Manchar Pune Land Jihad : मंचर (जिल्हा पुणे) येथील पांडवकालीन बारव परिसरात धर्मांधांचे अतिक्रमण

  • अनधिकृत दर्गा बांधून ती जागा ‘वक्फ’ म्हणून घोषित

  • खासदार प्रा. डॉ. (सौ.) मेधा कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन

(‘बारव’ म्हणजे पायर्‍यांची विहीर. ती बर्‍याचदा चौकोनी किंवा अष्टकोनी आकाराची असते.)

मंचर, पुणे येथील पांडवकालीन बारव (चित्रावर क्लिक करा)

मंचर (जिल्हा पुणे) – येथे ऐतिहासिक पांडवकालीन बारव आहे. या जागेवर प्रत्यक्ष शिलालेख, गोमुख आणि दगडी कोरीव काम असून ही वास्तू हिंदु पद्धतीची असल्याचे स्पष्ट पुरावे आहेत. तरीही या जागेवर अनधिकृत दर्गा बांधून ती जागा ‘वक्फ’ म्हणून घोषित करण्यात आली आहे. याची तक्रार पुणे जिल्हाधिकारी, तसेच पुणे ग्रामीण पोलीस यांच्याकडे वारंवार करूनही कोणतीही कारवाई झाली नाही. उलट या बांधकामामध्ये वाढ झाली असून गेल्या ६ महिन्यांपूर्वी जी जागा पहाणीमध्ये प्रांत अधिकार्‍यांना मोकळी आढळली, त्या ठिकाणी आता स्मशानभूमी सदृश परिसराचे बांधकाम करण्यात आले आहे. एवढेच नाही, तर वर्ष २०२१ मध्ये दिवंगत असलेल्या व्यक्तीचे थडगे दाखवण्यात आले आहे. ६ महिन्यांपूर्वी अस्तित्वात नसलेल्या स्मशानभूमीत वर्ष २०२१ चे थडगे कसे असू शकते ?

या गंभीर प्रकाराकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याच्या निषेधार्थ भाजपच्या खासदार प्रा. डॉ. (सौ.) मेधा कुलकर्णी यांनी स्थानिक हिंदुत्वनिष्ठ संघटनांसह घटनास्थळी धाव घेऊन आंदोलन केले. या आंदोलनात सर्वश्री प्रमोद बाणखेले, संदीप बाणखेले, गणेश बाणखेले, अक्षय चिखले, महेश पिंगळे, चैतन्य महाजन यांच्यासह राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांचे अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दर्ग्याच्या ठिकाणी पहाणी करतांना प्रा. डॉ. (सौ.) मेधा कुलकर्णी

उपविभागीय पोलीस अधिकार्‍यांनी या प्रकरणी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक आणि प्रांताधिकारी यांच्याशी चर्चा करून ८ दिवसांत कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. ही कारवाई न झाल्यास अधिक प्रखर आंदोलन करण्याची चेतावणी या वेळी देण्यात आली आहे.

थडग्याच्या ठिकाणी पहाणी करतांना प्रा. डॉ. (सौ.) मेधा कुलकर्णी
जागेच्या कागदपत्रांची पडताळणी करतांना प्रा. डॉ. (सौ.) मेधा कुलकर्णी

पोलिसांची दडपशाही, हिंदूंच्या श्रद्धेचा अवमान !

आंदोलनाच्या वेळी एक संतापजनक प्रकार घडला. जेव्हा खासदार सौ. कुलकर्णी यांनी तिथे हिंदूंच्या देवतेचे चित्र लावण्याचा प्रयत्न केला, तेव्हा पोलिसांनी त्यांच्या हातातील चित्र हिसकावून घेतले. ‘त्यांना (मुसलमानांना) येथे दर्गा बांधायला आणि हिरवा रंग लावायला कुणीही अडवत नाही, मग मला ‘ॐ’ लिहिण्यापासून आणि देवाचे चित्र लावण्यापासून का रोखले जात आहे ?’ असा प्रश्न खासदार सौ. कुलकर्णी यांनी उपस्थित केला आहे.

हिंदू सहिष्णु आहेत; म्हणून अंत पाहू नका !

खासदार सौ. कुलकर्णी यांनी या वेळी प्रशासनाला सांगितले की, हिंदू कधीही कायदा-सुव्यवस्था बिघडवत नाहीत किंवा कुणाच्या जागा बळकावत नाहीत; परंतु धर्मांधांकडून गणपति विसर्जन मिरवणुकीवर होणारी दगडफेक आणि हिंदूंच्या वारसास्थळांवर होणारी अतिक्रमणे आता सहन केली जाणार नाहीत. हिंदू हा आक्रमक नाही; पण त्याचा अंत पाहू नका.

संपादकीय भूमिका

  • हा ‘लँड जिहाद’चा प्रकार आहे. मंचर येथील पांडवकालीन बारव येथील लँड जिहादच्या षड्यंत्राविरुद्ध खासदार सौ. कुलकर्णी यांनी घेतलेली आक्रमक भूमिका अत्यंत कौतुकास्पद आणि अभिनंदनीय आहे !
  • हा अनधिकृत दर्गा उभा राहीपर्यंत प्रशासन झोपले होते का ? हिंदूंनी आतातरी जागरूक आणि संघटित होऊन धर्मांधांचे हे ‘लँड जिहाद’चे षड्यंत्र मोडून काढावे !