श्री. विजय लोटलीकर यांची अध्यात्मविषयक जिज्ञासा आणि तिचे समाधान

जिज्ञासा - साधनेचे उद्दिष्ट, प्रक्रिया आणि फळ यांच्याविषयी अधिक स्पष्टता हवी आहे.

श्री. अनंत आठवले ह्यांनी जिज्ञासेचे केलेले समाधान

।। श्रीकृष्णाय नम: ।। 

पू. अनंत आठवले

 १. उद्दिष्ट 

मनुष्य सर्वकाही सुखासाठी करत असतो. आयुष्यात केवळ सुखच सुख असते आणि दु:खाचा लवलेशही नसता तर कदाचित् मनुष्याने साधना केलीच नसती; पण असे होत नाही. आयुष्यात केवळ सुख नसते, दु:खसुद्धा असतेच. संत तुकाराममहाराजांनी म्हटले आहे – ‘सुख आहे जवापाडे दु:ख पर्वताएवढे’. भगवान् श्रीकृष्णांनी जन्म-पुनर्जन्माला ‘दु:खालयमशाश्वतम्’ (गीता, अध्याय ८, श्लोक १५) म्हणजे अनित्य आणि दु:खाचे घर म्हटले आहे. शाश्वत सुखाचा शोध घेतांना मनुष्याला आढळते की पूर्ण आणि केवळ सुख ईश्वराकडूनच मिळू शकते. त्यामुळे मनुष्य ईश्वरप्राप्तीचे प्रयत्न, म्हणजे वेगवेगळी साधना करतो.

२. दु:खाचे कारण 

मुळात, मनुष्य म्हणजे मनुष्याचा आत्मा ईश्वराचा अंश आहे; अर्थात् ज्ञान, आनंद इत्यादी जे ईश्वराचे स्वरूप आहे, तेच मनुष्याच्या आत्म्याचे स्वरूप आहे; पण मनुष्य बाह्य आकर्षणांमध्ये गुंतून संसारातील अनित्य सुखांच्या मागे धावू लागतो. सुखासाठी वेगवेगळ्या गोष्टींच्या कामना-इच्छा करू लागतो. मिळवलेल्या गोष्टींमध्ये ममता होते. स्वत:च्या कर्तुत्वाविषयी अहंकार होतो. मग इच्छा पूर्ण नाही झाली की दु:ख, मिळवलेली गोष्ट नष्ट झाली किंवा दुरावली की दु:ख, अहंकाराला ठेच लागली की दु:ख !


पू. अनंत आठवले यांच्या लिखाणातील चैतन्य न्यून न होण्यासाठी घेतलेली काळजी

पूजनीय अनंत आठवले (पूजनीय भाऊकाका) हे संत असल्याने त्यांच्या लिखाणात चैतन्य आहे. ते चैतन्य न्यून होऊ नये; म्हणून त्यांच्या लिखाणाची पद्धत, भाषा आणि व्याकरण यांत पालट केलेले नाहीत.

३. दु:खावरचा मूळ उपाय

गीतेत भगवान् श्रीकृष्णांनी सांगितले आहे –

श्री. विजय लोटलीकर

विहाय कामान्य: सर्वान्पुमांश्चरति नि:स्पृह:।

निर्ममो निरहंकार: स शान्तिमधिगच्छति ।। अध्याय २ श्लोक ७१

एषा ब्राह्मी स्थिति: पार्थ नैनां प्राप्य विमुह्यति ।

स्थित्वास्यामन्तकालेपि ब्रह्मनिर्वाणमृच्छति।। अध्याय २ श्लोक ७२

अर्थ – जो मनुष्य सर्व कामना सोडून ममतारहित, अहंकाररहित होऊन निस्पृहतेने वागतो त्याला शांती प्राप्त होते. अर्जुना, ही ब्राह्मी स्थिती आहे जिला प्राप्त झाल्यावर मनुष्य मोहात पडत नाही. अंतकाळीसुद्धा ह्या स्थितीत राहून ब्रह्मात विलीन होतो.

ह्यावरून स्पष्ट आहे की मनुष्याला दु:खातून सुटका हवी असेल, स्थायी आनंद हवा असेल तर ब्रह्मात लीन होणे (किंवा भक्तीमार्गात ईश्वरप्राप्ती करणे) हाच उपाय आहे.

४. विविध उपाय, साधना 

वर सांगितल्याप्रमाणे कामना, ममता आणि अहंकार सोडायचे आहेत हे लक्षात आलेला मनुष्य सरळ त्या दोषांना सोडण्याचा प्रयत्न करतो(ज्ञानमार्ग). पण सर्वांना हे जमत नाही. मनुष्यांची आवड, कल, क्षमता वेगवेगळी असते, त्यामुळे सर्वांना एकच मार्ग जमणार नाही. म्हणून श्रीकृष्णांनी वर सांगितलेली स्थिती प्राप्त करण्यासाठी भगवद्गीतेत पुढे अनेक वेगवेगळे मार्ग सांगितले आहेत. ईश्वरप्राप्तीसाठी अनेक अनुभवारूढ महात्मेसुद्धा वेगवेगळे उपाय, म्हणजे साधना सांगतात. आपण मुख्यत: भगवान् श्रीकृष्णांनी सांगितलेल्या योगांच्या आधारे हा विषय शक्यतो थोडक्यात पुढे पाहू.

अ. सांख्ययोग – हा संन्यासाचा मार्ग आहे. संसारात राहिले तर वेगवेगळ्या वस्तू लागणार, त्यांचा संग्रह करावा लागणार. पत्नी, संतती, नातेवाईक असले तर त्यांच्यात ममता होणार. आपल्या धनाचा, बळाचा, ज्ञानाचा अहंकार होणार. म्हणून या सर्वांपासून वेगळे आणि अलिप्त राहणे.

ज्ञानी मनुष्य गुरुंकडून किंवा ग्रंथांतून आधीच जाणतो की कामना (इच्छा), ममता आणि अहंकार ही दु:खांची, संसार-व्यवहारात अडकण्याची आणि पुन्हा पुन्हा जन्म होत राहण्याची मूळ कारणे आहेत; त्यामुळे तो सरळ हे दोष स्वत:तून घालवण्याचे प्रयत्न करतो.

आ. कर्मयोग – कर्मे तर करायची, शक्य तितकी नीटपणे आणि कुशलतेने करायची, पण त्या कर्मांपासून कसल्याही फळाची अपेक्षा ठेवायची नाही. कर्मे दुसर्‍यांच्या हितासाठी करायची अथवा कर्मांची फळे ईश्वराला अर्पण करून कर्मे करायची.

इ. पातञ्जल अष्टांगयोग – पातञ्जलयोगदर्शन सांगते – ‘योगश्चित्तवृत्तिनिरोध:’. हा योग म्हणजे चित्ताच्या वृत्तींचा निरोध. प्रमाण, विपर्यय, विकल्प, निद्रा आणि स्मृती ह्या पाच चित्तवृत्ती आहेत. निरोध म्हणजे थांबवणे, अटकाव.

ई. ध्यानयोग (आत्मसंयमयोग) – मन जिथे जिथे भटकते तिथून त्याला परावृत्त करून, सर्व बाह्य विषयांचे चिंतन थांबवून आत्म्यात (न जमल्यास ईश्वरात) लावणे. ध्यानाचा दुसरा प्रकार असा आहे की सर्व िवचार थांबवून मन विचारशून्य(निर्विचार) करणे.

उ. भक्तीयोग – ह्या मार्गात भक्तीचे नऊ प्रकार सांगितले आहेत, त्यातील एक किंवा अधिक प्रकाराने भक्ती करून ईश्वरप्राप्ती केली जाऊ शकते. ते प्रकार आहेत – श्रवण, कीर्तन, स्मरण, पादसेवन, अर्चन, वंदन, दास्य, सख्य, आत्मनिवेदन. ह्या अतिरिक्त, एक मधुराभक्तीसुद्धा आहे जी अधिक प्रचलित नाही.

ऊ. अनेक महात्मे, संप्रदाय, विद्वान आहेत. ते वेगवेगळ्या प्रकारे मार्गदर्शन देतात, काही वेगळे विचार सांगतात, काही विशेष उपासना सांगतात.

५. चित्तशुद्धी 

आता वर सांगितलेले ‘अ’ ते ‘ऊ’ हे उपाय पुन्हा लक्षपूर्वक बघावेत. हे आढळेल की प्रत्येक उपायाचा परिणाम असा होतो की मन आणि बुद्धीला मनुष्य कामना, ममता आणि अहंकाराच्या ऐवजी दुसरीकडे लावतो. कसे ते पाहू.

कर्मयोगात स्वत:साठी काही अपेक्षा न करता मन आणि बुद्धीने दुसर्‍यांच्या हिताचा विचार आणि त्यानुसार कर्म करण्यात लावतात आणि परिणामस्वरूप मनुष्य इच्छा इत्यादींपासून दूर होतो.

पातञ्जल अष्टांगयोगात मनाच्या म्हणजे चित्ताच्या वृत्तींना प्रतिबंधित केले जाते. त्यामुळे चित्त कामना, ममता, अहंकार इत्यादींकडे जातच नाही.

ध्यानयोगात मन आत्म्यात (किंवा ईश्वरात) एकाग्र केले जाते अथवा विचारशून्य केले जाते म्हणजे कसले विचारच नाहीत. इच्छा इत्यादी विचारांना वावच उरत नाही.

भक्तीयोगात ईश्वराचे भजन, जप, पूजा, कीर्तन इत्यादी मन:पूर्वक केले जाते. मन तिकडे लागल्यामुळे त्यावेळी मनात इच्छा, ममता इत्यादी येतच नाहीत.

संप्रदाय, महात्मेसुद्धा शिष्यांना त्यांच्या प्रथेनुसार अन्यत्र गुंतवून कामना, ममता, अहंकारापासून दूर करतात.

तात्पर्य हे आहे की वरील साधना वेगवेगळ्या असल्या तरी सर्वांमध्ये कामना, ममता आणि अहंकार मिटवणे हे समान सूत्र आहे. सर्व प्रयास चित्तशुद्धीसाठी आहेत. कोणत्याही गुरुंनी सांगितलेली, महात्म्यांनी सांगितलेली, संप्रदायाने सांगितलेली, उपासना-साधना करण्यावर आक्षेप नाही पण मूर्तीवर फुलेच वाहत राहणे, जपच करत राहणे, ध्यान लावून बसणे हे साध्य नाही, साधन आहे. ज्या कामना इत्यादी षड्रिपूंमुळे, ममतेमुळे, अहंकारामुळे आपण संसार-व्यवहारात गुंततो आणि ईश्वरापासून दूर जातो किंवा ब्रह्मलीन होऊ शकत नाही, त्यांना आपल्यातून पूर्णपणे मिटवणे हे ध्येय असले पाहिजे. कोणत्या मार्गाने साधना करतो, ह्यापेक्षा त्या साधनेने चित्तशुद्धी साध्य करायची आहे ह्याचे भान असणे अधिक महत्त्वाचे आहे. चित्तशुद्धी हे सर्व साधनांचे मर्म आहे.

६. चित्तशुद्धीचे महात्म्यांनी सांगितलेले महत्त्व 

अ. समर्थ रामदासस्वामी – समर्थ रामदासस्वामी रामभक्त, आत्मज्ञानी होते. (‘दासबोध’ ग्रंथात त्यांनी ज्ञान सांगितलेले आहे.) त्यांनी लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी साध्या सोप्या भाषेत ‘मनाचे श्र्लोक’ लिहिले आहेत. त्यात ते पुन्हा पुन्हा रामाची भक्ती आणि त्याचबरोबर आचरण शुद्ध ठेवायला सांगतात. त्यांच्या श्लोकांतील दोन वाक्ये उदाहरण म्हणून सांगतो-  ‘मना वासना दुष्ट कामा नये रे’ श्लोक ४,  ‘नको रे मना क्रोध हा खेदकारी। नको रे मना काम नानाविकारी।। नको रे मना लोभ हा अंगिकारू। नको रे मना मत्सरू दंभ भारू ।।’ श्लोक ६. पूर्ण ग्रंथात त्यांनी भक्तीबरोबर चित्तशुद्धीवर भर दिला आहे.

आ. संत तुकाराममहाराज – बैसोनी निवांत शुद्ध करी चित्त।

तया सुखा अंतपार नाही।।

तुकाराममहाराज सांगतात की एका जागी शांत बसा. शरीराची हालचाल नको तसेच मनातही चलबिचलता नको, विचारांचे वादळ नको. असे शांत राहून चित्त शुद्ध करा. चित्तात कामक्रोधादी दुर्विचार नकोत. अशा शांत आणि शुद्धचित्त मनुष्याच्या सुखाला अंतपार नसतो. ज्या सुखाला अंतच नाही म्हणजे जे स्थायी आहे, असे सुख मिळते. पार म्हणजे ज्याच्या पलीकडे आणखी अधिक नाही असे अर्थात् सर्वाधिक सुख मिळते. आपण अगदी सुरूवातीलाच पाहिले आहे की मनुष्याचे उद्दिष्ट शाश्वत सुख मिळवणे, हे असते. ते शाश्वत सुख चित्तशुद्धीने मिळेल, हेच तर तुकाराममहाराज सांगत आहेत.

इ. भगवान् श्रीकृष्ण – भगवतगीतेत भगवान् श्रीकृष्णांनी नि:संदिग्ध शब्दांत सांगितले आहे –

‘योगिन:कर्म कुर्वन्ति सङ्गं त्यक्त्वात्मशुद्धये।।’  अध्याय ५ श्लोक ११

अर्थ – ‘आसक्ती सोडून योगी अंत:करणाच्या शुद्धीसाठी (ते करत असलेल्या योगानुसार निष्काम कर्म, भक्ती, ध्यान, ज्ञान इत्यादी) कर्मे करतात.’ अर्थात्, भगवान् श्रीकृष्णांनी अगदी स्पष्ट सांगितले आहे की जी प्राप्त करायची आहे ती ‘चित्तशुद्धी’ आहे आणि ती प्राप्त करण्यात ती कर्मे केवळ साधन आहेत.

त्यापुढच्या सहाव्या अध्यायात भगवान् श्रीकृष्ण सांगतात –

आरुरुक्षोर्मुनेर्याेगं कर्म कारणमुच्यते।

योगारूढस्य तस्यैव शम: कारणमुच्यते।। गीता अध्याय ६ श्लोक ३

अर्थ – ‘योगावर आरूढ होण्याची इच्छा असलेल्या मुनीसाठी कर्म हे साधन म्हटले जाते. योगारूढ झाल्यावर शम म्हणजे कर्मांपासून निवृत्त होण्याचा उपयोग होतो.’  कोणत्याही योगाचे आचरण करून पूर्ण चित्तशुद्धी झाल्यावर आपल्या ध्येयाची, मग तो ईश्वर असो, ब्रह्म असो, परमशांती असो, अनुभूती येते. त्यानंतर त्या कर्मांपासूनसुद्धा निवृत्त व्हायचे असते.

७. भक्तीयोग 

तुम्ही भक्तीमार्गी आहात म्हणून भगवान् श्रीकृष्णांनी भक्तीविषयी सांगितलेली काही माहिती पुढे बघूया.

अ. सनातन धर्मामध्ये अनेक देवी-देवता आहेत. लोक आपापल्या श्रद्धेनुसार वेगवेगळ्या देवाची पूजा करतात. जो ज्या देवतेची भक्ती करतो तो त्या देवतेला प्राप्त होतो, पण जो श्रीकृष्णांची (ईश्वराचे वास्तविक स्वरूप जाणून ईश्वराची) भक्ती करतो तो ईश्वराला प्राप्त होतो (गीता अध्याय ९ श्लोक २५).

आ. वेगवेगळ्या कामना असल्यामुळे मनुष्य वेगवेगळ्या देवतांची उपासना त्या देवतांसाठी निर्धारित असलेल्या नियमांनुसार करतो. ईश्वर त्याची श्रद्धा त्या देवतेमध्ये दृढ करतो. त्या श्रद्धेने भक्त त्या देवतेची आराधना करतो आणि ईश्वरानेच त्या देवतेच्या माध्यमातून दिलेले फळ प्राप्त करतो, परंतु त्या अल्प बुद्धीच्या भक्तांना मिळालेले फळ नाशवान् असते. देवतांची पूजा करणारे देवतांना प्राप्त होतात पण ईश्वराची भक्ती (पराभक्ती) करणारे ईश्वराला प्राप्त होतात (गीता अध्याय ७ श्लोक २० ते २३).

इ. भक्त चार प्रकारचे आहेत – आर्त, जिज्ञासू, अर्थार्थी आणि ज्ञानी. आर्त म्हणजे रोगी किंवा अन्य विपत्तीने ग्रस्त. जिज्ञासू म्हणजे जाणण्याची इच्छा असणारा. अर्थार्थी म्हणजे धनाची इच्छा असणारा. ज्ञानी म्हणजे ईश्वराला तत्त्वत: जाणणारा, ईश्वराचे यथार्थ स्वरूप जाणणारा (गीता अध्याय ७ श्लोक १६). भगवान् श्रीकृष्ण सांगतात की हे सर्वच भक्त मला प्रिय आहेत, पण ज्ञानी तर माझे स्वरूपच आहे. ज्याचा आत्मा माझ्याशीच जुडलेला आहे असा तो सर्वाेत्तम गतीत स्थित असतो (गीता अध्याय ७ श्लोक १८).

ई. ईश्वर अव्यक्त आहे पण ईश्वराचे परम स्वरूप न जाणणारे बुद्धीहीन लोक ईश्वराच्या उत्तम अव्यक्त अस्तित्वाला न जाणता ईश्वर व्यक्त झालेला आहे असे मानतात (गीता अध्याय ७ श्लोक २४).

उ. ईश्वराची भक्ती कोणत्याही रूपात केली जाऊ शकते, ईश्वर प्रसन्न होईल. भक्तीमार्गात चार प्रकारच्या मुक्ती सांगितल्या आहेत, त्यातील एखादी मुक्ती मिळू शकेल. मनुष्याच्या श्रद्धेनुसार, इच्छेनुसार आणि जितपत चित्तशुद्धी झालेली आहे त्यानुसार फळ मिळेल. वरवरच्या लोकात जाता येईल. ते वरचे सर्व लोकसुद्धा अनित्य असतात. रावणाने खूप भक्ती केली होती, प्रत्यक्ष भगवान् शंकरांनी दर्शन दिले होते, शिवलिंग दिले होते; पण चित्तशुद्धी झालेली नसल्याने परिणाम काय झाला हे सर्व जण जाणतातच. भक्तीने ईश्वराकडून सायुज्यता मुक्ती हवी असेल तर चित्तशुद्धी अपरिहार्य आहे.

ऊ. सर्वाेत्कृष्ट लाभ ईश्वरात विलीन होण्यात आहे. ते पराभक्तीने शक्य आहे. ती पराभक्ती पूर्ण चित्तशुद्धीने प्राप्त होते. त्यानंतर मनुष्य ईश्वराला तत्त्वत: जाणतो, म्हणजे ईश्वर जो जितका आणि जसा आहे, त्याचे जे वास्तविक स्वरूप आहे, त्याची अनुभूती येते. ही ज्ञानाची परानिष्ठा-पराकाष्ठा आहे. हा विषय दैनिक ‘सनातन प्रभात’ च्या दिनांक ३०.०५.२०२६ च्या अंकात एका संतांच्या प्रश्नाला दिलेल्या उत्तरात विस्ताराने आलेला आहे. (टीप)

ए. चित्तशुद्धी झाल्यावर गुरुंवरील श्रद्धेमुळे ‘गुरूंनीच चित्तशुद्धी करवून घेतली’ , असे साधकांनी म्हटले तरी चालेल. त्यावर काही आपत्ती नाही. कोणी ‘ईश्वराची कृपा झाली’ असे म्हणाला, तरी त्यावर आक्षेप नाही. त्यात काही अनुचित नाही.

ऐ. सूत्र ‘ऊ’ मध्ये सांगितलेली सर्वाेच्च स्थिती प्राप्त झाल्यानंतरही, ईश्वराला तत्त्वत: जाणल्यानंतरसुद्धा, काही आत्मज्ञानी लोक सामान्य माणसांप्रमाणे मूर्तीपूजा इत्यादी करतात. काही जण ह्याला ज्ञानोत्तर भक्ती म्हणतात. पण त्यांचे ईश्वराच्या वास्तविक स्वरूपाचे भान ढळत नाही.

भगवान् श्रीकृष्ण सांगतात की मनुष्य क्षणभरसुद्धा कर्म केल्याविना राहत नाही. प्रकृतीच्या गुणांमुळे सर्वजण कर्म करण्यास विवश असतात (गीता अध्याय ३ श्लोक ५). मग कर्म करावेच लागणार आहे तर संसार-व्यवहारातल्या कर्मांमध्ये गुंतून मोहात पडण्याची संभावना टाळण्यासाठी सात्विक कर्म, आधी आचरलेल्या साधनेचे कर्मच, पण अलिप्त राहून, करत राहणे बरे, असासुद्धा त्या मागे काही जणांचा विचार असतो.

टीप : प्रश्नकर्ता ब्रह्मचारी, सत्संगी, कर्मयोगी, संत आहेत. ते सर्व जाणतच असतील, पण त्यांच्या शब्दाचा मान राखून आणि त्यांची उच्च स्थिती लक्षात घेऊन ब्रह्मात विलीन करणारी पराभक्ती तेथे स्पष्ट केली आहे. जिज्ञासा असल्यास बघावी.

।। श्रीकृष्णार्पणमस्तु ।।

– अनंत आठवले, ढवळी, फोंडा, गोवा. (१३.६.२०२६)