पनवेल येथील ७ गायींच्या मृत्यू प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करणार ! –  उदय सामंत, उद्योगमंत्री

दोषींवर कठोर करण्याचे आश्वासन

मुंबई, २५ जून (वार्ता.) – रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यात असणार्‍या घोट गावामध्ये ‘सिडको डंपिंग ग्राउंड’च्या दायित्वशून्य कारभारामुळे निष्पाप ७ गायींचा विषबाधेने मृत्यू झाल्याच्या प्रकरणी विधान परिषदेत चर्चा झाली. भाजपचे आमदार श्री. विक्रांत पाटील यांनी २५ जून या दिवशी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देतांना उद्योगमंत्री श्री. उदय सामंत यांनी या प्रकरणाची विभागीय अध्यक्ष समिती नेमून उच्चस्तरीय चौकशी करण्याची घोषणा केली. ‘या प्रकरणात जे जे दोषी आढळतील, त्या सर्वांवर अत्यंत कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल’, अशी ग्वाही त्यांनी या वेळी दिली.

आमदार श्री. विक्रांत पाटील म्हणाले की, मृत जनावरांमध्ये गर्भवती गायींचाही समावेश असल्याने गोभक्तांमध्ये संताप आहे. परिसरातील पाण्याच्या नमुन्यांमध्ये ‘टी.डी.एस्.’ (पाण्यात विरघळणारे कॅल्शियम, मॅग्नेशियम इत्यादी रासायनिक पदार्थ), ‘सीओडी’ (पाण्यातील प्रदूषण रासायनिक प्रक्रियेद्वारे विघटित करण्यासाठी आवश्यक असणार्‍या प्राणवायूचे प्रमाण), ‘बीओडी’ (सेंद्रीय घटकांमुळे होणारे पाण्यातील प्रदूषण, ज्यामुळे पाण्यातील प्राणवायू संपतो) आणि ‘ई-कोली’ (मैला, कचरा यांमुळे दूषित झालेले पाणी, यात जिवाणू वाढून जीवघेणे आजार होतात) यांसारखे घातक जिवाणू मर्यादेपेक्षा अधिक आढळल्याने जलस्रोत विषारी झाल्याचे उघड झाले आहे. एवढी मोठी घटना घडूनही जनावरांचे शवविच्छेदन न करताच हे गंभीर प्रकरण दाबून टाकण्याचा प्रयत्न झाला असून ‘प्रदूषण नियंत्रण मंडळा’ने याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करावी, घटना दडपणार्‍या मुख्य सूत्रधारांविरुद्ध गुन्हे नोंदवावेत आणि पीडित पशूपालकांना तात्काळ आर्थिक हानीभरपाई द्यावी.

यावर मंत्री श्री. उदय सामंत म्हणाले, ‘‘महाराष्ट्र हे देशातील पहिले असे राज्य आहे, ज्याने गोमातेला ‘राज्यमाते’चा पवित्र दर्जा दिला आहे. आमच्या सर्वांच्याच मनात गोमातेविषयी अत्यंत आदर आणि श्रद्धेची भावना आहे. त्यामुळे गोवंशाची अशी हानी कदापि सहन केली जाणार नाही. गायींचा मृत्यू नेमका कोणत्या कारणामुळे झाला ?, याची पाळेमुळे शोधण्यासाठी विभागीय आयुक्त आणि परिवहन अधिकारी यांच्याद्वारे संयुक्त चौकशी केली जाईल. ‘सिडको डंपिंग ग्राउंड’मुळे परिसरातील जलस्रोत नेमके का आणि कसे दूषित झाले ?, याचे सत्य शोधण्यासाठी एक स्वतंत्र अहवाल सिद्ध करण्याचाही आदेश देण्यात आला आहे. एवढी मोठी घटना घडूनही मृत गायींचे शवविच्छेदन का करण्यात आले नाही ?, याविषयी पशूसंवर्धन अधिकार्‍यांशी तातडीने चर्चा करून निष्काळजीपणा करणार्‍यांचा आणि घटना दाबण्याचा प्रयत्न करणार्‍यांचा शोध घेतला जाईल.’’