‘गायन, वादन, नृत्य आणि नाट्य या कलांतून ईश्वरप्राप्तीसाठी साधना’, याचे प्रास्ताविक विवेचन !
४ सप्टेंबर २०२५ या दिवसापासून प्रत्येक गुरुवारी चालू झालेल्या लेखमालेत आपण ‘गायन, वादन, नृत्य आणि नाट्य’, या कलांची माहिती घेत आहोत. या कलांच्या सादरीकरणाचा उद्देश काळाच्या प्रभावामुळे पालटत असला, तरी ‘कलेकडे केवळ कला म्हणून न पहाता कलेतून आध्यात्मिक उन्नती कशी साधावी’, हे येथे पाहूया.
(लेखांक १९)
‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी निर्माण केलेल्या आणि कलियुगासाठी उपयुक्त असलेल्या ‘गुरुकृपायोगानुसार साधना’, या साधनामार्गाचे वैशिष्ट्य आपण १६ एप्रिलच्या लेखात जाणून घेतले. या साधनामार्गाच्या अंतर्गत अष्टांग साधनेची आठ अंगे पुढीलप्रमाणे आहेत – १. स्वभावदोष-निर्मूलन आणि गुण-संवर्धन, २. अहं-निर्मूलन, ३. नामजप, ४. भावजागृतीसाठी करायचे प्रयत्न, ५. सत्संग, ६. सत्सेवा, ७. सत्साठी त्याग आणि ८. प्रीती (इतरांविषयी निरपेक्ष प्रेम). अष्टांग साधनेनुसार कलाकाराने साधनेचे प्रयत्न केल्यास त्याची अध्यात्मात शीघ्र गतीने प्रगती होऊ शकते. साधनेची ही ८ अंगे कलाकाराला ‘साधक-कलाकार’ अन् त्याहून पुढे ‘संत-कलाकार’, या टप्प्यापर्यंत पोचवू शकतात. ‘कलाकाराने अष्टांग साधनेतील प्रत्येक अंग आपल्या कलेला कसे जोडायचे ? त्याची वैशिष्ट्ये कोणती आहेत ? आणि त्यामुळे आपल्याला साधनेत काय लाभ होऊ शकतो ?’, यांविषयी आपण पुढील काही लेखांतून जाणून घेणार आहोत. आजच्या लेखात आपण ‘नामजप’ या महत्त्वाच्या टप्प्यामुळे कला-साधनेत कोणते लाभ होतात ?’, ते समजून घेणार आहोत.
याच्या आधीचा लेख वाचण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/1030447.html
१. ‘नामजप’ म्हणजे काय ?
गुरुकृपायोगानुसार साधनेतील एक महत्त्वाचा टप्पा, म्हणजे ‘नामजप.’ ‘भगवंताचे नाम पुनःपुन्हा घेणे’, म्हणजेच नामजप करणे. ब्रह्मवैवर्तपुराणामध्ये जपाविषयी संस्कृतमधील व्याख्या पुढीलप्रमाणे दिली आहे – ‘जकारो जन्म विच्छेदकः पकारो पापनाशकः ।’, म्हणजे ‘पापांचा नाश करून जन्म-मृत्यूच्या फेर्यांतून सोडवतो, तो जप !’

२. कलियुगात ‘नामजप’ ही सर्वश्रेष्ठ साधना आहे !
विविध युगांमध्ये भगवंताच्या प्राप्तीसाठी करायच्या उपासना सांगितल्या आहेत. आता कलियुगात ‘कलियुगी नामची आधार ।’, असे अनेक संतांनी सांगितले आहे, तसेच श्रीमद्भगवद्गीतेत स्वतः भगवान श्रीकृष्णाने म्हटले आहे, ‘यज्ञानां जपयज्ञोऽस्मि ।’, म्हणजेच ‘सर्व यज्ञांमध्ये मी (श्रीकृष्ण) जपयज्ञ आहे’; म्हणूनच कलियुगात ‘नामजप’ ही सर्वश्रेष्ठ साधना आहे.
३. कोणत्या देवतेचा नामजप करावा ?
‘आपण कोणता नामजप करायचा ?’, हे आपल्याला ठाऊक नसते. ज्या कुळाचा कुलदेव अथवा कुलदेवी यांचा नामजप आपल्या साधनेला आवश्यक असतो, त्याच कुळात आपला जन्म झालेला असतो. त्यामुळे आपली साधना होण्यासाठी आपण आपल्या कुलदेवतेचा, म्हणजेच कुलदेवीचा किंवा कुलदेवाचा जप करणे आवश्यक असते. कुलदेवतेच्या नामजपामुळे आपली कुंडलिनीशक्ती जागृत होते आणि आपल्या आध्यात्मिक उन्नतीला आरंभ होतो. कुलदेवता ही आपल्या प्रारब्धाशी निगडित असलेली देवता असल्यामुळे तिच्या नामजपामुळे प्रारब्धाचे भोगही सुसह्य होतात.
४. नामजपाची वैशिष्ट्ये
४ अ. बंधनविरहित : नामस्मरण ही सोपी आणि परिपूर्ण साधना आहे. नामजप आपण सहजतेने कुठेही आणि कोणत्याही क्षणी करू शकतो. नामजपाला ‘मासिक पाळी, शौच-अशौच, सुवेर, सुतक’ इत्यादी कशाचेही बंधन नाही.
४ आ. भगवंताशी अखंड अनुसंधान : नामस्मरणाद्वारे भगवंताशी अखंड अनुसंधान राहू शकते; म्हणून ही अखंड होणारी साधना आहे. ज्याप्रमाणे आपण एखाद्याला सतत हाक मारल्याने तो आपल्याकडे वळून पहातो, त्याचप्रमाणे भगवंताचे सतत नामस्मरण केल्याने तोही आपल्याकडे लक्ष देतो.
४ इ. शरीर अथवा मन यांच्या कोणत्याही स्थितीत करता येणारी साधना : नामस्मरण होण्यासाठी आपले शरीर अथवा मन यांची स्थिती कशीही असली, तरी अडथळा ठरत नाही, म्हणजेच रुग्णाईत असतांना, आनंदाच्या समयी किंवा कठीण प्रसंगी, असे केव्हाही आपण नामजप करू शकतो.
५. नामजपामुळे होणारे शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक स्तरांवरील काही लाभ !
५ अ. शारीरिक लाभ : नामजपामुळे मनातील विचार न्यून होत असल्याने मनःशांती मिळते. परिणामी मानसिक ताणामुळे होणारे शारीरिक विकार होत नाहीत आणि शरीरस्वास्थ्य चांगले रहाते.
५ आ. मानसिक लाभ : नामजपामुळे तणाव नाहीसा होऊन मनोबल वाढते. मन स्थिर आणि शांत रहाते.
५ इ. आध्यात्मिक लाभ
१. ईश्वरापर्यंत पोचण्याची किल्ली, म्हणजेच ‘नामजप’ आहे. नामजपामुळे चित्तावर नामाचा संस्कार होत राहिल्याने मनाची एकाग्रता वाढते.
२. नामजपामुळे आपल्याला गुरूंची प्राप्ती होते आणि त्यामुळे आध्यात्मिक उन्नतीही जलद होते.
३. मन अंतर्मुख रहाते, तसेच मनुष्याच्या देहावरील त्रासदायक आवरण नष्ट होते, वाईट शक्तींचे त्रास नष्ट होतात. वास्तूदोष, पितृदोष इत्यादी दूर होतात. वास्तूमध्ये जर अखंड नामजप लावला, तर त्या वास्तूमध्ये सात्त्विक स्पंदने निर्माण होतात.
४. नामजपामुळे रुग्णाचे मंद प्रारब्ध नष्ट होते, मध्यम प्रारब्ध न्यून होते आणि तीव्र प्रारब्ध भोगून संपवण्यासाठी मनाची सिद्धता होते. नामजपामुळे आपले प्रारब्ध जळते.
६. साधक-कलाकाराला नामजपामुळे होणारे विविध लाभ !
कला-साधनेत ‘नामजप’, हा एक महत्त्वाचा घटक ठरू शकतो. काळानुसार ‘नाम’ हे साधनेचे मूळ आहे. त्यामुळे केवळ कलाच नव्हे, तर कोणत्याही क्षेत्रातून साधना करायची असल्यास त्या व्यक्तीला नामजपाचा पुष्कळ लाभ होऊ शकतो. नामजपामुळेच कलाकाराच्या कलेमध्ये ईश्वराचे चैतन्य निर्माण होऊ शकते. कला-साधनेत नामजपामुळे होणारे विविध लाभ जाणून घेऊया.
६ अ. साधक-कलाकारामध्ये चैतन्य निर्माण झाल्याने त्याचा लाभ प्रेक्षकांनाही होणे : नामजपामुळे साधक-कलाकारामध्ये ‘चैतन्य’ निर्माण झाल्याने कलाकारासहित साथ-संगत करणारे कलाकार, तसेच प्रेक्षक यांना ते चैतन्य अनुभवता येऊ शकते. त्या चैतन्यामुळे आजूबाजूच्या व्यक्तींसहित संगीतोपयोगी वस्तू, उदा. वाद्य, घुंगरू, नर्तकांचे दागिने इत्यादींमध्येही चैतन्य निर्माण होते. वातावरणही प्रसन्न होऊन परिसरात एक सात्त्विक ऊर्जा कार्यरत होते. तिचा सर्वांनाच आध्यात्मिक स्तरावर लाभ होऊ शकतो.
६ आ. कलेत आध्यात्मिक स्थिती अनुभवता येणे : ‘नामजप’ ही श्रेष्ठ साधना असल्याने अखंड नामस्मरणामुळे कलाकार कलेत आध्यात्मिक स्थिती अनुभवू शकतो. साधकाच्या जीवनात कला ही केवळ एक ‘सादरीकरण’ न रहाता त्याला कलेतून उच्च स्तराच्या आध्यात्मिक अनुभूती येतात, उदा. डोळ्यांतून भावाश्रू येणे, ध्यान लागणे इत्यादी.
६ इ. मनाची एकाग्रता साधता येणे : कलेच्या सरावामध्ये अथवा सादरीकरणामध्ये ‘मनाची एकाग्रता’ पुष्कळ आवश्यक आहे. ही एकाग्रता नामजपामुळे जलद साधता येते. त्यामुळे साधक-कलाकार आणि त्याची साधना यांची फलनिष्पत्ती वाढते.
६ ई. आनंद आणि प्रसन्नता यांची अनुभूती येणे : नामजपामुळे आनंद मिळण्याचे प्रमाण पुष्कळ वाढते. या आनंदाचे प्रक्षेपण कलाकाराच्या कलेच्या सादरीकरणात होते. ‘Face is the mirror of our Mind !’, म्हणजेच ‘चेहरा हा आपल्या मनाचा आरसा आहे’, असे म्हटले जाते. नामजपाने मन स्थिर आणि आनंदी असल्याने कलाकाराच्या चेहर्यावर प्रसन्नता दिसते, तसेच कलेच्या सादरीकरणाच्या वेळीही कलाकार प्रसन्नतेची अनुभूती घेऊ शकतो.
६ उ. ईश्वराशी अखंड अनुसंधान रहाणे : कला-साधनेत नामजपामुळे होणारा सर्वांत महत्त्वाचा लाभ, म्हणजे ‘ईश्वराशी अखंड अनुसंधान रहाणे.’ त्यामुळे साधक-कलाकाराला शरणागती आणि भावावस्था अनुभवता येऊ शकते. ‘मी काही करत नसून देवच माझ्याकडून कला सादर करून घेतो’, ही जाणीव त्याला सतत रहाते. नामजपामुळे कलाकाराच्या भोवती चैतन्याचे संरक्षककवच निर्माण होते.
७. नामजपाचा ‘कलाकार आणि त्यांची कला’, यांच्यावर झालेल्या परिणामांचा महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने करण्यात आलेला प्रयोग !
नोव्हेंबर २०२५ मध्ये महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने एक प्रयोग करण्यात आला. यामध्ये श्री. सागर बळगुर्गी (तबला विशारद, कोल्हापूर) आणि कु. चांदणी आसोलकर (भरतनाट्यम् विशारद, गोवा) यांनी प्रत्येकी २० मिनिटे अनुक्रमे वादन अन् नृत्य प्रस्तुत केले. त्यानंतर या दोघांनी २० मिनिटे बसून नामजप केला. नंतर त्यांनी तेच वादन आणि नृत्य पुन्हा प्रस्तुत केले. त्या वेळी ते कलाकार आणि प्रेक्षक यांना जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.
७ अ. कलाकारांनी नामजप न करता कला प्रस्तुत करणे : दोघांनीही नामजप न करता कला सादर केली. त्या वेळी त्यांच्या संदर्भात ‘कर्तेपणा जाणवणे, आत्मविश्वास अल्प असणे, केवळ सादरीकरणापुरती कला सादर करणे’, ही सूत्रे जाणवली, तसेच कलेतून येणारी स्पंदनेही जडत्व देणारी होती. ही सूत्रे स्वतः ते कलाकार आणि प्रेक्षक यांनाही जाणवली.
७ आ. २० मिनिटे नामजप करून कला प्रस्तुत करणे : दोघांनीही २० मिनिटे नामजप करून कला प्रस्तुत केली. त्या वेळी श्री. सागर यांच्या तबल्यातून येणारा नाद हा मंजुळ जाणवत होता आणि त्यांच्या हातांची बोटे तबल्यावर हलकेपणाने पडत होती. कु. चांदणी यांच्या नृत्यामधील मुद्रा आणि पदन्यास यांत हलकेपणा जाणवला. नामजपामुळे दोघांच्या मनाची स्थिरता वाढली होती. या वेळी वादन करतांना श्री. सागर यांची भावजागृती झाली. अशाच अनुभूती प्रेक्षकांनाही आल्या.
कलाकारांनी केवळ २० मिनिटे नामजप करून कलेचे प्रस्तुतीकरण केल्यानंतर कलाकार आणि प्रेक्षक यांना या अनुभूती आल्या, तर ‘प्रतिदिन नामजप केल्याने कला-साधनेत त्याचा किती सकारात्मक परिणाम होऊ शकतो !’, याची कल्पना आपण नक्कीच करू शकतो.’
संग्राहक : कु. म्रिणालिनी देवघरे, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, फोंडा, गोवा. (११.४.२०२६)
कलाकारांनो, स्वतःत आणि स्वतःच्या कलेत चैतन्य निर्माण करण्यासाठी प्रतिदिन नामजप करा !
‘नामजप’ हे भगवंताने त्याच्याशी एकरूप होण्यासाठी दिलेले एक सुंदर माध्यम आहे. नामजपामुळे कलाकारात आणि पर्यायाने त्याच्या कलेतही चैतन्य निर्माण होत असल्याने कला आध्यात्मिक स्वरूपात बहरू लागते. त्यामुळे कलाकाराने दिवसभरातून न्यूनतम १ – २ घंटे आपल्या इष्टदेवतेचा अथवा कुलदेवतेचा नामजप करावा, तसेच त्याने कला प्रस्तुतीकरणापूर्वी अथवा सरावापूर्वी (रियाजापूर्वी) ५ – १० मिनिटे नामजप करावा. कलाकारांनो, अशा प्रकारे कलेला ‘नामसाधना’ जोडून भगवंताच्या चरणी कलापुष्प समर्पित करूया !’
– कु. म्रिणालिनी देवघरे

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने विरार येथे धर्मप्रेमींसाठी ‘स्नेह’ मेळावा !
मनुष्याचे शरीर, चित्त, मन आणि बुद्धी यांच्यावर प्रारब्धाचा असलेला प्रभाव अन् त्यांचा ग्रहांशी असलेला संबंध !
स्वीकारण्याची वृत्ती असलेल्या आणि तळमळीने अन् भावपूर्ण सेवा करणार्या रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील श्रीमती मधु मेहता !
रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या साधनावृद्धी शिबिराच्या वेळी साधकांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती
साधकांचा आधारस्तंभ असलेल्या आणि भजनांतून देवाला आळवणार्या ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या नागपूर येथील कै. (सौ.) जयश्री क्षीरसागर (वय ७१ वर्षे) !
साधक, धर्मप्रेमी आणि हिंदुत्वनिष्ठ यांना मार्गदर्शन करून त्यांना साधना करण्यास उद्युक्त करणारे कर्नाटकातील सनातनचे ७५ वे (समष्टी) संत पू. रमानंद गौडा (वय ५० वर्षे) !