सर्वाेत्तम शिक्षण कोणते ?
अनेक गोष्टींविषयी बुद्धीने काही कळत नसताना सर्व बुद्धीनेच जाणून घ्यायचा अट्टाहास करणाऱ्या बुद्धीप्रामाण्यवाद्यांची कीव करावी तेवढी अल्पच ! – संपादक
पू. डॉ. शिवकुमार ओझा (वय ८७ वर्षे) ‘आयआयटी, मुंबई’ येथे एयरोस्पेस इंजिनीयरिंगमध्ये पीएच्.डी. प्राप्त प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. त्यांनी भारतीय संस्कृती, अध्यात्म, संस्कृत भाषा आदी विषयांवर ११ ग्रंथ प्रकाशित केले आहेत. त्यातील ‘सर्वाेत्तम शिक्षा क्या है ?’ या हिंदी भाषेतील ग्रंथातील लिखाण येथे प्रसिद्ध करत आहोत. १९ सप्टेंबर २०२१ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘बुद्धी, तिचे अवलंबित्व आणि उत्पत्तीच्या मर्यादा !’, याविषयीची माहिती पाहिली. आज आपण त्यापुढील भाग पाहूया.
(भाग ११)
या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/512311.html
३८. जन्म, जाती आणि भोग मिळणे या गोष्टी मनुष्याच्या बुद्धीपलीकडील असणे
‘जन्म, जाती आणि भोग मिळणे या तिन्ही गोष्टींची उपलब्धता जीवनात कोणत्या कारणामुळे होते, हे समजणे मनुष्याच्या बुद्धीच्या पलीकडचे आहे.
३९. शारीरिक क्रियांविषयी बुद्धी अनभिज्ञ असणे
श्वास घेणे, हृदयाची धडधड वाढणे, अन्नाचे पचन होणे, रक्त निर्माण होणे इत्यादी अनेक महत्त्वपूर्ण क्रिया शरिराच्या आत सातत्याने होत असतात; परंतु मनुष्याची बुद्धी त्यासंदर्भात अनभिज्ञ असते. गाढ झोपेतसुद्धा या क्रिया चालूच असतात; परंतु बुद्धीला ते ठाऊक नसते.
४०. बुद्धीमध्ये असणारे तीन दोष आणि त्यांची व्याप्ती
बुद्धीमध्ये तीन प्रकारचे दोष (विकार) असतात. मल, विक्षेप आणि आवरण अशी त्यांची नावे आहेत. राग, द्वेष, तृष्णा, ईर्ष्या इत्यादी असणे म्हणजे बुद्धीचा ‘मल’ (मलीनता) दोष म्हणवला जातो. मनाची चंचलता किंवा अस्थिरता आणि मनाचे इकडे-तिकडे भरकटणे याला ‘विक्षेप’ दोष म्हणतात, तर वस्तूचा योग्य अर्थ झाकून त्याला इतर अयोग्य अर्थाने समजून घेणे याला बुद्धीच्या ‘आवरणा’चा दोष म्हणवला जातो. आवरण दोषामुळे मनात संभ्रम निर्माण होऊन एखाद्या गोष्टीचे अयोग्य प्रकारे किंवा उलट-सुलट ज्ञान होते.
४१. बुद्धीची दुर्बलता दर्शवणारी लक्षणे
काही व्यक्तींच्या सर्व गोष्टी योग्य असतात; परंतु त्यांना एखादी निराळीच सवय लागलेली आढळते, उदा. वारंवार डोळे मिचकावणे, मान हालवणे किंवा काहीही बोलणे इत्यादी. असे होणे म्हणजे बुद्धीचा कोणतातरी भाग सैल पडण्यासारखे आहे. थोडक्यात हे बुद्धीच्या दुर्बलतेचे लक्षण आहे. एका मनोवैज्ञानिक सर्वेक्षणानुसार, अशा बुद्धीजीवी किंवा श्रमजीवी लोकांची संख्या पुष्कळ आहे. ते कोणत्या ना कोणत्या प्रकारच्या मानसिक विकारांनी ग्रस्त झालेले आहेत.
४२. आश्चर्यकारक घटना समजून घेणे बुद्धीसाठी कठीण होणे
जगातील आश्चर्यजनक तथ्ये आणि निष्कर्ष मनुष्याच्या बुद्धीला समजणे शक्य नसणे, उदा. शक्तीपात होणे, चमत्कार दिसणे, सिद्धी प्राप्त होणे इत्यादी.
४३. बीजरूपाला समजणे बुद्धीला शक्य नसणे
पदार्थांच्या बीजरूपाने (म्हणजेच अत्यंत प्रारंभिक अवस्था) उत्पन्न होणार्या नंतरच्या शक्यतांना समजणे हे मनुष्याला शक्य नसते, उदा. वडाचे झाड अतिविशाल असते; पण त्याचे बीज अत्यंत लहान असते. या लहानशा बीजात संपूर्ण वृक्ष विकसित करण्याचे सामर्थ्य सामावलेले असते; पण त्याची सूक्ष्मता आतापर्यंत समजून घेता आली नाही.
४४. भूतकाळ किंवा भविष्यकाळ यांचे आकलन न होणे
४४ अ. भूतकाळातील घटना : मनुष्याच्या बुद्धीला भूतकाळातील घटनांचे आकलन होत नाही, उदा. पृथ्वीची उत्पत्ती कशी झाली ? प्राणी जगताचा विस्तार कसा झाला ? इत्यादी.
४४ आ. भविष्यकाळातील घटना : जगातील विविध घटना आणि क्रिया यांच्याविषयी भविष्यात काय होणार आहे ? याची माहिती मनुष्याची बुद्धी जाणू शकत नाही.
४५. बुद्धीला दैनंदिन जीवनातील गोष्टीही अनेकदा न समजणे
४५ अ. कार्याचे परिणाम समजू न शकणे : आपण एखाद्या व्यक्तीला आपला जिवलग मित्र बनवतो; परंतु कधी कधी तो मित्र आपला विश्वासघात करतो.
४५ आ. बुद्धीला सर्व परिणामांचे पूर्वज्ञान नसणे : आधुनिक युगात काही सुविधाजनक वैज्ञानिक उपकरणे हीसुद्धा हानीकारक असल्याचे सिद्ध झाले आहे, उदा. विमान बनवणार्यांनी विमान बनवतांना असा विचार तरी केला होता का की, संपूर्ण विमान एखाद्या बाँबसारखे वापरले जाईल किंवा बहुमजली इमारत पाडण्यासाठी (जसे ११ सप्टेंबर २००१ या दिवशी अमेरिकेत झालेले आक्रमण) विमान उपयोगात आणले जाईल ? या व्यतिरिक्त पुष्कळशी आधुनिक औषधे मनुष्याच्या लाभासाठी सिद्ध करण्यात आली; पण नंतर ती हानीकारक असल्याचे लक्षात आले. अशी अनेक उदाहरणे आहेत.
४५ इ. गणिताच्या निष्कर्षांचा अनुभव नसणे : बुद्धीनेच गणिताची संरचना केली; परंतु गणिताच्या (Mathematics) द्वारे काढलेले काही निष्कर्ष मनुष्य समजू शकत नाही (म्हणजेच त्याला ते अनुभवता येत नाही), उदा. गणितातील प्रक्रिया, जसे उत्तरोत्तर भिन्नता (Successive differentiation), उत्तरोत्तर एकत्रीकरण (Successive integration) किंवा त्यांचे संमिश्र रूप अनुभवणे हेही मनुष्याला शक्य नाही.
४५ ई. कर्मांचा सृष्टीवरील प्रभावही बुद्धीला ज्ञात नसणे : आपल्या कोणत्याही कर्माचा प्रभाव सृष्टीवर अनुकूल किंवा प्रतिकूल होईल, याचा निश्चयपूर्वक निर्णय घेणे मनुष्याच्या बुद्धीच्या पलीकडचे आहे. मनुष्य अल्पज्ञ आहे. तो समस्त सृष्टीशी परिचित नाही. त्यामुळे कोणत्या प्राण्याच्या कोणत्या कर्माचा प्रभाव सृष्टीच्या कोणत्या स्तरावर कसा पडतो, याचा निर्णय घेणे हे मनुष्याच्या सामर्थ्याच्या पलीकडचे आहे; म्हणून वेद ज्या कर्मांना शुभ किंवा उपयुक्त सांगतात, त्यांचा प्रभाव संपूर्णतः सृष्टीवर पोषक, मंगलमय आणि कल्याणकारी होतो. ज्या कर्मांचा निर्देश वेद अशुभ किंवा निंद्य असा करतात, त्यांचा प्रभाव सृष्टीसाठी नक्कीच अमंगलकारी होतो.’
(क्रमशः पुढच्या रविवारी)
– (पू.) डॉ. शिवकुमार ओझा, ज्येष्ठ संशोधक आणि भारतीय संस्कृतीचे अभ्यासक (साभार : ‘सर्वाेत्तम शिक्षा क्या है ?’)
या लेखाचा पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/?p=515908