शिक्षणप्रणाली कशी असावी, हे बुद्धी ठरवू शकते का ?

सर्वाेत्तम शिक्षण कोणते ?

ज्या मानवी बुद्धीने विज्ञानाचा आश्चर्यजनक प्रसार केला आहे, ती बुध्दिसुद्दा सृष्टीनेच दिलेली असल्याने ला वंदन करणे आवश्यक ! – संपादक

ज्येष्ठ संशोधक आणि भारतीय संस्कृतीचे अभ्यासक ‘पू. डॉ. शिवकुमार ओझा (वय ८७ वर्षे) हे ‘आयआयटी, मुंबई’ येथे एयरोस्पेस इंजिनीयरिंगमध्ये पीएच्.डी. प्राप्त प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. त्यांनी भारतीय संस्कृती, अध्यात्म, संस्कृत भाषा आदी विषयांवर ११ ग्रंथ प्रकाशित केले आहेत. त्यातील ‘सर्वाेत्तम शिक्षा क्या है ?’ या हिंदी भाषेतील ग्रंथातील लिखाण येथे प्रसिद्ध करत आहोत. २६ सप्टेंबर २०२१ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात ‘अनेक गोष्टींविषयी असणारी बुद्धीची अनभिज्ञता’ यांविषयी केलेले विवेचन देण्यात आले होते. आज आपण त्यापुढील भाग पाहूया.    

 (भाग १२)

या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/515908.html
पू. डॉ. शिवकुमार ओझा

४९. शिक्षणप्रणाली कशी असावी आणि त्याविषयीचे निर्णय !

‘शिक्षणप्रणाली कशी असावी ? याचा अर्थ शिक्षणाचा उद्देश निश्चित करणे, शिकणे आणि शिकवणे यासंबंधीचे नियम, तसेच गुरु आणि शिष्य यांची योग्यता अन् त्यांच्यातील संबंध कसे असावेत ? हे निश्चित करणे, तसेच शिक्षणासंबंधीचे विषय (अभ्यासक्रम) निर्धारित करणे इत्यादी होय ! शिक्षणप्रणालीशी संबंधित अशा या प्रक्रियेविषयी शिक्षण संस्थांमध्ये कधी कधी चर्चा, तर्क-वितर्क आणि वाद-विवाद होतात; परंतु योग्य निर्णयापर्यंत पोचणे त्यांच्यासाठी अनेक वेळा कठीण होऊन जाते. विभिन्न मते व्यक्त केली जातात. एखादा तरी निर्णय घेणे जेव्हा त्यांना भाग पडते, (सक्तीचे होऊन जाते), तेव्हा काही निर्णय घेतले जातात.

५०. मनाची अनुकूलता आणि वादविवाद !

सध्या अनेकांचे मनाप्रमाणे वागण्याचे प्रमाण अधिक वाढले आहे. अंतर्मन मनुष्याला सांगते, ‘तुझा विचार योग्य आहे.’ मनुष्य आपल्या वासनांसंबंधीच्या विषयांनुरूप (रूप, रस, गंध, श्रवण, स्पर्श) आणि ज्ञान यांच्या अनुषंगाने मनाला अनुकूल असे भोग घेऊ इच्छितो. अशा परिस्थितीत विविध निर्णय किंवा प्रक्रिया यांसंबंधी वादविवाद होत असतील, तर यात आश्चर्य नाही.

५१. आधुनिक शिक्षण आणि बुद्धीची क्षमता

सध्या विज्ञानाने किती आश्चर्यजनक प्रगती केली आहे ! अनेक वैज्ञानिक सिद्धांतांचा शोध लागला आहे, तसेच नवनवीन सुविधाजनक उपकरणांचीही निर्मिती होत आहे. सर्वसाधारण समाज आणि आधुनिक वैज्ञानिक या सर्व गोष्टींना मानवी बुद्धीचे नैपुण्य आणि कौशल्य यांचाच परिणाम समजतात. आधुनिक मनुष्यामध्ये अशी निष्ठा निर्माण झाली आहे की, बुद्धी जर सर्व व्यावहारिक कार्ये करत आहे, तर शिक्षणासंबंधीचे निर्णयसुद्धा ती का घेऊ शकत नाही ? नक्कीच घेऊ शकते. बुद्धी या कार्यासाठी निश्चितच सक्षम आहे, असे त्याला वाटते.

५२. मनुष्याने सृष्टीचे महत्त्व, तसेच सृष्टी आणि मनुष्य यांच्या परस्पर कार्यातील भेद समजून घ्यायला हवा !

प्रथमदर्शनी हा विचार योग्य वाटतो; म्हणून आधुनिक मनुष्याला या लेखाचे शीर्षक विचित्र वाटेल. शीर्षकात विचारलेला प्रश्न अनुचित वाटेल. प्रश्न अनुचित वाटणे हे मनुष्याचे अज्ञान, अविवेक आणि भोगवादी संस्कृतीचा प्रभाव यांवर अवलंबून आहे. मनुष्याने सृष्टीचे महत्त्व, तसेच सृष्टी आणि मनुष्य यांच्या परस्पर कार्यातील भेद समजून घ्यायला हवा. मनुष्याची व्यावहारिक बुद्धी जर निश्चयात्मक नाही, तर कोणती बुद्धी निश्चयात्मक निर्णय देण्यास सक्षम आहे ?

५२ अ. सृष्टी आणि तिला नमस्कार करण्याचे महत्त्व : आधुनिक वैज्ञानिक उपकरणे ही सृष्टीने प्रदान केलेले पदार्थ किंवा त्यांचे मिश्रण यांनी सिद्ध झालेली आहेत. ते पदार्थ किंवा त्यांच्या मिश्रणाचे गुण हेही सृष्टीनेच प्रदान केलेले आहेत. ते मनुष्याच्या बुद्धीतून निर्माण झालेले नाहीत. मनुष्याच्या बुद्धीने केवळ त्या गुणांचा उपयोग करण्याविषयीचा शोध लावला आहे. यामुळे विभिन्न वैज्ञानिक सिद्धांत आणि उपकरणे यांची निर्मिती झाली आहे. ज्या मानवी बुद्धीने विज्ञानाचा आश्चर्यजनक प्रसार केला आहे, ती बुद्धीसुद्धा सृष्टीनेच दिलेली आहे, मनुष्याने त्या बुद्धीला निर्माण केलेले नाही. त्यामुळे सर्वप्रथम आपल्याला सृष्टीला नमस्कार करायला पाहिजे. आपल्या अहंकाराला नाही.

(क्रमशः पुढच्या रविवारी)

– (पू.) डॉ. शिवकुमार ओझा, ज्येष्ठ संशोधक आणि भारतीय संस्कृतीचे अभ्यासक (साभार : ‘सर्वाेत्तम शिक्षा क्या है ?’)

या लेखाचा पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/519513.html