‘पंढरपूरची वारी एकदा तरी अनुभवावी । डोळे भरून पहावी पालखी ज्ञानोबा माऊलीची ।।’, हे केवळ काव्य नाही, तर महाराष्ट्राच्या आत्म्याचा स्पंदनशील स्वर आहे. आषाढी वारी, म्हणजे महाराष्ट्राची संस्कृती, भक्ती आणि शिस्त यांचा चालता-बोलता महोत्सव ! शेकडो वर्षांपासून अखंड चालू असलेली वारी आजही लाखो वारकर्यांच्या पावलांनी श्रद्धेने पुढे चालत आहे.
वारी म्हणजे भक्तीचा महासागर !संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांसह प्रतिवर्षी लाखो वारकरी शेकडो किलोमीटरचा पायी प्रवास करतात. ऊन, वारा, पाऊस, चिखल, थंडी, थकवा यांची कोणतीही तमा न बाळगता पावले पुढेच चालत रहातात. या प्रवासात कुणाची सत्ता वा श्रीमंती नाही, कुणाचा अहंकार नाही. असतो तो केवळ भक्तीचा महासागर ! वारी म्हणजे समतेचे विद्यापीठ. येथे शेतकरी, कामगार, उच्चशिक्षित, विद्यार्थी, अधिकारी, उद्योगपती, कलाकार, मंत्री, आमदार, खासदार सर्व जण एकाच दिंडीत, एकाच धुळीत, एकाच रस्त्यावर चालतात. तुळशीची माळ, कपाळावर गंध अन् ओठांवर अभंग हीच खरी ओळख ! |
१. ‘सॅटर्डे क्लब’ शाखेच्या वतीने पंढरपूर वारीचे सुंदर आयोजन
यंदा नवी मुंबई येथील ‘सॅटर्डे क्लब’ शाखेच्या वतीने २ दिवसांच्या पंढरपूर वारीचे सुंदर आयोजन करण्यात आले होते. या यात्रेत क्लबचे सदस्य आणि त्यांचे कुटुंबीय असे ८० जण सहभागी झाले होते. पहाटे नवी मुंबईहून निघालेली ही यात्रा दुपारी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पावन आळंदीनगरीत पोचली. माऊलींच्या समाधीचे दर्शन, इंद्रायणीमातेला वंदन करून ‘ज्ञानोबा-तुकाराम’च्या गजरात सर्व जण जेजुरीकडे रवाना झाले. रात्री मुक्कामाच्या वेळी वारकरी संप्रदायातील भजन, कीर्तन, टाळ-मृदंगाचा नाद, फेर धरून केले जाणारे सामूहिक नृत्य यांचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधी मिळाली. यामुळे संपूर्ण वातावरण भक्तीरसाने भारावून गेले.
दुसर्या दिवशी पहाटे सर्व जण महाराष्ट्राचे कुलदैवत श्री खंडोबाच्या दर्शनासाठी जेजुरी गडावर गेले. ‘येळकोट येळकोट जय मल्हार’ या जयघोषात भंडारा आणि खोबरे यांची उधळण करत दर्शन घेतले. पुढे जेजुरीपासून वारकर्यांच्या दिंडीसह तरडगावापर्यंत पायी प्रवास, नंतर चांदोबाचे लिंब येथे संत ज्ञानेश्वर माऊलींच्या अश्वाने केलेल्या उभ्या रिंगणाचा आनंद सोहळा पहाण्यास मिळाला.
वारीच्या मार्गावर झालेला विकास आणि रोजगाराच्या संधी

यंदाच्या वारीत आणखी एक पालट प्रकर्षाने जाणवला. काही वर्षांपूर्वी वारीला आलो होतो, तेव्हा सासवड, जेजुरी आणि आसपासचा परिसर शांत, ग्रामीण अन् मर्यादित विस्ताराचा होता. मागील काही वर्षांत शासनाने पालखी मार्गाचे रुंदीकरण करून उत्कृष्ट रस्ते सिद्ध केल्याने संपूर्ण परिसराचे चित्र पालटले. सासवड आणि जेजुरी या शहरांचा झपाट्याने विस्तार झाला आहे. आधुनिक इमारती, बंगले, व्यापारी संकुले, उद्योगधंदे, वाहनांची वाढ आणि नागरी सुविधा पाहून हा पालट स्पष्ट जाणवतो. जेजुरीच्या गडावरून खाली पाहिले, तर चारही दिशांनी विस्तारलेले शहर दिसते. औद्योगिक वसाहती निर्माण झाल्याने अनेक लघु-मध्यम उद्योग आल्याने स्थानिक युवकांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. पर्यटनासह स्थानिक अर्थव्यवस्थेलाही मोठी चालना मिळाली आहे. विकासाचे हे चित्र स्वागतार्ह आहे; मात्र त्यासह शेती, पर्यावरण आणि सांस्कृतिक वारसा यांचे संतुलन राखणेही तितकेच आवश्यक आहे.
– श्री. अनिल साखरे
२. वारीच्या मार्गावर वारकरीआणि समाज यांच्या सुंदर रूपाचा संगम
जगभरामध्ये कुठेही साजरा होत नसेल, असा हा महाराष्ट्रात साजरा होणारा पंढरपूरच्या वारीचा आगळावेगळा भक्तीमय सोहळा ! लाखो लोक चालतात; पण गोंधळ नाही, धक्काबुक्की नाही, हिंसा नाही. प्रत्येक दिंडीची वेळ, व्यवस्था, मुक्काम आणि सेवा ठरलेली असते. ही शिस्त पोलिसांच्या दंडुकीने आलेली नाही, तर ती संतांच्या संस्कारांनी घडलेली आहे.
वारीच्या मार्गावर समाजाचे दुसरेही सुंदर रूप दिसते. असंख्य ग्रामस्थ, सेवाभावी संस्था, धार्मिक ट्रस्ट, युवक मंडळे, महिला बचतगट, स्वयंसेवी संघटना, विविध सामाजिक संस्था आणि सहस्रो स्वयंसेवक वारकर्यांच्या सेवेत रात्रंदिवस कार्यरत असतात. कुठे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, कुठे अन्नछत्र, कुठे विनामूल्य वैद्यकीय सेवा, नरसेवा ही नारायणसेवा हा विचार येथे प्रत्यक्ष जगतांना दिसतो.
३. शेवटी एकच प्रार्थना !
हे पांडुरंगा, तुझ्या भेटीसाठी वर्षानुवर्षे चालत येणार्या या वारकर्यांच्या भक्तीचे चीज होऊ दे. बळीराजाच्या घरात सुख, शांती आणि समृद्धी नांदू दे. कष्टकर्याच्या घामाला योग्य मोबदला मिळू दे. कोणत्याही आईच्या डोळ्यात उपासमारीचे अश्रू येऊ नयेत. कोणत्याही शेतकर्याला नैराश्याने जीवन संपवावे लागू नये. तुझी कृपा या देशातील सर्वसामान्य माणसांवरही बरसू दे.
ज्ञानोबा-तुकाराम, अखंड नामाचा गजर ।
शिवरायांचा स्वाभिमान, महाराष्ट्राचा अमर स्वर ।।
विटेवरी पांडुरंग, कृपादृष्टी ठेव शेतावरी ।
संतचरणी मस्तक माझे, धन्य धन्य ही पंढरी ।।
– श्री. अनिल दत्तात्रेय साखरे, कोपरी, ठाणे (पूर्व). (१९.७.२०२६)


श्री विठ्ठल : तत्त्वज्ञानाचे आराध्यदैवत !
प्रशासन व्यवस्थाकेंद्रित हवे !
मृत्यूंजय वीर आणि शौर्यचक्राचे मानकरी हवालदार पॅराकमांडो मधुसूदन सुर्वे !
आषाढी वारीसाठी पंढरपूर येथे जाण्यासाठी पुणे विभागातून ३५० अधिकच्या गाड्या !
पंढरपूर येथे यात्रेसाठी उभारलेला तात्पुरता मंडप कोसळला !
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांनी वर्णिलेले सद्गुरुमाहात्म्य आणि त्यातून श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी उलगडलेले सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे अवतारत्व !