गुरुस्मरणाचा अद्भुत आनंद देणारा श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांचा चैतन्यमय सत्संग !

‘श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी मंगळुरू (कर्नाटक) येथील सेवाकेंद्रात यावे’, अशी सेवाकेंद्रातील सर्व साधकांची बर्‍याच वर्षांपासूनची इच्छा होती; पण वेळ जुळून येत नव्हती. १.४.२०२६ या दिवशी गुरुदेवांच्या कृपेने त्यांचे मंगळुरू सेवाकेंद्रात आगमन झाले. तेव्हा आम्हाला त्यांचे दर्शन झाले. १ ते ४.४.२०२६ या कालावधीत त्यांचे मंगळुरू सेवाकेंद्रात वास्तव्य होते.

मंगळुरू सेवाकेंद्रातील सर्व साधकांना श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचे दिव्य सान्निध्य लाभले. त्यांचा चैतन्यमय सहवास, साधी, सुंदर, मधुर वाणी, सहजता आणि प्रेमभाव, या सर्वांचा आम्हाला २ – ३ दिवसांत भरभरून अनुभूती घेता आली. ही अनुभूती देणार्‍या गुरुदेवांच्या चरणी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अल्पच आहे. गुरुदेवांनी अनुभवण्यासाठी दिलेले हे चैतन्यामृत मी त्यांच्याच चरणी अर्पण करत आहे.

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ

१. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या रूपात सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना अनुभवता येणे

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांची प्रत्येक कृती, बोलणे, वागणे आणि प्रेमभाव इत्यादी सर्वकाही गुरुदेवांप्रमाणेच (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रमाणेच) आहे. ‘त्या गुरुदेवांच्या तत्त्वरूपाशी पूर्णपणे एकरूप झाल्या आहेत आणि सर्वांना त्यांच्यामध्ये गुरुदेवांचेच दर्शन झाले’, असे म्हणणे अतिशयोक्ती ठरणार नाही. त्यांचे वर्णन करायला शब्दही अपुरे आहेत. त्यांच्या दर्शनाने आणि त्यांच्या सान्निध्यात प्रत्येक क्षणी मला ‘सतगुरु मिले मोरे सारे दुख बिसरे, अंतर के पट खुल गयो रे ।’ (म्हणजे ‘सद्गुरूंची प्राप्ती झाल्यावर मला माझ्या सर्व दुःखांचा विसर पडला आणि माझ्या अंतर्मनाचे द्वार उघडले.’), या भजनातील प्रत्येक शब्दाचा स्थूल आणि सूक्ष्म स्तरावर अनुभव घेता आला.

२. श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ यांच्या समवेत मंदिरांत गेल्यावर जाणवलेली सूत्रे

आम्ही श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ यांच्यासह काही मंदिरांत गेलो होतो. तेव्हा समाजातील लोकही त्यांच्याकडे आकर्षित होत होते.

अ. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ एका मंदिरात गेल्या असता त्या मंदिराच्या विश्वस्तांनी त्यांना प्रसाद दिला, तर दुसर्‍या मंदिरात गेल्यावर देवीच्या समोर त्यांची ओटी भरण्यात आली. त्यानंतर श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ यांच्या हस्ते ‘ललिता सहस्रनामा’चा प्रारंभ करण्यात आला. त्या वेळी देवीला वाहिलेले फूल खाली पडले. तेव्हा ‘त्या माध्यमातून देवीने प्रसन्न होऊन श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ यांना आशीर्वाद दिला’, असे मला जाणवले.

आ. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ श्री दुर्गा परमेश्वरीदेवीच्या समोरील ओट्यावर जाऊन बसल्या. त्या वेळी तेथे असलेल्या भजनी मंडळाने ‘जगज्जननी जगदंबा…’, हे भजन गायले. ते भजन ऐकून सर्वांची भावजागृती झाली.

३. अनुभूती

३ अ. ‘श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ चालतांना भूमीला स्पर्श न करता हवेतून येत आहेत’, असे वाटणे : श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ सेवाकेंद्रात चालतांना ‘त्यांचे पाय भूमीला स्पर्श करत नाहीत कि काय ?’, असे मला वाटायचे. श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ चालत असतांना ‘त्या कोणताही आवाज न करता हवेतून येत आहेत’, असे मला जाणवायचे.

३ आ. ‘श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ यांच्या सहवासातील अवर्णनीय आनंदावस्थेतून बाहेर पडू नये’, असे वाटणे : श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ यांच्या ‘मला प्रेमाने जवळ बसवून घेणे, पाठीवरून हात फिरवणे, प्रोत्साहन देणे’, या कृतींमुळे मला स्वर्गही ठेंगणा वाटत होता. ‘या अवर्णनीय आनंदाच्या स्थितीतून बाहेरच पडू नये’, असे मला सतत वाटत होते.

३ इ. ‘त्यांचे हावभाव, वर्तन आणि बोलणे’, हे सर्वकाही सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या स्मृती वारंवार जागृत करत होते.

३ ई. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या सहवासात माझे सर्व दुःख, निराशा आणि हताशपणा दूर होऊन मी मन अन् बुद्धी यांनी त्यांच्याशी एकरूप झाले होते.

३ उ. श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ यांच्या स्पर्शाने त्यांची पिशवीही चैतन्यमय झाल्याचे जाणवणे अन् ती हातात धरल्यावर आनंद होणे : ‘श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ यांच्या स्पर्शाने त्यांची पिशवीही अत्यंत साित्त्वक आणि चैतन्यमय झाली आहे’, असे मला जाणवत होते. पिशवी हातात धरल्यावर तिच्या केवळ स्पर्शानेच माझे मन आनंदी होत असे आणि ‘ती तशीच धरून ठेवावी’, असे मला वाटायचे. ती गुलाबी पिशवी आपल्यातील चैतन्य प्रेमाने उधळत होती आणि जणू सांगत होती, ‘तुम्हाला हवे तितके चैतन्य मुक्तपणे घ्या.’

३ ऊ. पू. भार्गवराम प्रभु यांच्या उपनयनाच्या वेळी गुरुदेवांनी भेट म्हणून दिलेली साडी श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ यांना नेसून दाखवल्यावर अनुभवलेली भावस्थिती ! : पू. भार्गवराम प्रभु (नातू, सनातनचे पहिले बालसंत, वय ९ वर्षे) यांच्या उपनयनाच्या वेळी गुरुदेवांनी आम्हा सर्वांना वस्त्रे (आशीर्वाद स्वरूपात) भेट दिली होती. ‘गोव्याला गेल्यावर ती परिधान करावीत’, असा माझा विचार होता; पण ‘गुरुदेवच श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ यांच्या रूपात आले आहेत. त्यामुळे त्यांच्या उपस्थितीतच ते वस्त्र परिधान करावे’, असे मला वाटले. त्याप्रमाणे मी ती साडी नेसले आणि त्याविषयी श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ यांना सांगितले. तेव्हा त्या म्हणाल्या, ‘‘गुरु आताही तुम्हाला बघत आहेत. त्यांनी तुम्हाला चांगली दिसणारीच साडी दिली आहे आणि ती तुम्हाला पुष्कळ शोभते.’’ हे ऐकल्यावर त्या साडीच्या माध्यमातून ‘श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ यांनी मला गुरुदेवांचेच चैतन्य मिळवून दिले’, असे वाटून माझी भावजागृती झाली.

‘या कालावधीत लाभलेले गुरूंचे सान्निध्य, गुरुस्मृती आणि गुरुकृपा’, यांबद्दल मी गुरुचरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’

– श्रीमती अश्विनी प्रभु (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के, वय ६० वर्षे), मंगळुरू, कर्नाटक. (१९.४.२०२६)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या काही वेळा अनिष्ट शक्तींमुळे किंवा ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांना / संतांना / धर्मप्रेमींना आलेल्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सर्वांनाच येतील, असे नाही. - संपादक