तिसर्‍या महायुद्धाविषयी सूक्ष्म ज्ञानप्राप्तकर्ते साधक श्री. निषाद देशमुख यांना सूक्ष्मातून प्राप्त झालेले ज्ञान !

‘या लेखमालिकेत आतापर्यंत आपण ‘तिसर्‍या महायुद्धाचे स्वरूप, स्तर, कालावधी आणि महायुद्धाच्या टप्प्यांनुसार त्याची लक्षणे, तिसर्‍या महायुद्धाच्या कालावधीत संभाव्य पालट होण्यामागील कारणे, महायुद्धाच्या संदर्भातील मोठ्या वाईट शक्तींचे नियोजन’, ही सूत्रे समजून घेतली. आजच्या लेखात आपण ‘ प्रत्यक्ष युद्धकाळात संत कसे युद्ध लढणार आहेत’, तिसर्‍या महायुद्धाचा परिणाम कशावर अवलंबून आहे ?, ही सूत्रे जाणून घेणार आहोत.     

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

 (भाग ४ )

भाग ३ वाचण्यासाठी क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/1014923.html

तिसर्‍या महायुद्धाचे प्रतिकात्मक चित्र

६. प्रत्यक्ष युद्धकाळात संत सगुण-निर्गुण स्तरावरील युद्ध लढणार असणे आणि त्यामुळे मानसिक अन् बौद्धिक स्तरावरील हिंदु राष्ट्राची स्थापना होणार असणे

प्रत्यक्ष युद्धकाळ चालू झाल्यावर ईश्वराची लयशक्ती कार्यरत होईल. त्यामुळे आधीच दुर्बल असलेल्या मोठ्या वाईट शक्तींची शक्ती गतीने न्यून होईल. पृथ्वीवरील समष्टी संत आणि मोठ्या वाईट शक्ती यांच्यात सगुण-निर्गुण स्तरावरील युद्धाला आरंभ होईल.

श्री. निषाद देशमुख

वाईट शक्तींच्या आक्रमणामुळे विश्वाची सत्ता हातात असलेल्या प्रमुख नेत्यांवर त्रासदायक शक्तीचे आवरण आल्याने ते चुकीचे निर्णय घेऊन प्रत्यक्ष युद्धाच्या तीव्रतेत वाढ करतील, तर समष्टी संत करत असलेल्या आध्यात्मिक स्तरावरील उपायांमुळे युद्धाची तीव्रता न्यून होऊन शांतीचा मार्ग निघेल. अशा प्रकारची प्रक्रिया सतत चालू असल्याने विश्वात अस्थिरतेचे वातावरण निर्माण होऊन त्याचे परिणाम कोट्यवधी लोकांना भोगावे लागतील.

याच घडामोडींच्या काळात हिंदु समाजातील बहुसंख्य लोकांचे मन आणि बुद्धी यांवरील त्रासदायक शक्तीचे आवरण नष्ट झाल्याने ते भारताला ‘हिंदु राष्ट्र’ घोषित करण्याची मागणी करतील. त्या वेळी देवताही सत्तारूढ नेत्यांना बुद्धी देत असल्यामुळे प्रत्यक्ष युद्धकाळातच भारतात मानसिक आणि बौद्धिक स्तरांवरील हिंदु राष्ट्राची स्थापना होईल. त्यापुढील काही वर्षांत त्याचे आध्यात्मिक स्तरावरील हिंदु राष्ट्रात रूपांतर होईल.

७. युद्धसमाप्तीच्या काळात ‘पूर्वजांना गती देणे आणि वाईट शक्तींच्या त्रासापासून रक्षण करणे’, यांसाठी समष्टी संतांना समाजाकडून धर्माचरण करून घ्यावे लागणार असणे

प्रत्यक्ष युद्ध समाप्तीकडे जात असतांना युद्धकाळात मृत झालेले जीव हे पूर्वज आणि वाईट शक्ती झालेले असतील. या वाईट शक्तींच्या त्रासामुळे पूर्ण विश्वातील साधना न करणार्‍या लोकांच्या आध्यात्मिक त्रासात पुष्कळ वाढ झालेली असेल. अशा वेळी समष्टी संतांना या पूर्वज आणि वाईट शक्ती झालेल्या जिवांना गती देण्यासाठी अन् त्यांच्या त्रासापासून समष्टीचे रक्षण करण्यासाठी ‘यज्ञ, सामूहिक श्राद्धविधी, श्री दत्तात्रेयाचा सामूहिक नामजप’, असे विविध प्रयत्न समष्टीकडून करून घ्यावे लागतील. साधना न करणारे काही जीव हे मोठ्या वाईट शक्ती होऊन पूर्ण विश्वाला त्रास देण्याचा प्रयत्न करतील. त्यांच्याशी ‘परात्पर गुरु’ पातळीचे समष्टी संत, म्हणजे श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ या सूक्ष्मातून युद्ध करतील. या काळात वाढलेला आध्यात्मिक त्रास दूर करण्यासाठी संत करत असलेल्या प्रयत्नांमुळे समाजाला धर्माचरणाचे महत्त्व पटेल आणि तो अध्यात्म स्वीकारण्याच्या टप्प्यापर्यंत येईल. समाजाला अध्यात्मशास्त्र शिकवण्याचे कार्य ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय’ करील. त्यामुळे आध्यात्मिक हिंदु राष्ट्राच्या निर्मितीच्या प्रक्रियेला गती मिळेल.

८. तिसर्‍या महायुद्धाचा परिणाम हा योग्य क्रियमाणावर, म्हणजेच साधनेवर अवलंबून असणे

महायुद्धाचा काळ हा न्यायतत्त्वाशी निगडित असून त्याला न्यायाची देवता असलेल्या शनिदेवाचे अधिष्ठान असते. त्यामुळे या काळात केलेल्या कर्मांचा परिणाम त्वरित मिळून त्यातून अधोगती किंवा उन्नती होते. महाभारताचे युद्ध होतांना त्यात भीष्मासारखे ज्ञानी आणि तपस्वीही अधर्माच्या बाजूने असल्याने त्यांचा पराभव झाला. याउलट भिमाचा पुत्र घटोत्कच हा राक्षस असूनही तो धर्माच्या बाजूने लढल्याने त्याला सद्गती मिळाली. त्याचप्रमाणे तिसर्‍या महायुद्धाच्या आपत्काळात ‘जिवाची आध्यात्मिक पातळी किती आहे ?’, याला तुलनेत गौण महत्त्व असून ‘त्याचे क्रियमाण योग्य आहे कि अयोग्य ?’, यावर त्याला फळ मिळणार आहे. इथे योग्य क्रियमाण, म्हणजे समष्टी संतांच्या मार्गदर्शनानुसार आणि काळानुसार साधना करणे. तिसर्‍या महायुद्धाच्या आपत्काळात समाजातील काही व्यष्टी संत हेही चुकीच्या विचारसरणीनुसार वागल्याने त्यांची आध्यात्मिक पातळी न्यून होऊन त्यांना आपत्काळाची झळ सोसावी लागेल, तर समष्टी साधना करणारे काही भक्त निष्ठेने प्रयत्न करत असल्याने त्यांना भगवंताची कृपा मिळून त्यांचा उद्धार होईल.

९. महाभारताशी साम्य असलेल्या कृती कलियुगात स्थुलातून करण्याचा उल्लेख महर्षींनी नाडीपट्टीत करणे

अशा प्रकारे महाभारताशी साम्य असलेल्या कृती कलियुगात स्थुलातून करण्याचा उल्लेख महर्षींनी नाडीपट्टीत केला. या माध्यमातून समाजाला पुढील संकेत मिळत आहे, ‘ज्याप्रमाणे भगवान श्रीकृष्णाने महाभारत युद्धात प्रत्यक्षात युद्ध केले नाही; पण सूक्ष्मातून सर्व मोठ्या वाईट शक्तींना नष्ट केले आणि स्थुलातून अर्जुनाला मार्गदर्शन केले होते, त्याप्रमाणे आध्यात्मिक स्तरावरील युद्ध सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले अन् त्यांच्या आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ लढत असून त्याचे स्थुलातील पडसाद लवकर उमटून स्थुलातील युद्ध होईल. त्या युद्धात जे कुणी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांना शरण जातील, त्यांना आपत्काळातील स्थूल युद्धात आध्यात्मिक गती किंवा विजय मिळेल अन् सात्त्विक लोकांचा विजय होऊन धर्मसंस्थापनेचे कार्य होईल.’

१०. कृतज्ञता आणि प्रार्थना

अध्यात्मशास्त्रानुसार शिष्यांची गुरूंवरील श्रद्धा आणि भक्ती एवढी असायला पाहिजे की, शिष्यांनी सतत वर्तमानकाळात राहून समोर आलेल्या परिस्थितीचा स्वीकार करून जगायला हवे. शिष्याची तेवढी भक्ती नसेल, तरी गुरु ‘शिष्याची आध्यात्मिक हानी होऊ नये’, यासाठी त्याला पुढील आपत्काळाच्या संदर्भात माहिती देऊन त्याची सिद्धता करून घेतात.

‘श्री गुरूंच्या कृपेमुळेच मला आपत्काळाच्या संदर्भातील हे ज्ञान मिळवता आले’, याबद्दल सनातनच्या तिन्ही गुरूंच्या (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या) चरणी कोटीशः कृतज्ञता ! ‘सर्व साधकांना आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी श्री गुरु देत असलेली आवश्यक शक्ती, बुद्धी आणि भक्ती सहजतेने ग्रहण करता यावी’, अशी श्री गुरुचरणी प्रार्थना !’

(समाप्त)

– श्री. निषाद देशमुख (सूक्ष्मातून प्राप्त झालेले ज्ञान) (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के), फोंडा, गोवा. (२८.९.२०२५)

• सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
• सूक्ष्म-जगत् : जे स्थूल पंचज्ञानेंद्रियांना (नाक, जीभ, डोळे, त्वचा आणि कान यांना) कळत नाही; परंतु ज्याच्या अस्तित्वाचे ज्ञान साधना करणार्‍याला होते, त्याला ‘सूक्ष्म-जगत्’ असे संबोधतात.
• सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
• वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या काही वेळा अनिष्ट शक्तींमुळे किंवा ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांना आलेल्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सर्वांनाच येतील, असे नाही. – संपादक