उद्या १९.७.२०२६ या दिवशी भारताचार्य पू. प्रा. सु.ग. शेवडे यांचा दिनांकानुसार ९१ वा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने....
‘भारताचार्य पू. प्रा. सु.ग. शेवडे (पू. शेवडेआबा) मे २०२४ पासून रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात वास्तव्याला आहेत. त्यांची सेवा करत असतांना श्री. दीप पाटणे आणि श्री. शिवप्रसाद कब्बुरे यांच्या लक्षात आलेली त्यांची वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे येथे दिली आहेत.

भारताचार्य पू. प्रा. सु.ग. शेवडे यांच्या ९१ व्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या चरणी सनातन परिवाराचा भावपूर्ण नमस्कार !
१. इतरांना प्राधान्य देणे
‘पू. शेवडेआबा झोपले असतांना त्यांना भ्रमणभाष आला किंवा त्यांना कोणी उठवले, तरीही ते नेहमी प्रेमाने प्रतिसाद देतात. पू. आबांची झोपमोड झाली, तरीही त्यांना काहीच वाटत नाही.
२. प्रीतीमुळे रुग्णाईत साधकाला भेटायला त्याच्या खोलीत जाणे

एकदा मला ताप आला होता. तेव्हा माझ्यामुळे पू. आबांना त्रास होऊ नये; म्हणून मी त्यांना भेटणे टाळत होतो. पू. आबांमधील प्रीतीमुळे ते स्वतःच मी रहात असलेल्या खोलीत मला भेटण्यासाठी आले. त्यांनी माझी अत्यंत प्रेमाने विचारपूस केली. पू. आबांची भेट झाल्यावर मला आधार वाटला आणि त्यांच्याप्रती पुष्कळ कृतज्ञताही वाटली.
३. जीवनातील वाईट प्रसंगांकडे सकारात्मक दृष्टीने पहाणारे पू. आबा !
पू. आबा हे ज्ञानयोगी संत आहेत. जीवनात घडणार्या प्रत्येक प्रसंगाकडे पहाण्याचा त्यांचा दृष्टीकोन निराळा आहे. एकदा मी त्यांना विचारले, ‘‘जीवनातील वाईट प्रसंगांकडे तुम्ही कसे पहाता ?’’ तेव्हा ते म्हणाले, ‘‘जेव्हा काही वाईट घडते, तेव्हा ‘आपली वाईट कर्मे संपत आहेत’, असा सकारात्मक विचार करावा, म्हणजे मनाला दुःख न होता आनंद होईल.’’
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आणि संत यांच्याप्रती भाव असलेले भारताचार्य पू. प्रा.सु.ग. शेवडे !
१. आनंदी
‘पू. शेवडेआबा नेहमी आनंदी असतात. मी त्यांच्या खोलीत गेल्यावर त्यांना पाहून मला आनंद होतो. माझ्या वैयक्तिक जीवनात काही प्रसंग घडल्यावर माझे मन निराश होते. तेव्हा मी त्यांच्याकडे गेल्यावर त्या प्रसंगाविषयी विसरून जातो. त्यामुळे त्यांच्याकडे जाण्यासाठी माझे मन नेहमी उत्साही असते.
२. इतरांचा विचार करणे

अ. मी पू. आबांच्या खोलीतील केर काढत असतांना माझ्याकडून जर पंखा चालू राहिला असेल, तर ते तत्परतेने उठून पंखा बंद करतात.
आ. कधी कधी रात्री मला त्यांच्याकडे झोपायला जाण्यासाठी उशीर होतो. त्या वेळी ते जागे असल्यास अत्यंत काळजीने मला विचारतात, ‘‘का उशीर झाला ? काही अडचण आली नाही ना ? मला काळजी वाटते.’’ मला झोपायला जायला उशीर झाल्यास ते मला कधीही रागावत नाहीत. त्यांना माझ्याविषयी असलेल्या काळजीमुळे ते माझी विचारपूस करतात.
इ. पू. आबा रात्री उठतात. तेव्हा ते कधीही माझ्याकडे साहाय्य मागत नाहीत. त्यांना सांगितले, तर ते म्हणतात ‘‘मी अजून करू शकतो. मला साहाय्य लागले, तर मी तुला सांगीन. तुला कशाला त्रास द्यायचा ?’’ ‘ते इतरांचा किती विचार करतात’, असे मला वाटते. पू. आबा नेहमी त्यांच्या सेवेत असलेल्या साधकांची काळजी घेतात.
३. साधकांना आश्वस्त करणे
ते साधकांना ‘तुम्ही धर्माने वागा. देव तुमची नक्की काळजी घेईल. काही न्यून पडू देणार नाही’, असा आशीर्वाद देतात. त्यांचे बोलणे ऐकून मला पुष्कळ कृतज्ञता वाटते.
४. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव
एकदा पू. आबा बाहेरगावी गेले होते. तेथून ते रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात आले. त्या वेळी त्यांनी चारचाकी गाडीतून उतरल्यावर त्वरित मला गुरुदेवांविषयी (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याविषयी) विचारले, ‘‘परम पूज्य कसे आहेत ? त्यांची प्रकृती कशी आहे ?’’ ते प्रतिदिन सकाळी उठल्यावर सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना भावपूर्ण नमस्कार करतात.
५. संत आणि गुरु यांच्याप्रती भाव
पू. आबांची गुरुदेवांवर अपार श्रद्धा आहे. ते प्रतिदिन सकाळी उठल्यावर सर्वप्रथम श्री गजानन महाराज, त्यांचे गुरु पू. नाना महाराज तराणेकर यांना भावपूर्ण नमस्कार करतात.
‘प.पू. गुरुदेवांच्या (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या) अपार कृपेमुळे मला पू. शेवडेआबांची सेवा करण्याची संधी मिळत आहे. मला संतांचे प्रेम अनुभवायला मिळते. हे खरंच माझे परमभाग्य आहे’, त्याबद्दल मी गुरुदेव, श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ, श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ आणि पू. शेवडेआबा यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो.’
– श्री. शिवप्रसाद कब्बुरे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (९.७.२०२६)
४. श्रीरामाप्रती असलेल्या उत्कट भावामुळे श्रीरामरक्षा म्हणत असतांना श्रीरामाचे रूप डोळ्यांसमोर दिसणे आणि कंठ दाटून येणे
गुरुदेवांची (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची) ‘हिंदूंनो, काळानुसार साधना म्हणून ‘श्रीरामरक्षा आणि मारुतिस्तोत्र’ यांचे प्रतिदिन पठण करा ! अशी चौकट दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये प्रसिद्ध झाली होती. तेव्हा मी पू. आबांना विचारले, ‘‘आपणही ‘श्रीरामरक्षा आणि मारुतिस्तोत्र’ या स्तोत्रांचे पठण करूया का ?’’ तेव्हा त्यांनी मला आनंदाने होकार दिला. श्रीरामरक्षा म्हणत असतांना पू. आबांचे डोळे मिटलेले असतात.
त्याविषयी मी पू. आबांना विचारल्यावर ते म्हणाले, ‘‘मला श्रीरामाचे रूप डोळ्यांसमोर दिसते. मी गहिवरून जातो. माझा कंठ दाटून येतो आणि ‘माझ्या डोळ्यांतून भावाश्रू येतील’, असे मला वाटते.’’ यातून मला ‘भगवंताप्रती उत्कट भाव कसा असावा ?’, हे शिकायला मिळाले.
५. साधकाला ‘सकारात्मक विचार करशील, काळजी करू नकोस’, असे सांगून आश्वस्त करणे
एकदा मी त्यांना म्हणालो, ‘‘माझ्या मनात अधूनमधून पुष्कळ नकारात्मक विचार येतात. मला तुमच्यासारखे पूर्ण सकारात्मक व्हायचे आहे.’’ तेव्हा ते मला म्हणाले, ‘‘तू सकारात्मक होशील. काळजी करू नकोस. माझा तुला आशीर्वाद आहे.’’ त्या दिवसापासून आजपर्यंत मला ‘माझ्यातील नकारात्मकता न्यून होत आहे आणि सकारात्मकतेत वाढ होत आहे’, असे अनुभवता येते.’
– श्री. दीप संतोष पाटणे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
(१४.७.२०२६)
संस्कृत भाषेचे अनन्यसाधारण महत्त्व !
‘देवांना सर्व कार्य सूक्ष्मातून करता येते, तरीही ते अवतार का घेतात ?’, या सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी विचारलेल्या प्रश्नाचे ज्ञानमय उत्तर !
गुरुस्मरणाचा अद्भुत आनंद देणारा श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांचा चैतन्यमय सत्संग !
म्हातारपणातील कंटाळ्यावर एकमेव उपाय म्हणजे, नामजप करणे !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ‘विज्ञानामुळे मानवजात नष्टप्राय होण्याची स्थिती निर्माण होणे’ या विषयीच्या लिखाणाचे अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण !