महाराष्ट्राचे ‘अन्न व औषध प्रशासन (एफ्.डी.ए.)’चे आयुक्त म्हणून तुकाराम मुंढे यांनी मे २०२६ मध्ये पदभार स्वीकारला आणि त्यानंतर अल्पावधीतच राज्यभर धाडसत्र करत भेसळविरोधी कारवाया केल्या, गुटखामाफियांच्या विरोधात कठोर भूमिका घेतली आणि दिशाभूल करणार्या विज्ञापनांवरही कारवाया चालू केल्या. त्यामुळे हा विभाग चर्चेत आला आहे. सध्या गुटखा आणि प्रतिबंधित तंबाखू यांच्या उत्पादनांच्या अवैध व्यापाराविरोधात कठोर कारवाईचे आदेश आणि भेसळयुक्त अन्न-औषधांविरोधातील मोहीम चालू आहे.
भेसळ, गुटखा, निकृष्ट औषधे आणि अन्नसुरक्षेचे प्रश्न हे मे २०२६ नंतर अचानक निर्माण झालेले नाहीत. या समस्या अनेक वर्षांपासून अस्तित्वात आहेत. आज ज्या गोष्टींवर मोठ्या प्रमाणात कारवाई होत आहे, त्या मग यापूर्वी का होत नव्हत्या ? यापूर्वी कारवाया का केल्या नाहीत ? त्यामध्ये काही भ्रष्टाचार होत होता का ? हेही पुढे आले पाहिजे. हा प्रश्न केवळ तुकाराम मुंढे किंवा अन्न व औषध प्रशासनापुरता मर्यादित नाही, तर तो संपूर्ण प्रशासकीय व्यवस्थेशी संबंधित आहे. कोणत्याही विभागात नवीन अधिकारी आल्यावर अचानक मोठ्या प्रमाणात कारवाया चालू होतात. त्यानंतर जनतेच्या मनात प्रश्न निर्माण होतो की, याआधीच्या काळात यंत्रणा काय करत होती ?
इथे प्रश्न व्यक्तींचा नसून व्यवस्थेचा आहे. नागरिक म्हणून आपल्याला अपेक्षा ठेवण्याचा अधिकार आहे, ती म्हणजे प्रशासनात सातत्य असावे. एखादा कर्तव्यदक्ष अधिकारी आला म्हणून कारवाई व्हावी आणि तो गेल्यानंतर सर्व काही पुन्हा ठप्प व्हावे, ही परिस्थिती लोकशाही व्यवस्थेसाठी योग्य नाही. खरे यश एखाद्या व्यक्तीच्या लोकप्रियतेत नाही, तर संस्थेच्या कार्यक्षमतेत आहे. जर अन्न व औषध प्रशासन विभागामध्ये भेसळविरोधी कारवाया, गुटखा नियंत्रण, औषधांची गुणवत्ता पडताळणी आणि जनतेच्या तक्रारी यांवर त्वरित प्रतिसाद देण्याची भक्कम व्यवस्था निर्माण झाली, तर कोणताही अधिकारी आला किंवा गेला, तरी कामाची गती कायम राहील.
आज तुकाराम मुंढे यांच्या कारवाईचे स्वागत होत आहे; परंतु या स्वागतासह आपण एक मोठी मागणी करायला हवी, ती म्हणजे प्रशासन व्यक्तीनिष्ठ नव्हे, तर व्यवस्थाकेंद्रित हवे. चांगल्या अधिकार्यांची आवश्यकता असतेच; पण त्याहून अधिक आवश्यकता असते ती चांगली, सक्षम आणि सातत्याने काम करणारी व्यवस्था उभी करण्याची ! देशहितासाठी नायकांपेक्षा भक्कम संस्था अधिक महत्त्वाच्या असतात आणि देशाला आज अशाच भक्कम संस्थात्मक प्रशासनाची आवश्यकता आहे.
– श्री. किशोर जगताप, सोलापूर


मोरजी येथे दुसर्या दिवशीही अवैध बांधकामांवर कारवाई
ज्ञानोबा-तुकारामांचा गजर, विठ्ठल भेटीला निघाला सागर !
मृत्यूंजय वीर आणि शौर्यचक्राचे मानकरी हवालदार पॅराकमांडो मधुसूदन सुर्वे !
Modi On Paper Leak : प्रश्नपत्रिका फुटीतील दोषींवर कठोर कारवाई केली पाहिजे ! – पंतप्रधान मोदी
स्मार्ट वीजमीटरला विरोध करणार्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न ! – सिंधुदुर्ग वीज ग्राहक संघटना, दोडामार्ग शाखा
कोरियन संस्कृतीचे दुष्परिणाम !