मानवी बुद्धी आणि पारमार्थिक तथ्ये !

पू. डॉ. शिवकुमार ओझा

सर्वाेत्तम शिक्षण कोणते ?

‘पू. डॉ. शिवकुमार ओझा (वय ८७ वर्षे) हे ‘आयआयटी, मुंबई’ येथे एयरोस्पेस इंजिनीयरिंगमध्ये पीएच्.डी. प्राप्त प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. त्यांनी भारतीय संस्कृती, अध्यात्म, संस्कृत भाषा आदी विषयांवर ११ ग्रंथ प्रकाशित केले आहेत. त्यातील ‘सर्वाेत्तम शिक्षा क्या है ?’ या हिंदी भाषेतील ग्रंथातील लिखाण येथे प्रसिद्ध करत आहोत. २६ सप्टेंबर २०२१ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात ‘अनेक गोष्टींविषयी असणारी बुद्धीची अनभिज्ञता’ यांविषयी केलेले विवेचन देण्यात आले होते. आज आपण त्यापुढील भाग पाहूया.

(भाग १२)

या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/513998.html

४६. मानसिक भावनांचीप्रबळता आणि अयोग्य कृती

जीवनात ‘अमुक एखादे कार्य करणे चुकीचे आहे’, हे आपण जाणून असतो; परंतु तरीही आपण मानसिक भावनांच्या प्रबळतेमुळे ते कार्य करण्यास प्रवृत्त होतो आणि शेवटी ते करण्यास बाध्य होतो.

४७. मानवी बुद्धीची उत्पत्ती अन्य गोष्टींच्या निर्मितीनंतर झालेली असल्याने सृष्टीचा विस्तार होतांना मानवी बुद्धी ही पहिली गोष्ट नसणे

सृष्टीची उत्पत्ती अव्यक्त प्रकृतीतून झाली आहे. सृष्टीची उत्पत्ती आणि तिचा विस्तार यांची प्रक्रिया सूक्ष्मापासून स्थुलाकडे अशा दिशेने होत गेली. सृष्टीमध्ये भिन्न-भिन्न गोष्टी उत्पन्न होण्याचा क्रम पाहिल्यास (सांख्य दर्शन, सूत्र १/२६) असे आढळते की, मानवाची बुद्धी ही काही अन्य गोष्टींच्या निर्मितीनंतर झाली आहे. म्हणजेच सृष्टीत पुष्कळशा गोष्टींचे येणे-जाणे यांमागील निश्चित कारण जाणून घेणे हे मनुष्याच्या बुद्धीच्या पलीकडील आहे.

४८. पारमार्थिक तथ्यांना समजणे शक्य नाही

तिन्ही काळांमध्ये (भूत, वर्तमान आणि भविष्य) ज्या वस्तूचे वर्णन करणे शक्य होत नाही, ती पारमार्थिक म्हणवली जाते. ‘पारमार्थिक’ या शब्दाचा अर्थ म्हणजे परमार्थासंबंधी ! परम अर्थ म्हणजे नाम, रूप इत्यादींच्या पलीकडचे म्हणजेच विश्वाच्या पलीकडचे असते. काही पारमार्थिक प्रश्न प्रत्येक मनुष्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असतात; पण मनुष्याची बुद्धी ज्यांना समजू शकत नाही, असे प्रश्न पुढे दिले आहेत.

४८ अ. विश्वाच्या संदर्भातील पारमार्थिक प्रश्न : विश्व कशासाठी आहे ? ते कुठून निर्माण झाले आहे ? ते कुठून आले ? ते कुठे चालले आहे ? सृष्टी म्हणजे काय ? विश्वात सूर्य, चंद्र, तारे आणि ग्रह इत्यादी चालवण्यासाठी एवढे निपुण अन् अटळ नियम कुणी बनवले ? सांसारिक पदार्थांचे गुण कुणी बनवले ? या विश्वाचा अधिष्ठात्रा कोण आहे ? जगात एवढे ज्ञान-विज्ञान निघत आहे, एवढे सर्व शिस्तबद्ध आहे, एवढी बुद्धी निर्माण होते, या सर्वांचा उगम कुठून होतो ? इत्यादी.

४८ आ. मनुष्यासंबंधीचे पारमार्थिक प्रश्न : मी कोण आहे ? कुठून आलो आहे ? कुठे जात आहे ? दुःखापासून स्वतःला कसे वाचवू ? माझा या विश्वाशी काय संबंध आहे ? विश्वाचा माझ्याशी काय संबंध आहे ? माझ्या जीवनाचे संचालन कुठून आणि कसे होत आहे ? कुणाच्या नियंत्रणात बांधलेले हे अनंत जीव सुख-दुःख भोगत आहेत ? इत्यादी.

४८ इ. ईश्वरासंबंधीचे पारमार्थिक प्रश्न : ईश्वर किंवा परमात्मा काय आहे ? परमात्म्याची प्राप्ती होऊ शकते का ? परमात्म्याचा या विश्वाशी काय संबंध आहे ? विश्वाचा परमात्म्याशी काय संबंध आहे ? परमात्म्याचा मनुष्याशी काय संबंध आहे ? मनुष्याचा परमात्म्याशी काय संबंध आहे ? इत्यादी.’

(क्रमशः पुढच्या रविवारी)

– (पू.) डॉ. शिवकुमार ओझा, ज्येष्ठ संशोधक आणि भारतीय संस्कृतीचे अभ्यासक (साभार : ‘सर्वाेत्तम शिक्षा क्या है ?’)

या लेखाचा पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/517955.html