पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीवरील रासायनिक लेपनाची स्थगिती जिल्हा न्यायालयाने उठवली !


सोलापूर – पंढरपूरच्या ‘स्वयंभू’ श्री विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीवर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती आणि पुरातत्व विभाग यांच्याकडून २२ आणि २३ जून या दिवशी रासायनिक वज्रलेपन करण्यात येणार होते. याच्या विरोधात वारकरी संप्रदाय आणि महाराष्ट्र मंदिर महासंघ यांनी पंढरपूर येथील दिवाणी न्यायालयात (कनिष्ठ स्तर) याचिका प्रविष्ट केली होती. त्यावर निर्णय देतांना न्यायालयाने रासायनिक लेपनास स्थगिती दिली होती. यावर मंदिरे समितीने जिल्हा न्यायालयात अपील केले होते. दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून जिल्हा न्यायालयाने १७ जुलै या दिवशी निकाल देत ही स्थगिती उठवली आहे.

वारकरी संप्रदाय, श्री. बाळकृष्ण डिंगरे आणि महाराष्ट्र मंदिर महासंघाचे श्री. पुरुषोत्तम (गणेश) लंके यांनी पंढरपूर येथील दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) यांच्या न्यायालयात हा दावा प्रविष्ट केला होता.

कोल्हापूर येथील ‘सर्कीट बेंच’मध्ये दाद मागणार ! – अधिवक्ता सुधीर रानडे

या संदर्भात वारकरी संप्रदाय आणि महाराष्ट्र मंदिर महासंघ यांच्या वतीने पंढरपूर येथील न्यायालयात बाजू मांडणारे अधिवक्ता सुधीर रानडे म्हणाले, ‘‘न्यायालयाने निर्णय देतांना तांत्रिक सूत्रांचा विचार करून निकाल दिला आहे. यात धार्मिक दृष्टीकोनातून विचार झालेला नाही. त्यामुळे या निर्णयाच्या विरोधात आम्ही कोल्हापूर येथील मुंबई उच्च न्यायालयाच्या ‘सर्कीट बेंच’मध्ये (न्यायालयाचे एक तात्पुरते ठिकाण, जेथे उच्च न्यायालयातील न्यायमूर्ती ठराविक कालावधीत येऊन खटले (प्रकरणे) चालवतात) दाद मागू.’’