मूळ प्रश्न - सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : देवांना सर्व कार्य सूक्ष्मातून करता येते, तरीही ते अवतार का घेतात ?

१. देवांची धर्माच्या संदर्भातील कार्ये
१ अ. ‘भक्तांचे रक्षण आणि दुर्जनांचा नाश’ ही कार्ये करणे : जेव्हा पृथ्वीवर दुर्गमासुराने उच्छाद मांडून देवीभक्त ऋषींचा छळ करण्यास आरंभ केला, तेव्हा आदिशक्तीने ‘श्रीदुर्गादेवी’चा अवतार धारण केला. तिला प्राप्त झालेल्या ब्रह्मदेवाच्या वरदानामुळे तिने देवतांसाठी अजेय असलेल्या दुर्गमासुराशी घनघोर युद्ध करून त्याचा नाश केला.
१ आ. धर्माची वेळोवेळी विस्कटलेली घडी नीट (पूर्ववत्) बसवून धर्मस्थापनेचे कार्य करणे : सत्ययुगात श्री गणेशाने ‘महोत्कट विनायक’ हा अवतार धारण केला होता. महोत्कट विनायकाचा जन्म सत्ययुगात कश्यप ऋषि आणि अदिती यांच्या पोटी झाला. त्या वेळी शिवाकडून वरदान प्राप्त झालेले देवान्तक आणि नरान्तक सर्व लोकांवर राज्य स्थापित करून अन् गर्वाने उन्मत्त होऊन मनुष्य, ऋषी आणि देवता यांना त्रास देत होते. या अवतारात महोत्कट विनायकाने देवान्तक आणि नरान्तक या असुरांशी घनघोर युद्ध करून त्यांना ठार मारले अन् सर्वत्र धर्मसंस्थापना करून अवतार समाप्ती केली. त्याचप्रमाणे श्रीविष्णूचे दशावतार, श्री गणेशाचे चार अवतार, देवीचे अनेक अवतार वेळोवेळी प्रगट झाले होते.
२. सत्य, त्रेता, द्वापर आणि कलि या चार युगांच्या अंतर्गत येणार्या उपकलियुगाचा नाश करून पुन्हा उपसत्ययुगाचा प्रारंभ करण्यासाठी
कलियुगांतर्गत कलियुगाचा शेवट करून लहानशा रामराज्याची स्थापना करण्यासाठी कलियुगातील ७ व्या शतकात शिवाने ‘आद्य शंकराचार्य’ यांच्या रूपात मनुष्य अवतार धारण केला. त्यांनी हिंदु धर्मावर आघात करणार्या घटकांचा समूळ नाश करून भारतासह नेपाळमध्येही रामराज्याची स्थापना केली.
३. सृष्टीच्या संदर्भातील कार्ये करण्यासाठी

३ अ. सृष्टीचे रक्षण करण्यासाठी : सत्ययुगात समुद्रमंथनाच्या वेळी समुद्रातून हलाहल विष बाहेर आले. तेव्हा या विषाच्या कुप्रभावामुळे सृष्टीचा नाश होऊ शकला असता. तेव्हा शिवाने ‘नीलकंठ’ अवतार धारण करून ते हलाहल विष गिळून सृष्टीचे रक्षण केले.
३ आ. सृष्टीचे पालन-पोषण करण्यासाठी : श्रीविष्णूने जीवनरसाचे आपमय, म्हणजे रसमय रूप धारण करून तो समस्त वनस्पतीरूपी सृष्टीत सामावून गेला. पशु, पक्षी आणि मानव जेव्हा सात्त्विक वनस्पती ग्रहण करतात, तेव्हा त्यांतील विष्णुमय जीवनरसामुळे त्यांना दैवी शक्ती मिळून त्यांचे जीवनकार्य चालू रहाते. हा श्रीविष्णूचा ‘जीवनरसमय’ अवतार आहे.
४. दैवी कार्य करणे
सूर्यदेव आणि सूर्यपत्नी संध्या यांच्यापासून अश्विनीकुमारांची निर्मिती झाली. त्यांनी सूर्यदेव आणि देवगुरु बृहस्पती, तसेच धन्वंतरिदेव यांच्याकडून ज्ञानार्जन करून वैद्यकीय चिकित्सा अन् उपचार या शास्त्रांचे ज्ञान घेऊन ते देवतांचे वैद्य बनले. त्यानंतर त्यांच्या ज्ञानाचा लाभ सृष्टीतील इतरांना होण्यासाठी त्यांनी आयुर्वेद, तसेच दैवी वैद्यकीय चिकित्सा आणि उपचार यांच्याविषयीचे ज्ञान च्यवन ऋषि, सुशेन ऋषि, सुश्रुत ऋषि इत्यादींना दिले. अशाप्रकारे सूर्य आणि संध्या यांच्यापासून निर्माण झालेल्या अश्विनीकुमारांनी विश्वकल्याणासाठी कार्य केले.
५. अवतारांच्या संदर्भातील कार्ये करण्यासाठी
५ अ. नवीन अवतार घेऊन अन्य अवताराला साहाय्य करणे : काही वेळा एखाद्या अवताराला साहाय्य करण्यासाठी दुसरी देवता अवतार धारण करते, उदा. हनुमानाच्या रूपात शिवाने ११ वा रुद्रावतार धारण करून श्रीरामाला साहाय्य केले. त्याचप्रमाणे शेषनागाने त्रेतायुगात लक्ष्मणाचा अवतार धारण करून प्रभु श्रीरामाला साहाय्य केले होते, तसेच शेषनागाने द्वापरयुगात बलरामाचा अवतार धारण करून भगवान श्रीकृष्णाला साहाय्य केले होते.
६. देवतांच्या संदर्भातील कार्ये
६ अ. देवतांना साहाय्य करण्यासाठी : देवतांना त्रास देणार्या तारकासुराचा नाश करण्यासाठी शिवापासून ‘कार्तिकेय’ या नवीन देवाची निर्मिती झाली. त्याने तारकासुराशी युद्ध करून देवतांना विजयी बनवले आणि देवतांना साहाय्य केले. त्यामुळे स्वर्गलोकावर पुन्हा देवतांचे अधिपत्य स्थापित झाले. त्याचप्रमाणे देवीच्या कालीरूपापासून श्यामवर्णी, म्हणजे काळी कांती असलेल्या कौशिकी देवीने अवतार घेऊन शुंभ आणि निशुंभ या दैत्यांचा नाश करून देवतांना साहाय्य केले होते.
६ आ. देवतांच्या बळात वृद्धी करण्यासाठी : देवतांच्या बळात वृद्धी करण्यासाठी समुद्रमंथनाच्या वेळी श्रीविष्णूने ‘धन्वंतरि’ अवतार धारण करून समुद्रातून अमृताचा कुंभ बाहेर काढला. त्यानंतर श्रीविष्णूने ‘मोहिनी’ अवतार धारण करून हे अमृत अत्यंत कुशलतेने दानवांपासून प्राप्त करून ते देवतांना दिले.
६ इ. देवतांचे रक्षण करण्यासाठी अवतार धारण करणे : द्वापरयुगात श्री गणेशाने ‘श्री गजानन’ अवतार धारण करून सिंदुरासुराचा नाश केला होता. त्यामुळे देवता, ऋषीमुनी आणि मानव यांचे सिंदुरासुरापासून रक्षण झाले.
६ ई. देवतांना शक्तीचा पुरवठा करण्यासाठी : श्रीविष्णूने परशुरामरूपी सहावा अवतार धारण करून पृथ्वीवरील भक्तांचे रक्षण करण्यासाठी संपूर्ण पृथ्वीची २१ वेळा प्रदक्षिणा करून कार्तवीर्य सहस्रार्जुनासारख्या उन्मत्त क्षत्रियांचा वध केला. त्यानंतर या अवताराची भेट जेव्हा मिथिलेत सीतेच्या स्वयंवरात प्रभु श्रीरामाशी झाली, तेव्हा परशुरामाने प्रभु श्रीरामाला श्रीविष्णूचे शारंग धनुष्य देऊन स्वत:चे दिव्य तेज प्रभु श्रीरामामध्ये संक्रमित करून त्याला असुरांशी लढण्यासाठी दैवी शक्ती पुरवली.
७. असुरांच्या नाशाच्या संदर्भातील कार्ये
७ अ. देवतांनी असुरांना दिलेल्या वरदानाची मर्यादा राखून त्यांचा नाश करण्यासाठी भगवंताने नवीन अवतार धारण करणे : ब्रह्मदेवाने हिरण्यकश्यपूला दिलेल्या वरदानाची मर्यादा राखून त्या असुराचा नाश करण्यासाठी श्रीविष्णूने उग्र नृसिंहाचा अवतार धारण केला होता.
७ आ. असुरांचे बळ क्षीण करण्यासाठी : जेव्हा रावण शिवाचे आत्मलिंग घेऊन कैलासावरून श्रीलंकेकडे जाऊ लागला, तेव्हा त्याचा मार्ग अवरुद्ध करण्यासाठी श्री गणेशाने गुराख्याचे रूप धारण केले आणि त्याच्याकडून शिवलिंग प्राप्त करून ते गोकर्ण महाबळेश्वर या ठिकाणी भूमीवर स्थापन केले. अशाप्रकारे शिवाचे आत्मलिंग लंकेपर्यंत न पोचल्यामुळे असुरांचे बळ क्षीण झाले.
८. भक्तांच्या संदर्भातील कार्ये
८ अ. स्वतःच्या आचरणातून भक्तांसमोर धर्माचरणाचा आदर्श प्रस्थापित करणे : श्रीविष्णूने त्याचा सातवा अवतार प्रभु श्रीरामाच्या रूपात घेऊन ‘आदर्श पुत्र, आदर्श शिष्य, आदर्श बंधू, आदर्श मित्र, आदर्श पती, आदर्श पिता, आदर्श राजा, इतकेच काय, तर आदर्श शत्रू’ यांची उदाहरणे स्वत:च्या आचरणातून जगापुढे प्रस्थापित केली.
८ आ. अहंकाराचा नाश करण्यासाठी : शिवाच्या तिसर्या नेत्रातून उत्पन्न झालेल्या कालभैरवाने अहंकाराने भरलेल्या ब्रह्मदेवाचे पाचवे शिर कापले आणि त्याचा अहंकार नष्ट केला, तसेच जेव्हा सूर्यदेवाचा अहंकार वाढला होता, तेव्हा शिवाने त्रिशूळाचा प्रहार करून सूर्यदेवाचा शिरच्छेद केला आणि त्यानंतर पुन्हा त्याच्या धडाला ते शिर जोडले.
८ इ. भक्त आणि पृथ्वी यांचे दुःख हरण करणे : श्रीविष्णूने भक्त आणि पृथ्वी यांचे दुःख दूर करण्यासाठी सत्ययुग, त्रेतायुग, द्वापरयुग अन् कलियुग यांत दहा अवतार घेऊन कार्य करणे, द्वापरयुगात द्यूतसभेत द्रौपदीचे वस्त्रहरण होत असतांना तिचे लज्जारक्षण करण्यासाठी भगवान श्रीकृष्णाने ‘वस्त्रावतार’ धारण करणे इत्यादी.
८ ई. ‘भक्तांना उच्चतम आध्यात्मिक अवस्था अनुभवण्यास मिळावी’, यासाठी भगवंताने अवतार धारण करणे : सत्ययुगात श्री गणेशाने देवमाता अदिती आणि कश्यप ऋषि यांच्या आश्रमात ‘महोत्कट’ अवतार धारण करून बालपणातील अनेक लीला करून त्यांच्या अनेक भक्तांना भावविभोर केले.
८ उ. भक्तांचे कौतुक करणे आणि त्यांचे कौतुक ऐकणे : श्रीविष्णूने ‘श्री जगन्नाथा’चा अवतार धारण करून अनेक भक्तांचे गुणगान केले, त्यांना अनेक प्रकारच्या अनुभूती देऊन त्यांचे कौतुक केले.
९. मनुष्याच्या संदर्भातील कार्ये
९ अ. मनुष्यातील पशुत्व नष्ट करून त्याच्यातील देवत्व जागृत करणे : ‘भैरव’ नावाच्या अघोरी तांत्रिकामुळे पृथ्वीवरील देवीचे भक्त भयग्रस्त होते आणि त्याच्या भयापोटी पशूवत वागत होते. त्यांचा उद्धार करण्यासाठी आदिशक्तीने ‘वैष्णोदेवी’चा अवतार धारण करून ‘भैरव’ नावाच्या अघोरी तांत्रिकाचा नाश केला, तसेच तिने तिचा परम भक्त श्रीधर याच्या माध्यमातून मार्गदर्शन करून तिच्या भक्तांच्या मनातील पशूवत भावना नष्ट केल्या आणि त्यांना भक्तीचा मार्ग दाखवून त्यांच्यातील देवत्व जागृत केले.
९ आ. मनुष्याला ज्ञान देऊन त्याचा उद्धार करणे : द्वापरयुगात श्री गणेशाने ‘श्री गजानन’ हा अवतार धारण केला. या अवतारात त्याने त्याचा परम भक्त ‘वरेण्य’ नावाच्या राजाला मनुष्यजन्माचे सार्थक करणारे आत्मज्ञान आणि ब्रह्मज्ञान देणारी ‘गणेशगीता’ सांगून त्याचा उद्धार केला.
१०. अन्य अवतारी कार्ये
१० अ. ठिकठिकाणी भावी कार्यासाठी शक्ती साठवून ठेवणे : श्री परशुरामाने भारताच्या पश्चिम बाजूला असलेल्या अरबी समुद्राला मागे हटवून एक मोठी किनारपट्टी निर्माण करून तेथे अनेक देवतांची स्थापना केली. ही देवतांची स्थाने आता क्षेत्रपाल देवता म्हणून कार्यरत आहेत. अशाप्रकारे भारतात द्वापर आणि कलि या युगांमध्ये होणार्या दैवी कार्यासाठी शक्ती पुरवण्यासाठी परशुराम अवताराने आधीच परशुरामभूमीत विविध देवतांची स्थापना करून दैवी शक्ती साठवून ठेवली.
१०. आ. तीर्थस्थानांतील शक्ती वाढवणे : सत्ययुगाच्या आरंभी श्रीविष्णूने १० सहस्र वर्षे शिवाची उपासना केली. त्यामुळे हिमालयातील समस्त तीर्थक्षेत्रांमधील दैवी ऊर्जा वाढली. श्रीविष्णूने केलेल्या या तपश्चर्येमुळे त्याला शिवाकडून सुदर्शनचक्र प्राप्त झाले.’
– सुश्री मधुरा भोसले (सूक्ष्मातील ज्ञानप्राप्तकर्ती साधिका, आध्यात्मिक पातळी ६५ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (ज्ञान मिळण्याचा दिनांक : २.५.२०२६, वेळ : दुपारी २.३० ते ३.१५ आणि कालावधी : ४५ मिनिटे)
संस्कृत भाषेचे अनन्यसाधारण महत्त्व !
साधकांवर प्रीती करून त्यांना आधार देणारे आणि श्रीरामाप्रती उत्कट भाव असलेले भारताचार्य पू. प्रा. सु.ग. शेवडे (वय ९१ वर्षे) !
गुरुस्मरणाचा अद्भुत आनंद देणारा श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांचा चैतन्यमय सत्संग !
म्हातारपणातील कंटाळ्यावर एकमेव उपाय म्हणजे, नामजप करणे !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ‘विज्ञानामुळे मानवजात नष्टप्राय होण्याची स्थिती निर्माण होणे’ या विषयीच्या लिखाणाचे अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण !