हवालदार पॅराकमांडो मधुसूदन सुर्वे यांच्या शौर्याची आणि पराक्रमाची गाथा ऐकल्यावर सहजपणे आठवते ते एक संस्कृत सुभाषित…
कदर्थितस्यापि हि धैर्यवृत्तेर्न शक्यते धैर्यगुणः प्रमार्ष्टुम् ।
अधोमुखस्यापि कृतस्य वह्नेर्नाधः शिखा याति कदाचिदेव ॥
अर्थ : धैर्यवान पुरुषाचा धैर्यगुण त्यास त्रास देऊनही नाहीसा करणे शक्य नाही; कारण अग्नीची ज्वाला खाली केली, तरी ती खाली होत नाही. (तिची गती वर रहाते.)

१. मधुसूदन सुर्वे यांची कौटुंबिक पार्श्वभूमी
सुर्वे यांच्या परिवारात त्यांचे पणजोबा, आजोबा, वडील, मोठे काका, लहान काका सारेच सैन्यात होते. शौर्याची परंपरा असलेला हा सुर्वे परिवार आहे. १९७० च्या दशकात मधुसूदन सुर्वे यांच्या वडिलांनी देशाचे रक्षण करतांना प्राणांची आहुती दिली. त्या वेळी मधुसूदन हे ६ मासांचे होते. स्वाभाविकपणे घराचे पूर्ण दायित्व त्यांच्या आईच्या खांद्यावर आले. आईनेच त्यांना वडिलांची आणि आईची माया दिली. ही माया देत असतांना वडिलांप्रमाणे शौर्याचे संस्कार केले. वडिलांच्या हत्येचा प्रतिशोध घेण्यासाठी भारतीय सैन्यात भरती होण्यासाठी प्रोत्साहन दिले. या संस्काराने मंडित झालेल्या मधुसूदन सुर्वे यांनी सैन्यदलात प्रवेश केला.
वर्ष १९९२ मध्ये त्यांची आई त्यांना सैन्यदलात भरती करण्याच्या हेतूने रत्नागिरीतून मुंबईत घेऊन आली. त्या वेळी मधुसूदन सुर्वे २१-२२ वर्षांचे होते. लष्करातील सामान्य प्रशिक्षणानंतर त्यांना पॅराकमांडोच्या प्रशिक्षणासाठी पाठवण्यात आले. वर्ष १९९६ मध्ये त्यांचा विवाह झाला. त्यांच्या पत्नीकडील परिवारातील अनेक जण सैन्यदलातीलच होते. त्यांचा विवाह, म्हणजे दोन शूरवीर कुटुंबाचे मिलन होते.
२. सुर्वे यांच्यासह त्यांच्या बटालियनने शौर्यपराक्रमाने दिली कारगिल विजयाची पहिली मानवंदना !
नुकतेच पॅराकमांडोचे शिक्षण पूर्ण झाले होते. त्यानंतर लगेचच आपल्याला कामगिरीवर पाठवले जाईल, याची शक्यता त्यांना वाटली नव्हती. म्हणून त्यांनी काही दिवसांची सुट्टी घेतली. सुट्टी घेऊन घरी आले आणि दोनच दिवसांनी त्यांना कळवण्यात आले, ‘तुम्ही श्रीनगरला रिपोर्ट (कर्तव्यावर रुजू व्हा) करा. तुमची सुट्टी रहित करण्यात आली आहे.’ त्यांना तातडीने आलेल्या आदेशाप्रमाणे श्रीनगरला जावे लागले. काश्मीर घाटीत शिरून पाकिस्तानी सैनिकांनी आक्रमण केले होते. पाकच्या सैनिकांना धडा शिकवण्यासाठी त्यांना तातडीने बोलवण्यात आले. हे आक्रमण, म्हणजेच कारगिल युद्ध होय.
काश्मीर घाटीतल्या एका भागात सुर्वे यांची छावणी होती. ते त्यांच्या सहकार्यांसमवेत तेथे उपस्थित असतांना पाकिस्तानी सैनिकांनी त्यांच्या छावणीवर बाँबद्वारे आक्रमण केले. या आक्रमणात त्यांच्या ४ सहकार्यांना वीरगती प्राप्त झाली. त्यांच्या देहाच्या चिंधड्या उडाल्या. त्यातील एकाच्या मांसाचा तुकडा सुर्वे यांच्या अंगावर येऊन पडला. त्यानंतर मात्र त्यांनी डझनभर पाकिस्तानी सैनिकांचा शिरच्छेद केला. या कारगिल युद्धात भारताचा विजय झाला. मधुसूदन सुर्वे यांच्या बटालियनने ज्या शिखरावर पाकिस्तानी सैन्याने ताबा मिळवला होता, त्या शिखरावर पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा करून हिंदुस्थानचा तिरंगा ध्वज फडकवला. कारगिलच्या युद्धातील विजयाची ही पहिली मानवंदना होती. कारगिलच्या युद्धात भारतीय सैनिकांनी अतुलनीय पराक्रम गाजवला. त्यांचे स्मरण आपल्याला नित्य झाले पाहिजे.
‘नमस्ते शौर्य फाऊंडेशन’च्या वतीने पॅराकमांडो मधुसूदन सुर्वे यांचा डोंबिवलीत सत्कार

मृत्यूंजय वीर आणि शौर्यचक्राचे मानकरी मधुसूदन सुर्वे यांचा पराक्रम पहाण्यासाठी आपण निश्चितच आतुर आहोत अन् तशी सर्वांची तीव्र इच्छा आहे. ही इच्छा आणि आतुरता यांची पूर्तता चित्रपटाच्या रूपातून लवकरच पूर्ण होणार आहे. सुर्वे यांच्यावर आधारित चित्रपट निर्माते मनीष शर्मा करत असून त्याचे दिग्दर्शक नीरज पाठक आहेत. पॅराकमांडो मधुसूदन सुर्वे यांची भूमिका ‘धुरंधर’ अर्थात् अभिनेते रणवीर सिंह निभावणार असून त्यांच्या पत्नीची भूमिका आलिया भट साकारणार आहेत.
सुर्वे यांचा सत्कार ‘पद्मश्री’ पुरस्काराचे मानकरी श्री. गजानन माने यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. श्री. माने यांनी भारतीय नौसेनेत योगदान दिले आहे. त्यांनी निवृत्तीनंतर वर्ष १९९० पासून कल्याण डोंबिवली महापालिकेच्या परिसरातील कुष्ठरोग्यांसाठी कुटुंबासह उर्वरित आयुष्य समर्पित केले आहे. त्यांनी कुष्ठरोग्यांसाठी महाराष्ट्र राज्यातील पहिले रुग्णालय कल्याण डोंबिवली महापालिकेच्या परिसरात उभारले आहे. त्यांनी कुष्ठरोग्यांना स्वावलंबी बनवले आहे. अनेक तरुण-तरुणींना सैन्यात भरती होण्यासाठी ते प्रेरणाही देतात. कुष्ठरोग्यांच्या वसाहतीतील ४० तरुणांना त्यांनी कल्याण डोंबिवली महापालिकेच्या कार्यालयात कामाला लावले आहे. अशा श्री. गजानन माने यांचा सत्कार या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रसिद्ध व्याख्याते आणि लेखक श्री. दुर्गेश परुळकर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
दिनांक आणि वार : शनिवार, २५ जुलै २०२६
वेळ : संध्याकाळी ६ वाजता
स्थळ : बोडस सभागृह, रामनगर, केळकर रोड, डोंबिवली (पूर्व)
प्रवेश विनामूल्य – पूर्वनोंदणी आवश्यक
संपर्क : ९८१९५०४०२० / ९८३३४१०३६५
३. आतंकवादी आक्रमणात सुर्वे यांच्या पायाला ७ गोळ्या लागल्याने त्यांनी स्वतः तो पाय तोडणे
यानंतर वर्ष २००५ मध्ये ईशान्य भारतातील मणीपूरमध्ये २० हून अधिक आतंकवाद्यांनी घुसखोरी केली होती. त्यांनी मणीपूरमधील महिला आणि लहान मुले यांची हत्या करण्याचा सपाटा लावला होता. त्यांना वेसण घालण्याची कामगिरी सुर्वे यांच्या बटालियनवर सोपवण्यात आली. मधुसूदन सुर्वे या बटालियनचे नेतृत्व करत होते. आतंकवादी ज्या क्षेत्रात होते, तेथे सुर्वे आणि त्यांचे सहकारी हे स्वतःची ओळख लपवून तिथे जाऊन पोचले. काही आतंकवादी तेथील एका घरात लपून बसले होते. त्यांनी बाँब फेकण्यास प्रारंभ केल्याने त्याच्या आवाजाने अन्य आतंकवादी घटनास्थळी येऊन पोचले. पॅराकमांडोज आणि आतंकवादी यांच्यात संग्राम चालू झाला. आतंकवाद्यांकडून झाडण्यात आलेल्या गोळ्यांपैकी ७ गोळ्या मधुसूदन सुर्वे यांच्या एका पायात, तर दुसर्या पायात आणि पोटात प्रत्येकी २ गोळ्या घुसल्या. त्यामुळे ते भूमीवर कोसळले. त्यांच्या ज्या पायात ७ गोळ्या घुसल्या होत्या, त्यातून होणारा रक्तस्राव थांबतच नव्हता. म्हणून त्यांनी त्यांच्या एका सहकार्याला गुडघ्याखालून पाय तोडण्यास सांगितले; पण त्याने त्यांचे ऐकले नाही. शेवटी सुर्वे यांनी स्वतःजवळील कुकरीच्या (धारदार शस्त्र) साहाय्याने ज्या पायातून अतीरक्तस्राव होत होता, तो पाय गुडघ्याखालून तोडला. अत्यंत प्रयासाने ‘मार्फीन इंजेक्शन’ दिल्यामुळे ती रात्र त्यांनी कशीतरी काढली. नाही तर मरणप्राय यातनांनी त्यांचा प्राण गेला असता.
मधुसूदन सुर्वे शौर्यचक्राने सन्मानित !

वर्ष २००६ मध्ये मधुसूदन सुर्वे यांना राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या हस्ते शौर्यचक्राने सन्मानित करण्यात आले. हा सन्मान झाल्यानंतर राष्ट्रपती डॉ. कलाम यांनी त्यांना भोजनाचे आमंत्रण दिले. त्यांनी ते सविनय आनंदाने स्वीकारले.
४. सुर्वे यांची झालेली गंभीर स्थिती
दुसर्या दिवशी सकाळी त्यांना हेलिकॉप्टरमधून सुरक्षित स्थळी नेण्यात आले. त्यांनी घरी दूरध्वनी करून फूटबॉल खेळतांना घायाळ झाल्याने काही दिवस दूरध्वनी करू शकणार नाही, असे सांगितले. त्यांच्या युनिटने गंभीर रुग्णांच्या सूचीत त्यांचे नाव नोंदवले. त्यांची ६ दिवस शुद्ध हरपल्याने त्या दिवसांत काय झाले, ते त्यांना आठवत नाही. ते जेव्हा शुद्धीवर आले, तेव्हा आपण जिवंत आहोत, यावर त्यांचा प्रथम विश्वासच बसला नाही. त्यांना मरणप्राय यातना होत होत्या. अशा यातना सहन करण्याऐवजी आपण हुतात्मा झालो असतो, तर अधिक बरे झाले असते, असे त्यांच्या मनात येऊ लागले. त्यांच्या पोटावर २ गोळ्या लागल्यामुळे त्यांचे आतडे शरिराच्या बाहेर आले होते. शस्त्रक्रिया करून त्यांना आता कृत्रिम आतडे बसवण्यात आले आहे. त्यांनी स्वतःच तोडलेल्या पायाच्या ठिकाणी कृत्रिम पाय जोडण्यात आला आहे. वर्ष २०११ मध्ये ते सैन्यातून निवृत्त झाले. निवृत्तीनंतरही ते सैन्याच्या आरोग्य केंद्रात काम करत आहेत.
– प्रतिनिधी, ‘नमस्ते शौर्य फाऊंडेशन’
ज्ञानोबा-तुकारामांचा गजर, विठ्ठल भेटीला निघाला सागर !
प्रशासन व्यवस्थाकेंद्रित हवे !
US Bangladesh Military Exercise : भारताच्या बांगलादेश सीमेजवळ अमेरिकी सैनिकांसमवेत बांगलादेशाच्या सैन्याचा युद्धसराव
कोरियन संस्कृतीचे दुष्परिणाम !
लैंगिक आरोग्य आणि स्त्री
वारकरी संप्रदाय