‘या लेखमालिकेतील पहिल्या दोन भागांत आपण ‘तिसर्या महायुद्धाचे स्वरूप, स्तर, कालावधी आणि महायुद्धाच्या टप्प्यांनुसार त्याची लक्षणे’, ही सूत्रे समजून घेतली. या लेखात आपण ‘तिसर्या महायुद्धाच्या कालावधीत संभाव्य पालट होण्यामागील कारणे, महायुद्धाच्या संदर्भातील मोठ्या वाईट शक्तींचे नियोजन’, ही सूत्रे जाणून घेणार आहोत.

(भाग ३)
भाग २ वाचण्यासाठी क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/1014566.html

४. तिसर्या महायुद्धाच्या कालावधीत संभाव्य पालट होण्यामागील कारणे
वरील सारणीत दिलेला कालावधी हा ईश्वरी नियोजनानुसार आहे. असे असले, तरी पाताळातील मोठ्या वाईट शक्तींचे त्रास आणि समष्टीचे क्रियमाण यांनुसार त्यात पालट होऊ शकतात.
४ अ. पाताळातील वाईट शक्तींना काळात पालट करणे शक्य नसले, तरी समष्टीला सात्त्विकतेपासून दूर नेण्यासाठी त्यांनी आध्यात्मिक त्रासाच्या तीव्रतेत वाढ करणे : व्यक्तीचे प्रारब्ध किंवा ईश्वरी नियोजन यांना, म्हणजे ईश्वराने ठरवलेल्या काळाला पाताळातील मोठ्या वाईट शक्तींनाही पालटता येत नाही. असे असले, तरी व्यक्ती किंवा समष्टी यांना सात्त्विकतेपासून दूर करण्यासाठी पाताळातील वाईट शक्ती त्यांच्या आध्यात्मिक त्रासात वाढ करतात.

या आध्यात्मिक त्रासामुळे व्यक्तीला प्रारब्धामुळे भोगायचे त्रास ५० असले, तरी त्यांत वाढ होऊन ते ८० होतात आणि त्यामुळे त्यांच्या त्रास भोगण्याच्या कालावधीतही वाढ होते, उदा. एखाद्या व्यक्तीच्या प्रारब्धानुसार १ मासानंतर तिचा मृत्यू होणार असेल, तर वाईट शक्ती तिच्यावर १ मासापूर्वीच तीव्र आक्रमणे करून तिच्या शरिरात विविध रोग उत्पन्न करतात. त्यामुळे त्या व्यक्तीला १ मास विविध त्रास भोगावे लागतात. या त्रासांमुळे तिच्या स्वभावदोषांत वाढ झाल्यामुळे मृत्यूनंतर तिचे नियंत्रण घेणे वाईट शक्तींना सहज शक्य होते. थोडक्यात, त्रास देण्यामागे वाईट शक्तींचा उद्देश ‘व्यक्तीला अधिकाधिक काळ सात्त्विकतेपासून दूर नेऊन आणि तमोगुणाच्या संपर्कात ठेवून तिचे मन भाव-भक्तीहीन करणे’, हा असतो.
हीच प्रक्रिया वाईट शक्ती आपत्काळात आध्यात्मिक त्रासांत वाढ करून साध्य करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे त्यांना असंख्य व्यक्तींच्या लिंगदेहांचे नियंत्रण घेऊन स्वतःची शक्ती वाढवता येते. ‘समष्टी प्रारब्धानुसार जरी ठराविक क्षेत्रात पूर किंवा ढगफुटी होऊन १ मास त्रास होणार असेल, तर मोठ्या वाईट शक्ती त्या त्रासात वाढ करून २ किंवा ३ मास त्या क्षेत्रातील लोकांना पूर किंवा ढगफुटी यांचा त्रास व्हावा’, असे करतात. अशाच प्रकारे वाईट शक्तींचे तिसर्या महायुद्धाच्या संदर्भातील प्रयत्न आहेत. त्यामुळे ठराविक काळाच्या पूर्वी किंवा नंतर दीर्घकाळही तिसरे महायुद्ध चालू राहू शकते.
४ आ. संतांनी समाजात चैतन्य प्रक्षेपित करून आणि लोकांना साधना शिकवून सात्त्विकतेत वाढ करणे आणि त्यामुळे आध्यात्मिक त्रासाचे प्रमाण न्यून होणे : ज्याप्रमाणे मोठ्या वाईट शक्ती समाजाला त्रास देण्यासाठी आपत्काळात आध्यात्मिक त्रासाच्या तीव्रतेत वाढ करतात, त्याचप्रमाणे परात्पर गुरु, सद्गुरु आणि गुरु (संत) पातळीचे संत समाजाला साधना शिकवून समाजाच्या सात्त्विकतेत वाढ करतात, तर ‘देऊळ बांधणे, यज्ञ करणे, संकट दूर होण्यासाठी सामूहिक नामजप करून घेणे’, अशा विविध माध्यमांतून समाजात चैतन्य प्रक्षेपित करतात. त्यामुळे समाजाच्या सात्त्विकतेत वाढ होऊन त्यांना ईश्वरी चैतन्य ग्रहण करणे शक्य झाल्याने मंद आणि मध्यम स्तरावरील समष्टी प्रारब्धावर काही प्रमाणात मात करता येते, उदा. वर्ष २००५ मध्ये देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमासमोरील गाढी नदीला पूर आला होता. त्या वेळी संतांनी आश्रमात आणि साधकांच्या घरात आलेल्या पुराच्या पाण्याची (जलदेवतेची) ओटी भरायला सांगितले होते. हा आध्यात्मिक स्तरावरील उपाय केल्याने पुराची तीव्रता न्यून झाल्याचे अनेकांनी अनुभवले.
थोडक्यात, समष्टीने संतांच्या आज्ञेनुसार आचरण केल्याने काही प्रमाणात समष्टी प्रारब्धाची तीव्रता किंवा वाईट शक्तींच्या आक्रमणांमुळे वाढलेली त्रासाची तीव्रता न्यून होते. त्यामुळे ईश्वरी नियोजनानुसार समष्टी प्रारब्ध भोगण्याचा काळ अधिक असला, तरी साधना करणार्या समष्टीने तळमळीने आणि संतांच्या मार्गदर्शनानुसार साधनेचे प्रयत्न केले, तर त्यांना विविध कारणांमुळे होणार्या त्रासाची तीव्रता न्यून होऊ शकते.’
५. तिसर्या महायुद्धाच्या आरंभकाळात समष्टीची अधिकाधिक आध्यात्मिक हानी होण्यासाठी मोठ्या वाईट शक्ती सूक्ष्म स्तरावर प्रयत्न करणार असणे
सूत्र क्र. ३ मध्ये दिलेल्या (४.३.२०२६ या दिवशी दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये प्रसिद्ध झालेल्या) सारणीचा अभ्यास केल्यावर लक्षात येते, ‘तिसर्या महायुद्धाच्या तीन टप्प्यांपैकी पहिल्या, म्हणजे आरंभीच्या टप्प्यात आध्यात्मिक त्रासाची तीव्रता सर्वाधिक असून त्या काळातील युद्ध हेही सर्वाधिक प्रमाणात निर्गुण-सगुण स्तरावर लढले जाणार आहे.’ याचे कारण असे की, ‘रज-तमयुक्त काळ नष्ट होऊन सत्त्वगुणप्रधान रामराज्य (हिंदु राष्ट्र) स्थापित होणे’, हे ईश्वरनियोजित काळातील परिवर्तन मोठ्या वाईट शक्तींना थांबवता येत नाही. त्यामुळे त्या या काळात होणार्या स्थूल घडामोडींचा लाभ घेऊन समष्टीची अधिकाधिक आध्यात्मिक हानी होण्यासाठी सूक्ष्म स्तरावर प्रयत्नरत असतात.’

५ अ. मोठ्या वाईट शक्तींनी समाजाची साधनेच्या स्तरावरील आध्यात्मिक हानी करण्यामागील कारण : एखादी व्यक्ती किंवा समाज यांच्यावर मोठ्या वाईट शक्तींनी आक्रमणे करून लोकांचा अपमृत्यू घडवून आणल्यामुळे समाजाची अधिकाधिक ३० टक्के, एवढीच आध्यात्मिक हानी करता येते. याउलट व्यक्तीला साधनेच्या तत्त्वाविरुद्ध ‘भोग, वासना आणि स्वेच्छेने आचरण करणे’, यांमध्ये गुंतवून, म्हणजे तिचे मन, बुद्धी अन् लिंगदेह यांवर आसुरी आनंदाचे संस्कार केल्याने व्यक्तीची ७० ते ८० टक्के हानी घडवून आणता येते; कारण आसुरी आनंदात लिप्त झालेल्या जिवाला स्वेच्छेचा त्याग करून परत परेच्छा अन् ईश्वरेच्छा यांकडे येणे पुष्कळ अवघड होते. असा जीव स्वतः वाईट शक्ती होतो किंवा स्वेच्छेने वाईट शक्तींचा दास होतो. मोठ्या वाईट शक्तींनी समाजाची आध्यात्मिक हानी घडवून आणल्यावर समाजाची रामराज्य स्थापित होण्यासाठी करायचे समष्टी क्रियमाण आपोआप न्यून होते आणि सात्त्विकतेची निर्मिती उणावते. त्यामुळे वाईट शक्तींना त्यांचे राज्य काही प्रमाणात का होईना, टिकवून ठेवता येते. यासाठी सर्व काळात वाईट शक्ती समाजाची आध्यात्मिक हानी घडवण्यासाठी चिकाटीने प्रयत्नरत असतात.
५ आ. प्रत्यक्ष युद्धकाळात मोठ्या वाईट शक्ती विकारांना प्रोत्साहन देऊन आणि समाजाला साधनेपासून दूर नेऊन अधिकाधिक त्रास देण्याचा प्रयत्न करणार असणे : वर्ष २०२५ ते २०२७ या कालावधीत मोठ्या वाईट शक्ती अधिकाधिक निर्गुण-सगुण स्तरावर माया, मोह आणि चुकीचे तत्त्वज्ञान यांचा एवढा प्रसार करतील की, समाजातील अधिकाधिक लोकांना देवभक्ती, संस्कृती, धर्माचरण, अध्यात्म इत्यादींऐवजी मानसिक अन् बौद्धिक स्तरांवरील उपाययोजना अधिक परिणामकारक वाटतील, उदा. रज-तम प्रसारित करणार्या फटाक्यांवर पूर्ण प्रतिबंध न लावता ‘ग्रीन क्रॅकर्स’ना (इतर फटाक्यांच्या तुलनेत पर्यावरणाची अल्प हानी करणार्या फटाक्यांना) अनुमती देणे. या कालावधीत मानसिक आणि बौद्धिक स्तरांवर संतांपेक्षा राजकारण्यांना श्रेष्ठ गणले जाईल अन् ‘धनाची उलाढाल करून केला जाणारा विकास’, हीच श्रेष्ठ राष्ट्रभक्ती मानली जाईल, तर चारित्र्याला गौण स्थान देण्यात येईल. अशा प्रकारे विकारांना प्रोत्साहन देऊन मोठ्या वाईट शक्ती समाजाला धर्माचरण आणि साधना यांपासून, म्हणजेच ईश्वरी कृपेपासून दूर नेऊन आपत्काळात समाजाला अधिकाधिक त्रास देण्याचा प्रयत्न करतील. ज्या साधकांची व्यष्टी साधना अल्प असेल, तेही या षड्यंत्रात अडकून साधना सोडून व्यवसाय, नोकरी, विवाह इत्यादींत अडकतील आणि त्यामुळे आपत्काळात त्यांना अधिक प्रमाणात शारीरिक, मानसिक अन् आर्थिक त्रास भोगावे लागतील.
५ इ. साधकांचे खच्चीकरण करून त्यांची भक्ती न्यून होण्यासाठी वाईट शक्ती साधकांवरील स्थुलातील आक्रमणात वाढ करत असणे : समष्टी संतांच्या मार्गदर्शनानुसार साधना करणार्या साधकांच्या साधनेमुळे समाजातील रज-तम न्यून होते. त्यामुळे मोठ्या वाईट शक्तींना त्यांचे ध्येय सहजपणे साध्य करता येत नाही; म्हणून या वाईट शक्ती समष्टी संतांच्या मार्गदर्शनानुसार साधना करणार्या साधकांना त्रास देऊन त्यांना साधनेपासून दूर नेण्याचा प्रयत्न करत आहेत. मागील २५ वर्षांपासून सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले दिवस-रात्र सूक्ष्मातील युद्ध लढत असल्यामुळे वाईट शक्तींची क्षमता न्यून होऊन ती ३० टक्के, एवढीच शेष राहिली आहे. त्यामुळे आता मोठ्या वाईट शक्ती आध्यात्मिक स्तरावर आक्रमण न करता साधकांना शारीरिक आणि मानसिक स्वरूपाचे त्रास देऊन त्यांची भक्ती न्यून करण्याचा प्रयत्न करत आहेत, उदा. अकस्मात् अपघात होऊन अस्थीभंग होणे किंवा मुका मार लागणे आणि त्या परिस्थितीमुळे देवाशी असलेले अनुसंधान न्यून होणे.
पूर्वीच्या काळी चंगेज खान नावाचा आक्रमणकर्ता होता. त्याची सेना लहान असल्याने तो छळाने आपल्या शत्रूचे शस्त्रागार लुटायचा. त्यामुळे त्याची शत्रूसेना शस्त्रविहीन (शस्त्रविरहित) झाल्याने चंगेज खानला मोठ्या आणि बलशाली शत्रूलाही पराभूत करणे सहज शक्य असायचे. हीच रणनीती सूक्ष्मातील वाईट शक्ती वापरत आहेत. वर्तमानकाळात साधकांचा भाव आणि भक्ती हीच साधकांची शस्त्रे आहेत. त्या माध्यमातून त्यांना देवाची कृपा मिळून समष्टीत अध्यात्मप्रसार आणि हिंदु राष्ट्राच्या संदर्भात जनजागृती करता येते. याच शस्त्रांना नष्ट करण्यासाठी मोठ्या वाईट शक्ती साधकांना शारीरिक आणि मानसिक स्वरूपाचे त्रास देऊन त्यांची भक्ती न्यून करण्याचा प्रयत्न करत आहेत.
(क्रमशः)
– श्री. निषाद देशमुख (सूक्ष्मातून प्राप्त झालेले ज्ञान) (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के), फोंडा, गोवा. (२८.९.२०२५)
भाग ४ वाचण्यासाठी क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/1015343.html
| • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत. • सूक्ष्म-जगत् : जे स्थूल पंचज्ञानेंद्रियांना (नाक, जीभ, डोळे, त्वचा आणि कान यांना) कळत नाही; परंतु ज्याच्या अस्तित्वाचे ज्ञान साधना करणार्याला होते, त्याला ‘सूक्ष्म-जगत्’ असे संबोधतात. • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात. • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत. • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या काही वेळा अनिष्ट शक्तींमुळे किंवा ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांना आलेल्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सर्वांनाच येतील, असे नाही. – संपादक |
‘सर्वधर्मसमभाव’ असे म्हणणार्यांचे फोलपण !
उन्हाळा इतका तीव्र का होत आहे ? विदेशी झाडे का नको ?
परीक्षांमधील प्रश्नपत्रिका फुटण्यामुळे विद्यार्थांच्या आणि समाजाच्या भवितव्याविषयी प्रश्नचिन्ह !
इतरांचा विचार करणारे आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असलेले म्हार्दोळ, गोवा येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. परशुराम प्रभुदेसाई अन् सौ. पूनम प्रभुदेसाई !
समष्टीसाठी सतत झटणारे सनातनचे ७५ वे (समष्टी) संत पू. रमानंद गौडा (वय ४९ वर्षे)!