कलेतून साधना होण्यासाठी कला-उपासकात आवश्यक असलेले गुण !

‘गायन, वादन, नृत्य आणि नाट्य या कलांतून ईश्वरप्राप्तीसाठी साधना’, याचे प्रास्ताविक विवेचन !

४ सप्टेंबर २०२५ या दिवसापासून प्रत्येक गुरुवारी चालू झालेल्या लेखमालेत आपण ‘गायन, वादन, नृत्य आणि नाट्य’, या कलांची माहिती घेत आहोत. या कलांच्या सादरीकरणाचा उद्देश काळाच्या प्रभावामुळे पालटत असला, तरी ‘कलेकडे केवळ कला म्हणून न पहाता कलेतून आध्यात्मिक उन्नती कशी साधावी’, हे येथे पाहूया.

(लेखांक १)

‘कलाकार अथवा कला शिकणारा यांना कलेच्या माध्यमातून साधना करायची असल्यास त्याच्यामध्ये काही गुण असणे आवश्यक असते. या गुणांमुळे कला-उपासक (साधक) कलेच्या माध्यमातून साधनेत जलद प्रगती करू शकतो. त्यांपैकी ‘साधनेची गोडी असणे, जिज्ञासा, विचारण्याची वृत्ती, ऐकण्याची वृत्ती, तत्परतेने कृती करणे, शिकण्याची वृत्ती आणि तळमळ’, या गुणांविषयी आपण मागच्या लेखात जाणून घेतले. आजच्या लेखात आपण उर्वरित गुणांविषयी समजून घेणार आहोत.

(भाग २)

याच्या आधीचा लेख वाचण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/1022424.html

७. सहजावस्था

आपल्यातील सहजता आपल्याला सर्वांमध्ये मिसळायला शिकवते. सहजतेमुळे आपले अनेक गुण उलगडू शकतात. व्यक्तीमध्ये सहजता असली, तर इतर लोकही त्या व्यक्तीशी सहजतेने बोलू शकतात, तसेच इतरांना तिची भीती न वाटता तिच्याविषयी आपलेपणा वाटतो; परंतु एखाद्यामध्ये सहजता अल्प असेल किंवा ती कुणाशी मिसळत नसेल, तर फारसे कुणी तिच्याशी बोलायला जात नाही. कलाकारामध्ये सहजता असेल, तर सर्वांना त्याच्याशी सहजतेने संवाद साधता येऊ शकतो.

पूर्वीच्या काळच्या अनेक विख्यात कलाकारांची उदाहरणे पाहिली, तर आपल्या लक्षात येते की, त्यांचे रंगमंचावर कला सादर करण्यात प्रभुत्व असले, तरी रंगमंचाच्या खाली उतरल्यावर त्यांचे वागणे हे सर्वसाधारण व्यक्तींप्रमाणे असायचे. ‘मी कलाकार आहे’, असे स्वतःचे वेगळे अस्तित्व नसल्याने ते सर्व लोकांशी स्वतःहून आपुलकीने वागू शकत होते. अशी सहजता कलाकाराला ‘स्वतः इतरांपेक्षा वेगळे आहोत’, या अहंभावापासून दूर ठेवते.

८. प्रांजळपणा

आपण अनेक कलाकारांना त्यांच्या कलेच्या सादरीकरणापूर्वी किंवा नंतर ‘या कला प्रस्तुतीकरणात जे काही चांगले झाले, त्याचे श्रेय माझ्या गुरूंना आहे आणि माझ्या कलेत ज्या काही त्रुटी राहिल्या, त्या माझ्या आहेत’, असे म्हणतांना ऐकले असेल. एखाद्या प्रसंगी कलाकार कलेचे सादरीकरण करतांना ताल अथवा लय यांत चुकल्यास प्रांजळपणे ‘मी चुकलो’, असे सांगून क्षमायाचना करतांनाही आपण पाहिले असेल. कलाकारामध्ये सहजावस्था असेल, तर त्याच्यात प्रांजळपणाही निर्माण होतो. प्रांजळपणे स्वतःच्या चुका स्वीकारून स्वतःतील अपूर्णता मान्य करणार्‍या कलाकारांमध्ये अहं अल्प असतो. प्रांजळपणामुळे कलाकाराचे मन निर्मळ रहाते. ‘शिकण्याची वृत्ती’, ‘सहजावस्था’ आणि ‘प्रांजळपणा’, हे गुण कलाकाराला साधनेच्या प्रत्येक टप्प्याला साहाय्यक ठरतात.

९. कर्तेपणा देवाच्या चरणी अर्पण करणे

कु. शर्वरी कानस्कर

गायन, वादन, नृत्य अन् नाट्य या ललित कला (टीप १) आहेत. या कला दैवी आहेत. ‘कलाकार इतर व्यक्तींच्या तुलनेत अधिक पुण्य घेऊन जन्माला आलेला असतो’, असे म्हटले जाते. कला जोपासणार्‍यामध्ये मुळातच ‘गोड गळा’, ‘मोठ्या ताना सहजतेने घेणे’, ‘वादनकलेतील नैपुण्य’ अथवा ‘नृत्याच्या पदन्यासावर अथवा लयकारीवर प्रभुत्व’ इत्यादी गुण असू शकतात. त्यामुळे ‘आपल्या कलेचे चांगले सादरीकरण झाले’, ‘आपल्याला जमले’, ‘आपल्यात निपुणता आहे’, यांसारखे विचार कलाकाराच्या अथवा कला शिकणार्‍याच्या मनात येऊ शकतात; परंतु या विचारांमुळे त्याचा अहं वाढण्याची शक्यता असते.

टीप १ – ललित कला : सौंदर्य, भाव, कल्पना आणि रस यांची अभिव्यक्ती करून मनाला आनंद देणार्‍या कलांना ‘ललित कला’, असे म्हणतात. संगीत, नृत्य, नाट्य, मूर्तीकला आणि चित्रकला या ‘ललित कला’ आहेत.

‘प्रत्येक गुण हा भगवंताचा आहे’, असा भाव मनात ठेवल्यास आपले प्रयत्न आणि यशाचे श्रेय देवाच्या चरणी अर्पण होऊ शकतात. ‘सर्वकाही देवाच्या कृपेने होते आणि देवच करून घेतो’ किंवा ‘गुरूंच्या आशीर्वादाने सर्व होते’, असा भाव असल्यास कर्तेपणा रहात नाही. आपले कर्तृत्व भगवंताच्या चरणी अर्पण केल्यास भगवंत आपल्याला आणखी पुढच्या टप्प्याचे ज्ञान देतो. जर आपण सतत कृतज्ञताभावात रहाण्याचा प्रयत्न केला, तर कर्तेपणा न्यून होऊन आपली कला आपण देवाच्या चरणी अर्पण करू शकतो.

१०. सात्त्विकतेची ओढ असणे आणि सात्त्विक कलापरंपरांचे जतन करणे

प्रत्येक व्यक्तीत सत्त्व, रज आणि तम हे तीन गुण अल्प-अधिक प्रमाणात असतात. जर व्यक्तीने स्वतःतील सत्त्वगुण वाढवण्यासाठी आचार, विचार, आहार आणि दैनंदिन जीवनातील कृती सात्त्विक करण्याचा प्रयत्न केला, तर तिच्यातील सत्त्वगुण वाढून रजोगुण अन् तमोगुण आपोआप न्यून होऊ लागतात. ही सात्त्विकता कलाकाराच्या कलेतही दिसून येते. त्याच्या कलेतूनही सात्त्विक स्पंदने प्रक्षेपित होऊ लागतात. काही कलाकार नाविन्याच्या नावाखाली गुरूंनी शिकवलेल्या सात्त्विक आणि पारंपरिक पद्धतीत स्वतःच्या मनाने पालट करतात. त्यामुळे तिचे मूळ शुद्ध रूप हरपून जाते. याउलट कलाकाराने गुरूंच्या शिकवणीचे मूळ न विसरता त्याचे जतन करून सात्त्विक कलापरंपरेचा वारसा पुढे चालवायला हवा.

११. ईश्वरावरील श्रद्धा आणि भाव

गायन कलेद्वारे ईश्वरी तत्त्वाचा परमोच्च आनंद अनुभवणारे मूर्तीमंत उदाहरण, म्हणजे ‘स्वामी हरिदास.’ स्वामी हरिदास हे केवळ ईश्वरासाठी गायन करत. स्वामींप्रमाणेच संत मीराबाई आणि संत नरसी मेहता यांनी त्यांच्या आर्त स्वरांनी श्रीकृष्णाला आळवून त्याची भक्ती केली. ‘संत सूरदासांच्या उत्कट भावभक्तीमुळे त्यांचे गायन ऐकायला साक्षात् श्रीकृष्ण यायचा’, असे उल्लेख आढळतात. या संतांनी कलेतून ईश्वराची आराधना केली. त्यांची भगवंतावरची अतूट श्रद्धा आणि भाव कलेच्या माध्यमातून साधना करणार्‍यांसाठी आदर्शच आहे. त्यांच्याप्रमाणे आपल्यालाही कलेच्या माध्यमातून काही अंशी जरी भगवंताप्रती भाव व्यक्त करता आला, तरी आपल्याला कलेतून आनंदावस्था अनुभवता येईल. ‘भगवंत भावाचा भुकेला आहे’, असे म्हणतात, म्हणजे भगवंत आपल्या मनातील भाव पहात असतो आणि भावभक्तीने सादर केलेली कला भगवंताच्या चरणी अर्पण होते. त्यामुळे कलाकाराच्या मनात ईश्वराप्रती भाव असणे पुष्कळ आवश्यक आहे. हा भाव त्याच्या कलेतूनही प्रगट होतो.

‘अनेक कलाकारांच्या कलेचे सादरीकरण पाहून आपल्या डोळ्यांत अश्रू येतात’, असे आपण अनुभवले असेल किंवा ‘कलाकार त्याची कला प्रस्तुत करतांना त्याच्या डोळ्यांतही कधी अश्रू तरळतात’, असेही पाहिले असेल. हे अश्रू म्हणजे भावाचा ओला स्पर्श आहे ! ते भाव व्यक्त करण्याचे एक सुंदर माध्यम आहे. त्यामुळे कलाकाराचा भगवंताप्रती जितका भाव असेल, तितकी त्याची कला भावपूर्ण अन् परिपूर्ण सादर होऊन ईश्वरचरणी अर्पण होऊ शकते.

१२. कलेसह नियमित साधनाही करणे

ज्याप्रमाणे कलाकार कलेचा अभ्यास प्रतिदिन करतो, त्याप्रमाणे त्याने दैनंदिन साधनेचे प्रयत्नही करायला हवेत. नामजप, प्रार्थना, कृतज्ञता किंवा इतर साधना सातत्याने केल्याने कलाकाराचे मन ईश्वरी अनुसंधानात रहाते. त्यामुळे त्याच्यात ईश्वराविषयी भाव निर्माण व्हायला साहाय्य होते. कलाकाराच्या भावस्थितीमुळे त्याच्या कलेतही चैतन्य निर्माण होऊन त्याला कलेतून विविध अनुभूती घेता येतात. ‘ही भावावस्था अखंड कशी अनुभवावी ? यासाठी आणखी काय प्रयत्न करावेत ?’, यासाठी त्याने सतत मार्गदर्शन घेऊन प्रयत्नशील रहावे.

कलेतून साधना होण्यासाठी कलाकार-साधकात आवश्यक असलेले गुण आपण या लेखातून समजून घेतले. प्रत्येकामध्ये हे सर्वच गुण असतील, असे नाही. साधनेच्या दृष्टीने यांपैकी आपल्यात जे गुण आहेत, त्यांची वृद्धी करण्याचा प्रयत्न करावा आणि काही गुणांचा अभाव असेल, तर ते गुण अंगी येण्यासाठी प्रयत्नशील रहावे. ‘या गुणांचा अभ्यास व्हावा आणि कलाकार-साधकाला साधनेत जलद आध्यात्मिक प्रगती करता यावी’, यासाठी हा विषय मांडला आहे.

कलाकाराच्या कलेच्या माध्यमातून साधनेसाठी हे गुण पोषक असल्याने कलाकाराने या गुणांच्या वृद्धीसह आध्यात्मिक गुरूंचे मार्गदर्शन घेतल्यास त्याला निश्चितच कलेतून साधना करता येईल.’

(समाप्त)

संग्राहक : कु. शर्वरी कानस्कर (आध्यात्मिक पातळी ६० टक्के, वय १९ वर्षे), महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, फोंडा, गोवा. (१३.३.२०२६)

पुढील लेखांक १८ वाचण्यासाठी क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/1030447.html

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या काही वेळा अनिष्ट शक्तींमुळे किंवा ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांना / संतांना / धर्मप्रेमींना आलेल्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सर्वांनाच येतील, असे नाही. - संपादक