ दिवसांपासून आमरण उपोषणाला बसलेले सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना देहली पोलिसांनी पहाटेच सफदरजंग रुग्णालयात नेले. या वेळी गदारोळ झाला. पोलिसांनी आंदोलकांवर लाठीमार केल्याचा आरोप करण्यात आला. या वेळी पोलिसांनी आंदोलनाचे आयोजक अभिजीत दीपके यांनाही कह्यात घेतले होते; पण नंतर त्यांना सोडून देण्यात आले. आता दीपके यांनी आमरण उपोषणाची घोषणा केलू असून ते येथे उपोषणाला बसले आहेत. ‘२० जुलैला संसदेवर मोर्चा नेण्याचा संकल्प पूर्ण करू’ असेही त्यांनी घोषित केले.

१. या संदर्भात देहली पोलिसांनी ‘एक्स’वर म्हटले की, देहली उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आणि तज्ञ वैद्यकीय सल्ल्यानुसार सोनम वांगचुक यांची प्रकृती खालावत असल्याने त्यांना अत्यावश्यक वैद्यकीय उपचारांसाठी रुग्णालयात भरती करण्यात आले. उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करतांना आंदोलकांनी अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे थोडी गडबड झाली; परंतु पोलिसांनी कमालीचा संयम बाळगून ही कारवाई सुरक्षितपणे पार पाडली. आम्ही जंतर मंतर येथील आंदोलकांना विनंती करतो की, त्यांनी लवकरात लवकर शांततेने जागा रिकामी करावी.

२.  पोलीस उपायुक्त सचिन शर्मा यांनी सांगितले की, आंदोलकांवर कोणताही लाठीमार करण्यात आलेला नाही आणि कुणालाही नियंत्रणात घेण्यात आलेले नाही.

३. देशातील विविध परीक्षा संबंधित अनियमिततांवरून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या त्यागपत्राच्या मागणीसाठी वांगचुक यांनी प्रारंभ केलेल्या उपोषणाचा १८ जुलैला २१ वा दिवस आहे. सोनम वांगचुक यांना रुग्णालयात भरती केल्यानंतर आंदोलनकर्त्यांना जंतर मंतरवरून पोलिसांकडून हटवले जात आहे.