गुरुकृपेने भावपूर्ण वातावरणात पार पडलेला सनातनचे पहिले बालसंत पू. भार्गवराम प्रभु (वय ८ वर्षे) यांचा उपनयन सोहळा !

‘५.२.२०२६ या दिवशी मंगळुरू (कर्नाटक) येथे माझा नातू (मुलाचा मुलगा) पू. भार्गवराम प्रभु (वय ८ वर्षे) यांचा उपनयन सोहळा झाला. त्या वेळी मला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.

पू. भार्गवराम प्रभु

१. कुलदेवाला निमंत्रण देण्यासाठी गोव्याला जातांना वाटेत वाहनाचा भीषण अपघात होऊनही कुणाला दुखापतही न होणे

दक्षिण भारतात एखाद्याच्या घरी काही कार्यक्रम ठरल्यानंतर सर्वप्रथम कुलदेवतेला निमंत्रण देण्याची पद्धत आहे. जांबावली (गोवा) येथील ‘दामोदर’ हा आमचा कुलदेव आहे. त्याला कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यासाठी आम्ही मंगळुरूहून गोव्याला जायला निघालो होतो. वाटेत २३.९.२०२५ या दिवशी आमच्या वाहनाचा भीषण अपघात झाला; परंतु गुरुकृपेने आम्हा कुणाला साधी दुखापतही झाली नाही.

श्रीमती अश्विनी प्रभु

२. श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या शिकवणीनुसार वरील प्रसंगाने घाबरून न जाता पुन्हा गोव्याला जाऊन कुलदेवाला निमंत्रण देणे 

अपघातानंतर आम्ही मंगळुरूला परतलो. श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ एकदा म्हणाल्या होत्या, ‘‘वाईट शक्ती आपल्या कार्यात अडथळे आणतात; पण आपण त्यांना घाबरून प्रयत्न सोडायचे नाहीत.’’ त्याप्रमाणे ४ – ५ दिवसांनी आम्ही पुन्हा गोव्याला गेलो आणि कुलदेवाला निमंत्रण देऊन परत आलो. त्यानंतर सर्वकाही सुरळीत पार पडले.

३. देवद आश्रमात जाण्याची संधी मिळणे आणि शुभकार्यासाठी तेथील संतांचे आशीर्वाद मिळाल्याने अंतःकरण आनंदाने भरून येणे 

माझी सून सौ. भवानी (पू. भार्गवराम यांची आई) हिच्या आजोबांना निमंत्रण देण्यासाठी आम्ही त्यांच्या घरी मुंबईला गेलो होतो. मुंबईत गेल्यावर आम्हाला देवद (पनवेल) येथील आश्रमात जाण्याची संधी मिळाली. त्या वेळी आम्हाला तेथील संतांचे दर्शन झाले. त्यांच्याकडून शुभकार्यासाठी आशीर्वाद आणि प्रसाद मिळाला. सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी स्वतः आम्हाला पूर्ण आश्रम फिरून दाखवला. तिथल्या अनेक संतांच्या प्रेमळ वागणुकीमुळे आमचे अंतःकरण आनंदाने भरून आले होते.

४. कार्यक्रमानंतर उपस्थितांना सात्त्विक उत्पादने भेट म्हणून देणे 

आमच्या समाजात कार्यक्रमानंतर उपस्थितांना मिठाईचे डबे देण्याची पद्धत आहे. आम्ही ‘सनातन संस्थे’च्या भेटवस्तू संचातून (बॉक्समधून) देण्याचे ठरवले. ‘नामस्मरण’ सर्वांपर्यंत पोचावे’, या उद्देशाने आम्ही त्या संचात ‘नामजप कसा करावा ?’, हा लघुग्रंथ, नामजपाची लहान माळ, सात्त्विक उदबत्ती आणि साबण या वस्तू ठेवल्या होत्या.

५. संतांची अनुभवलेली कृपा !

अ. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी ‘हा सोहळा निर्विघ्नपणे पार पडेल !’, असे सांगून आशीर्वाद दिला होता.

आ. कार्यक्रमाच्या दिवशी सकाळी पू. कर्वेमामांनी (पू. विनायक रघुनाथ कर्वे, सनातनचे २३ वे संत, वय ८३ वर्षे यांनी) कार्यक्रम निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी भावपूर्ण प्रार्थना केली. त्यामुळे सर्वांचा भाव जागृत झाला.

६. सभागृह नेहमीपेक्षा अधिक प्रकाशमान आणि प्रशस्त वाटणे 

सभागृहात व्यासपिठाच्या मागील बाजूला (बॅकड्रॉप) गुरु-शिष्य बोधचिन्ह आणि मोरपिसाचे चित्र लावल्यानंतर वातावरण अत्यंत सात्त्विक झाले. ‘सभागृह नेहमीपेक्षा अधिक प्रकाशमान आणि प्रशस्त वाटत होते’, असे अनेकांनी आवर्जून सांगितले.

७. ‘बटूला (पू. भार्गवराम यांना) पाहून ‘आपण ‘बाल शंकराचार्य’ पहात आहोत’, असे जाणवत होते’, असे प्रत्यक्ष उपस्थित असलेले लोक म्हणत होते.

८. कार्यक्रमाच्या वेळी पू. भार्गवराम यांनी प्रगल्भतेने वागणे 

संपूर्ण कार्यक्रमात पू. भार्गवराम अत्यंत शांत होते. त्यांनी कोणताही हट्ट केला नाही. आदल्या रात्री उशिरा झोपूनही ते सकाळी लवकर सिद्ध झाले. त्यांना भूक किंवा तहान लागल्याचे त्यांनी एकदाही सांगितले नाही. पुरोहितांनी सांगितलेल्या सर्व सूचनांचे त्यांनी तंतोतंत पालन केले. ते पुष्कळ गंभीर आणि स्थिर होते. घरी आल्यावर मात्र त्यांचा खोडकरपणा पुन्हा चालू झाला.

९. कार्यक्रमाला ५ संतांची वंदनीय उपस्थिती लाभल्याने सर्व साधकांना आनंद होणे

कार्यक्रमात पू. (श्रीमती) राधा प्रभु (पू. भार्गवराम यांच्या पणजी, सनातनच्या ४४ व्या संत, वय ८८ वर्षे), पू. कर्वेमामा (पू. विनायक रघुनाथ कर्वे, सनातनचे २३ वे संत, वय ८३ वर्षे), पू. (सौ.) शशिकला किणी (सनातनच्या १३१ व्या संत, वय ७९ वर्षे), पू. रमानंद गौडा (सनातनचे ७५ वे संत, वय ४९ वर्षे) आणि पू. वामन अनिरुद्ध राजंदेकर (सनातनचे दुसरे बालसंत, वय ७ वर्षे), या ५ संतांची उपस्थिती लाभली. त्यामुळे सर्व साधकांना पुष्कळ आनंद झाला.’

– श्रीमती अश्विनी प्रभु (पू. भार्गवराम यांच्या आजी (वडिलांची आई)), आध्यात्मिक पातळी ६३ टक्के, वय ६० वर्षे), मंगळुरू, कर्नाटक. (६.३.२०२६)      

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या काही वेळा अनिष्ट शक्तींमुळे किंवा ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांना आलेल्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सर्वांनाच येतील, असे नाही. – संपादक